कलाशाखा आणि ‘लिबरल आर्ट्स’ यांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतो आहे, हे एक सुचिन्हच..

शिक्षणाचा उपयोग काय हा प्रश्न बऱ्याचदा उद्वेगाने विचारला जातो आणि तो अगदी रास्तच असतो. शिक्षण म्हणजे प्रमाणपत्रांसाठी परीक्षांमागे घालवलेली वर्षे आणि त्यासाठी ओतलेला पैसा, तर उपयोग म्हणजे या प्रमाणपत्राच्या आधारे जास्त पैसा मिळवण्याची संधी, हीच कल्पना जर मान्य असेल तर शिक्षणाच्या उपयोगाविषयीचा हा प्रश्न रास्तच म्हणायचा. त्यापुढे जर शिक्षण माणसाला घडविते वगैरे कल्पना मान्य असतील तर संवादाला वाव राहातो. पण यात गंमत अशी की शिक्षणाविषयीची आपली कल्पना निव्वळ उपयुक्ततावादीच आहे, अशी थेट कबुली कोणीही देत नाही.  अमुकतमुक विद्याशाखेला ‘सध्या वाव आहे’ अशा अप्रत्यक्ष शब्दांतून या कल्पनांची सद्दी सुरू राहाते. म्हणजे दहाबारा वर्षांपूर्वीपर्यंत केवळ विज्ञान आणि वाणिज्य याच शाखांना ‘वाव’ असल्याचे मानले जाई. विज्ञान शाखेत अकरावी- बारावीची दोन वर्षे काढली की मग डॉक्टर वा इंजिनीअर व्हावे, किंवा वाणिज्य शाखेत शिकताना सनदी लेखापाल होण्याचा प्रयत्न करावा आणि नाहीच जमले तर मिळालेल्या गुणांवर नोकरीस चिकटावे, ही स्वप्ने पाहणारा मध्यमवर्ग हा याच शाखांना वाव असण्याचे खरे कारण. हळूहळू या वर्गाची स्वप्ने विविध कारणांनी बदलली, मध्यमवर्गाची व्याप्तीही वाढू लागली आणि अभियांत्रिकी महाविद्यालये नामक हरळीच्या मर्यादाही स्पष्ट होऊ लागल्या, तोवर कलाशाखेकडे जाणाऱ्या गुणवंतांची संख्याही वाढू लागली. अवघ्या दोन दशकांपूर्वी ज्या विद्याशाखेकडे ८५ टक्क्यांच्या पुढले विद्यार्थी फार कमी जात असत, त्या कलाशाखेच्या प्रथम वर्षांचे पदवी-प्रवेश ९० टक्के वा त्यापुढेच बंद झाल्याच्या बातम्या गेल्या काही वर्षांत येऊ लागल्या. हे काही ठरावीक महाविद्यालयांपुरतेच आहे, असे कोणी म्हणेल. हा युक्तिवाद तूर्तास तथ्यपूर्णही ठरतो. पण कलाशाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे, याचे स्वागत विविध कारणांनी केले पाहिजे.

गुणवत्तेचा संबंध केवळ ठरावीक व्यवसायांशी जोडून पाल्याची घुसमट करणारे पालक कमी होताहेत, असा एक अर्थ कलाशाखेकडे गुणवंतांचा वाढता ओढा पाहून काढता येतो. हे झाले प्राथमिक कारण. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी कलाशाखेतील विषयांचा उपयोग होतो, ही अंधश्रद्धा झाली. ते काही कारण नव्हे. किंवा प्राध्यापक होणे हीदेखील महत्त्वाकांक्षा म्हणावी, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. सनदी अधिकारी वा अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक होण्याच्या संधी मुळात कमी असताना मुलामुलींना ती स्वप्ने पाहण्याचा जुगार पालक खेळू देतात,  हे महत्त्वाचे. कलाशाखेकडे जाताना ‘चांगले’ महाविद्यालय मिळावे, यासाठी धडपड करणारे तरुण हे बहुतेकदा अभ्यासेतर उपक्रमांसाठी नावाजलेले महाविद्यालय निवडतात, हेही लक्षणीय. एकांकिका, कबड्डी वा बॉक्सिंगसारखा क्रीडाप्रकार यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी तेवढय़ाच कारणासाठी पसंती देणे, हे आजच्या तरुणाला चाकोरीबाहेरच्या वाटा खुणावत असल्याचेच द्योतक. ‘माणूस घडवणे’ हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे, यावर पुन्हा विश्वास बसण्याजोगी आशादायक स्थिती कलाशाखेस मिळणाऱ्या पसंतीमुळे सूचित होत असेल, तर स्वागतच करायला हवे. अनेक विनाअनुदानित अभ्यासक्रम कलाशाखेचा भाग म्हणून निघाले आहेत आणि त्याकडे केवळ ‘वाव’ पाहूनच जाणारे विद्यार्थीही आहेत हे खरे असले, तरी आणखी निराळी, पूर्णत: सकारात्मक अशी घडामोड गेल्या काही वर्षांत आपल्याकडे घडू लागली आहे.

