फुटबॉल खेळाडूंच्या दैवतीकरणाचा कॉपरेरेट- क्लब संस्कृतीने रचलेला चक्रव्यूह क्रोएशियाच्या लुका मॉड्रिचने भेदला, हे सुखद आणि आशादायीच..

‘बॅलाँ डिओर’ या फुटबॉलमधील सर्वोच्च वार्षिक वैयक्तिक सन्मानाचा झगमगता सोहळा यंदा पॅरिसमध्ये झाला, त्या वेळी जवळपास तुडुंब भरलेल्या सभागृहात दोनच खुर्च्या रिकाम्या होत्या. हे दोन अनुपस्थित निमंत्रित कोण हे सहज ओळखण्यासारखे होते. ते होते लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो! गेली १० वर्षे हा ‘बॅलाँ डिओर’ किंवा सोन्याचा फुटबॉल आलटून-पालटून हे दोघेच जिंकत होते. त्यांच्या अघोषित साम्राज्याला धक्का लावणाऱ्या ‘फुटकळ’ लुका मॉड्रिचचे कौतुक करावे असे त्यांना वाटले नाही. मॉड्रिचचे कौतुक केले असते, तर दोघांचेही श्रेष्ठत्व उजळणारच होते. मनाचा हा मोठेपणा मॉड्रिचने दाखवला. हा पुरस्कार आपण शावी हर्नाडेझ, आंद्रेस इनियेस्टा, श्नायडर अशा ‘बॅलाँ डिओर’ कधीही जिंकू न शकलेल्या प्रतिभावान फुटबॉलपटूंना अर्पण करतो, असे त्याने स्वीकारभाषणातच सांगून टाकले! शावी, इनियेस्टा, श्नायडर यांची नावे फुटबॉलदर्दीच्या वर्तुळाबाहेर कोणी ऐकल्याची शक्यता क्षीणच. कारण झपाटय़ाने कॉर्पोरेट दैवतीकरण होत असलेल्या फुटबॉलसारख्या खेळात मॉड्रिचही कालपर्यंत अनामच होता. रोनाल्डो आणि मेसीसारखे फुटबॉलपटू गोल झळकवतात नि झळकतात. किंवा हल्ली झळकवले जातात. त्यांना मैदानावर पासेस पुरवणारी मोठी यंत्रणा असते. पासेसच्या अचूकतेवर मेसी, रोनाल्डोसारख्यांचे यश किमान पन्नास टक्के तरी अवलंबून असते. गोल आधी ‘घडवावे’ लागतात. त्यानुसार चाली रचाव्या लागतात आणि पासेस पुरवावे लागतात. पासेसचा दारूगोळा नसेल, तर मेसी- रोनाल्डो- नेयमार या तोफा धडाडणारच नाहीत. शावी, इनियेस्टा आणि मॉड्रिच हे गोल ‘घडवणारे’ फुटबॉलपटू. गोल ‘करणाऱ्यांच्या’ झळाळीसमोर त्यांचे कर्तृत्व उठून दिसत नसले, तरी महत्त्व कमी होत नाही. यानिमित्ताने लुका मॉड्रिचच्या कामगिरीवर झोत टाकणे समयोचित ठरेल.

पूर्वाश्रमीच्या युगोस्लाव्हियाच्या ‘बाल्कनकरणा’नंतर फुटीर प्रजासत्ताकांतील बहुसंख्य जनतेला जे हाल सोसावे लागले, त्याचा फारसा अंदाज बाह्य़ जगताला आलेला नाही. क्रोएशियाचा लुका मॉड्रिच बाल्कनीकरणाचे चटके बालपणीच अनुभवलेल्या पिढीतला. त्याच्या कुटुंबाला राहते घर सोडून सर्बियन फौजांपासून सुरक्षित स्थळी परागंदा व्हावे लागले होते. या धावपळीत त्याचे आजोबा मारले गेले होते. अजूनही त्याचे ते घर भग्नावस्थेत उभे आहे. निर्वासितांसाठी उभारलेल्या इमारतींच्या आणि हॉटेलांच्या कार पार्कमध्ये लुका फुटबॉल खेळायचा. पायाला जखम होईल अशा त्या जाडय़ाभरडय़ा टणक चेंडूंनाही योग्य दिशा देण्याची नजाकत लुकाने आत्मसात केली होती. फार शिडशिडीत किंवा दणकट चणीचा नव्हता, तरी डोक्यात सतत फुटबॉल असल्यामुळे पाय भिरभिरायचे. युद्धसदृश स्थिती प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रकारचा कणखरपणा आलेला होता. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात क्रोएशियाचा एक प्रतिभावान टेनिसपटू गोरान इव्हानिसेविच त्याच्या तडाखेबंद सव्‍‌र्हिससाठी ओळखला जाऊ लागला होता. क्रोएशियाच्या फुटबॉल संघानेही १९९८ मध्ये विश्वचषक उपान्त्यपूर्व सामन्यात साक्षात जर्मनीला धूळ चारली होती. तो फुटबॉल संघ किंवा गोरानसारखा टेनिसपटू लुका मॉड्रिचसाठी आदर्श ठरले नसते तरच नवल होते. जगभर अनेक देशांमध्ये प्रतिकूल परिस्थिती, अनागोंदी, सुविधांचा अभाव असतानाही तेथील खेळाडू तरीही जागतिक स्तरावर कसे चमकत राहतात हे कोडे कोणत्याच क्रीडाप्रेमीला निश्चितपणे सोडवता आलेले नाही. त्याचबरोबर हेही खरे की, असे कमी नशीबवान संघ किंवा खेळाडू चमकत राहणे, जिंकत राहणे खेळाच्या व्यापक लोकप्रियतेसाठी अत्यावश्यक असते. फुटबॉल हा सांघिक आणि बहुस्तरीय खेळ. प्रत्येक स्तरावर किंवा फळीत खेळणाऱ्या खेळाडूंवर स्वतंत्र जबाबदारी असते. सहसा गोल करण्याची जबाबदारी आघाडीच्या फळीवर असते. गोल रोखण्याची जबाबदारी बचावफळी आणि गोलरक्षकावर असते. या दोन्हींमध्ये दुवा साधण्यासाठी मधल्या फळीला सतर्क राहावे लागते. संपूर्ण मैदानात त्यांची धावपळ आक्रमक किंवा बचावपटूंपेक्षा अधिक असते. यासाठी या फळीतील खेळाडूंकडे सर्वाधिक सर्जनशीलता आणि चिकाटी असावी लागते. वर म्हटल्याप्रमाणे पासेस पुरवणे आणि प्रतिस्पर्धी संघातील आक्रमकांपासून स्वतच्या संघाच्या बचावफळीचे रक्षण करणे हेही करावे लागते. या सगळ्या भानगडीत कौशल्य वगैरे दाखवायला वाव आणि वेळ असे दोन्ही कमी पडते! बहुतेकदा यांच्या नावावर गोल लागत नाहीत. आणि यांनी पुरवलेल्या असंख्य पासेसची नोंदही होत नाही. गोल जमा होतात गोलपोस्ट परिसरात वावरणाऱ्या मेसी-रोनाल्डोंच्या नावावर. किंवा मग एखादा पेले किंवा मॅराडोना पूर्णपणे स्वकौशल्यावर प्रतिस्पध्र्याच्या दोन-दोन फळ्या भेदत जाऊन गोल करतो. असे फुटबॉलपटू काही पिढय़ांतून एकदाच जन्माला येतात. त्यामुळे  मेसी-रोनाल्डोवर ‘भागवावे’ लागते का?

