22 April 2019

News Flash

पप्पू नापास का झाला?

विखारी समाजमाध्यमांमुळे होणारा विषबाधेचा धोका अधिक आहे.

जनरल रावत तसेच द इकॉनॉमिस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नलसारख्या विख्यात नियतकालिकांनी समाजमाध्यमांविषयी मांडलेली मते चिंता वाटावी अशीच आहेत..

आर्थिकदृष्टय़ा उजव्या, उदारमतवादी विचारविश्वातील अग्रगण्य नियतकालिक म्हणजे द इकॉनॉमिस्ट. सखोल विश्लेषण आणि नेमस्त मांडणी यासाठी ते ओळखले जाते. या साप्ताहिकाच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठ कथेचा विषय आहे समाजमाध्यमांपासून लोकशाहीस धोका आहे काय? याआधी काही महिन्यांपूर्वी वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका पाहणी आधारित लेखाचा विषय होता Can Democracy Survive Social Media? म्हणजे लोकशाही समाजमाध्यमांस तोंड देऊ शकेल काय? यालाच समांतर जाणारा मुद्दा भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मांडला असून भारतीय लष्कराविरोधात वातावरण निर्माण होण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले आहे. ते काश्मीरसंदर्भात बोलत होते. त्यांच्या मते लष्कराविरोधात त्या राज्यात ज्या काही हिंसक घटना घडत आहेत, त्यास समाजमाध्यमांतील चिथावणी प्रामुख्याने जबाबदार आहे. या तीनही घटकांचे हे निष्कर्ष स्वतंत्र आहेत आणि त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. जनरल रावत यांचे निरीक्षण आणि द इकॉनॉमिस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नल यांतील लेखांच्या निमित्ताने आपल्याकडच्या अप्रगत समाजविश्वात या समाजमाध्यमांनी जो काही धुमाकूळ घातलेला आहे त्यावर भाष्य करणे ही काळाची गरज ठरते. याच समाजमाध्यमांच्या आगमनामुळे ज्या लोकशाहीचे बळकटीकरण होईल असे वाटत होते त्या लोकशाहीच्या गळ्यास समाजमाध्यमांमुळे नख लागू लागले आहे हे समोर येणारे सत्य.

जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेल्या या नियतकालिकांना या विषयाची दखल घ्यावी लागली याचे कारण समाजमाध्यमांतील अत्यंत लोकप्रिय अशा फेसबुक, ट्विटर आणि यूटय़ूब यांनी जाहीर केलेली आकडेवारी. तीस संदर्भ आहे अमेरिकेतील ताजी अध्यक्षीय निवडणूक आणि तीमधील रशियाचा हस्तक्षेप. या निवडणुकीत अमेरिकी जनतेचे मन आणि मत हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात वळावे यासाठी रशियाने काही प्रचारकी परंतु अजिबात प्रचारकी न भासणाऱ्या ध्वनिचित्रफिती, मजकूर आदी ऐवज अलगदपणे समाजमाध्यमांत प्रसृत केला. फेसबुकनेच दिलेल्या कबुलीनुसार अमेरिकेतील १४ कोटी ५० लाख नागरिकांनी त्या वाचल्या आणि एकमेकांना पुढे पाठवल्या. ट्विटरच्या ३६ हजार ७४६ अमेरिकी खातेधारकांनी त्या संपूर्ण वाचल्या आणि त्या रिट्वीट केल्या. गुगलच्या कबुलीनुसार एकटय़ा यूटय़ूबवर अशा १,४१६ इतक्या ध्वनिचित्रफिती पाहून लाखो अमेरिकींनी त्या आपणास आवडल्याचे नमूद केले. या आकडेवारीतील धक्कादायक बाब म्हणजे या सर्व ध्वनिचित्रफिती, मजकूर हे शंभर टक्के असत्य कथन करणारे होते. ही बाब अमेरिकी निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाची चौकशी करणाऱ्या यंत्रणांना आढळून आली. यामुळे अमेरिकी समाजविश्लेषक हादरले असून समाजमाध्यमांच्या या कराल चेहऱ्याचे गांभीर्य त्यामुळेच चर्चेत आले आहे. हे का आणि कसे झाले आणि होते?