मेसी आणि रोनाल्डो यांच्या कौशल्याविषयी किंवा कर्तृत्वाविषयी संदेह व्यक्त करण्याचा येथे हेतू नाही. मात्र ‘बॅलाँ डिओर’च्या तोडीची कामगिरी या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फुटबॉलपटूला दहा-दहा वर्षे साधता आली नाही हे वास्तव हास्यास्पद आणि संशयास्पदही ठरते. लुका मॉड्रिचने क्रोएशियाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले होते. काही गोलही त्याने केले. पण केवळ तोच त्याच्या कर्तृत्वाचा मापदंड नव्हता. मैदानात त्याचे नेतृत्व आणि नियंत्रण दिसून आले. रोनाल्डोचा पोर्तुगाल किंवा मेसीचा अर्जेटिना दुसऱ्या फेरीपलीकडे जाऊ शकले नाहीत. याशिवाय गेल्या दहा वर्षांमध्ये हे दोघे ऐन भरात असतानाही त्यांच्या देशांना विश्वचषक जिंकता आला नाही. २०१४ मध्ये मेसीचा अर्जेटिना विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचला, तर २०१६ मध्ये रोनाल्डोच्या पोर्तुगालने युरो चषक जिंकला. पण हे दोन अपवादच. त्यामुळे त्यांची क्लब कामगिरीच अधिक ग्राह्य़ मानली गेली हे उघड आहे. या वर्षी मॉड्रिचचा रेआल माद्रिद क्लब युरोपियन चॅम्पियन्स लीग विजेता ठरला होता. ती कामगिरी आणि विश्वचषक कामगिरी मॉड्रिचला हंगामातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू ठरवून गेली. विश्वचषक स्पर्धेतही तो सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला होताच. मुद्दा त्याच्या कामगिरीचा नाही. या दशकाच्या सुरुवातीला आणि गेल्या दशकाच्या उत्तरार्धात स्पेन आणि जर्मनी या दोन देशांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल आणि क्लब फुटबॉल या दोन्ही क्षेत्रांमध्ये वर्चस्व गाजवले. त्यांच्या एकाही फुटबॉलपटूला गेल्या दहा वर्षांत ‘बॅलाँ डिओर’ जिंकता आले नाही. याचाच अर्थ मैदानावरील कर्तृत्व हा या पुरस्काराचा एकमेव निकष नव्हता. मेसी विरुद्ध रोनाल्डो, मग बार्सिलोना विरुद्ध रेआल माद्रिद अशा ‘झुंजी’ लावून, त्यांचे दैवतीकरण करून, ‘सर्वात महान फुटबॉलपटू कोण’ वगैरे बालिश संकल्पना पेरून कॉर्पोरेट मलिद्याचा अमृतकुंभ ओसंडून वाहत राहील, अशी ही योजना असते. विश्वचषकात इंग्लिश लीगमधले चमकले, की स्पॅनिश लीगमधले झळकले यावर पैजा झडतात. मेसीवर लक्ष केंद्रित करून आज अर्जेटिनाच्या फुटबॉलचे मातेरे झाले आहे. नेयमार-नेयमार असा धोषा लावून ब्राझीलचे फुटबॉल अजूनही दिशाहीन आहे. क्लबांना आणि त्यांच्या व्यक्त किंवा सुप्त सावकारांना याची फिकीर नाही. म्हणूनच लुका मॉड्रिचच्या पुरस्काराचे वेगळेपण सुखद आणि आशादायी ठरते. पण यामुळे कॉर्पोरेट दैवतीकरणाला पूर्णविराम मिळाला, की अर्धविराम हे अनिश्चित आहे. पुन्हा पुढील पाच वर्षे मेसी-रोनाल्डोच पुरस्कार पटकावत राहणारच नाहीत, याची हमी कोण देईल?