समाजमाध्यमे ही गणिती समीकरणांवर चालतात. तेथे प्रत्येकाच्या वर्तनाची छाननी होते आणि त्या जगड्व्याळ छाननीच्या आधारे या माहितीच्या मालकांना जनतेचे मन आणि मत हवे तसे वळवता येते. या माहितीचे नियंत्रण करणाऱ्या कंपन्या फेसबुक, ट्विटर आदींत वारंवार मजकूर प्रसृत करीत असतात आणि कोणती व्यक्ती त्यातील कोणत्या मजकुरावर थांबली, त्यावर मत व्यक्त केले, ते काय आहे, याची सविस्तर छाननी करतात. त्यानंतर त्या व्यक्तीच्या समाजमाध्यमांतील खात्यांवर त्याच त्याच धाटणीचा मजकूर ठरवून प्रसृत केला जातो. ती व्यक्ती तेच वाचत राहाते आणि आपले मत अधिकाधिक घट्ट करीत जाते. वैचारिक परिवर्तन वा घुसळणीसाठी प्रतिवादाची सोय पारंपरिक माध्यमांत असते. ती समाजमाध्यमे देत नाहीत. उलट एखाद्या व्यक्तीचे जे काही ग्रह आहेत तेच कसे अधिकाधिक बळकट होतील यासाठीच सारा प्रयत्न असतो. त्यामुळे व्यक्तीची मते अधिकाधिक टोकदार बनत जातात आणि तिच्या मनाचे कप्पे बंद होत जातात. गतसाली इंग्लंडमध्ये युरोपीय समुदायात राहावे की त्यातून बाहेर पडावे यासाठी मतदान घेतले गेले. त्या वेळी पहिल्यांदा या समाजमाध्यमी तंत्राच्या यशस्वी वापराचा प्रयत्न झाला आणि ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर कुंपणावर असलेल्यांचे मत विरोधात वळवले गेले. इंग्लंडमधील समाजजीवनातील नाजूक मुद्दय़ांना या समाजमाध्यमांनी असा काही स्पर्श केला की नागरिकांना तेच मत खरे वाटू लागले. याच तंत्राचा वापर अमेरिकी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. याचाच सारा तपशीलवार ऊहापोह वॉल स्ट्रीट जर्नल आणि द इकॉनॉमिस्ट यांनी केला आहे. तो विचारप्रवृत्त करणारा आहे.

कारण भारतात तो तसाच्या तसा लागू पडतो. अमेरिकेत या संदर्भात झालेली पाहणी दाखवून देते की सर्वसाधारण निरोगी व्यक्ती एका दिवसात साधारण २६०० वेळा आपल्या मोबाइलला स्पर्श करते. याचा अर्थ मोबाइलवर ताजे काय, हे ती पाहाते. याचाच अर्थ एका दिवसात इतक्या वेळी त्या व्यक्तीच्या मनात घुसण्याची संधी समाजमाध्यमांना मिळते. तिचा पुरेपूर वापर त्यांच्याकडून केला जातो. कारण ही यंत्रणा राबवणाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध त्यात असतात आणि समाजमाध्यमे वापरणाऱ्यांच्या निर्बुद्धतेवर त्यांचा नफा अवलंबून असतो. तरी या पाहणीत व्हॉट्स अ‍ॅप विद्यापीठाचा समावेश नाही. तो केला गेला तर किती प्रचंड प्रमाणात हेतुपुरस्सर गैरसमज पसरविले जातात हे समजून घेता येईल. या माध्यमांचा जसजसा प्रसार झाला तसतसे हे पारंपरिक माध्यमांना आव्हान असल्याचे मानले गेले. परंतु ते तसे का नाही, हेही दोन नियतकालिके दाखवून देतात. पारंपरिक माध्यमांना कायद्याचा धाक असतो आणि कोणाही विरोधात काहीही मजकूर प्रसिद्ध करण्यावर त्यांच्यावर अंगभूतच निर्बंध असतात. तसेच पारंपरिक माध्यमांवर समाजाचा म्हणून एक अप्रत्यक्ष वचक असतो. त्याचाही विचार पारंपरिक माध्यमांना करावा लागतो. यातील काहीही नवसमाजमाध्यांना लागू होत नाही. तेथे काहीही लिहिता येते आणि कोणालाही कोणीही त्याबाबत विचारीत नाही. याचा मोठा गैरफायदा ही समाजमाध्यमे हाताळणारे घेतात हे दोन्हीही प्रकाशकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. यावर या नियतकालिकांचे म्हणणे असे की यापुढे या माध्यमांवर नियंत्रणांचा विचार करावाच लागेल. या माध्यमांवर प्रसृत होणाऱ्या प्रत्येक मजकुराबाबत कबुली देण्यासाठी या माध्यम संचालकांना नियमांत बांधणे सक्तीचे करावे लागेल अशी या नियतकालिकांची मसलत आहे. आपण या सगळ्यांची दखल का घ्यायची?

याचे कारण पाश्चात्त्य जगाच्या तुलनेत आपल्याकडे समाजजीवन अधिकच हलके असल्याने विखारी समाजमाध्यमांमुळे होणारा विषबाधेचा धोका अधिक आहे. आधीच आपल्याकडे जनतेस हेलकाव्यांवर जगावयास आवडते. मग हे हेलकावे संपूर्ण क्रांतीचा नारा देणाऱ्या जयप्रकाश नारायण यांचे असोत, दुसऱ्या क्रांतीची भाषा करणाऱ्या अण्णा हजारे यांचे असोत किंवा भ्रष्टाचारमुक्तीची हाक देणाऱ्या आणखी कोणाचे असोत. यांतील जयप्रकाश तसे दुर्दैवी. त्यांना समाजमाध्यमांची साथ मिळाली नाही. त्या तुलनेत अण्णा आणि अलीकडचे अन्य अधिक भाग्यवान. त्यांनी या समाजमाध्यमांचा आधार घेत आपल्याभोवती मोठीच प्रभावळ निर्माण केली. ती किती तकलादू होती हे आधी अण्णांचे जे काही झाले आणि आता अन्यांचे जे काही होत आहे त्यावरून दिसून येते. अशा वेळी या बेताल आणि बेजबाबदार समाजमाध्यमांपासून सावध राहण्यासाठी विवेकाचा आवाज सशक्त कसा होईल हे पाहण्याची जबाबदारी पारंपरिक माध्यमांवर येऊन पडते. परंतु त्यांतील अनेकांचा विवेकावयवच निकामी झालेला आणि अन्य काही भक्तांच्या टोळक्यांसमोर दबून गेलेला. अशा वातावरणात परिस्थिती किती गंभीर आहे ते निदान द इकॉनॉमिस्ट अथवा वॉल स्ट्रीट जर्नलच्या अभ्यासपूर्ण लेखनातून समजून घेता येईल.

या सगळ्याचा आपल्याशी काय संबंध, आपल्याकडे असे काही नाही, अशी खुळचट प्रतिक्रिया हे वाचून काहींची असू शकते. त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी एकच उदाहरण पुरे. अशांनी ‘पप्पू’ नापास का झाला, याचा विचार करावा. पप्पूचे सुरुवातीला अभ्यासाकडे लक्ष नव्हते हे खरेच. परंतु तो पूर्ण निकम्माच ठरवला गेला तो समाजमाध्यमांतील प्रचारामुळे. तेव्हा एखाद्यास पप्पू ठरविण्यासाठी प्रतिपक्षाचे प्रचारभान हेच कसे प्रभावी ठरले आणि आता पप्पूनेही त्याच समाजमाध्यमी अस्त्राचा उपयोग सुरू केल्यावर प्रतिपक्षावर बचावाची वेळ का आली हे कळेल. परंतु त्या पप्पूचे आणि प्रतिपक्षाचे जे काय व्हायचे ते होईल. परंतु समाज म्हणून आपला पप्पू होऊ नये इतके तरी भान आपणास असायला हवे, इतकेच.

 

First Published on November 6, 2017 2:37 am

Web Title: the wall street journal and the economist magazine comment on social media