ती म्हणजे ‘लिबरल आर्ट्स’चे अभ्यासक्रम कलाशाखेत वाढू लागले आहेत. कलाशाखेत भाषा, वाङ्मय, समाजविज्ञान, तत्त्वज्ञान यांचा समावेश होतोच, पण त्यात शास्त्रांना आणि प्रयोगकलांनाही स्थान देणारी ही अधिक व्यापक आणि मुक्त कलाशाखा. युरोपातून ती अमेरिकेत गेली, अमेरिकेत रुळून मग भारतातील मोठय़ा शहरांच्या परिघात पोहोचली. पण विसाव्या शतकाच्या आरंभीच गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुरांनी सुरू केलेले शान्तिनिकेतन तरी काय वेगळे होते? हल्ली दूरस्थ शिक्षण घेऊ देणाऱ्या विद्यापीठांना ‘मुक्त विद्यापीठ’ असा शब्द रुळला आहे. पण शान्तिनिकेतनातून फुललेले विश्वभारती विद्यापीठ हे अंतर्यामी मुक्त असलेले पहिले भारतीय विद्यापीठ होते. ‘मुक्त कला- शास्त्र- मानव्यविद्या’ ही विद्याशाखा भारतात रुजली ती तेथेच. आता दिल्लीभोवती पसरलेली सहासात खासगी विद्यापीठे ही ‘लिबरल आर्ट्स’चा अभ्यासक्रम देतात. मुंबईत स्वायत्तता मिळालेल्या एका महाविद्यालयाने लिबरल आर्ट्सचा विनाअनुदानित अभ्यासक्रम सुरू केला. पुण्यातील दोन खासगी विद्यापीठांमध्येही तो आहेच आणि यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही हा पदवी अभ्यासक्रम सुरू होतो आहे. गणित आणि इतिहास किंवा संगीत आणि भौतिकशास्त्र असे कोणतेही विषय लिबरल आर्ट्स या शाखेच्या विद्यार्थ्यांना निवडता येऊ शकतात. हे अनेकांना विचित्र वाटेल. या विषयांची एकमेकांशी संगती काय असा प्रश्न साहजिकपणे विचारला जाईल. ही संगती विद्यार्थ्यांने लावायची आहे. मुख्य विषय, दुय्यम विषय, निवडयोग्य विषय, कौशल्ये आणि निवडलेल्या क्षेत्रात प्रत्यक्ष उमेदवारी असे चतुरस्र शिक्षण देताना आपापला ‘वाव’ शोधण्याची संधी- आणि जबाबदारीसुद्धा – विद्यार्थ्यांलाच देणे, हे अशा अभ्यासक्रमांचे वैशिष्टय़. त्यास प्रतिसाद मिळू लागल्याचे दिसणे, हे आपल्या शिक्षणव्यवस्थेची झापडे उघडत असल्याचे एक लक्षण.

तरीही, आंतरशाखीय विषय एकत्र शिकू देणाऱ्या या शिक्षणाचा उपयोग काय हा प्रश्न विचारला जाणारच नाही असे नव्हे. सिलिकॉन व्हॅली आदी नवउद्यमींच्या अमेरिकी केंद्रांत संगणकज्ञानासह अन्य एखाद्या विषयातही विशारद असलेल्यांना मागणी वाढल्याचे दिसल्यावरच आपल्याकडे असे अभ्यासक्रम अधिक वेगाने आले, हे त्या उपयुक्ततावादी प्रश्नाचे एक उत्तर. परंतु आज अशा अभ्यासक्रमांचे आकर्षण वाटणारे- आणि ते पार पाडताना आपल्यावर काय जबाबदारी येणार याची जाणीवही असलेले विद्यार्थी आहेत हे लक्षात घेतले, तर उपयुक्ततावादाच्या पुढला विचार करावा लागतो. तो असा की, अशा आंतरशाखीय शिक्षणाचा मूलाधार मानव्यविद्या हा असेल, तर उद्याचे विद्वान/ अभ्यासक/ संशोधक आणि उद्याचा समाज यांचे नाते नक्कीच निराळे असेल. उदाहरणार्थ,  समाजशास्त्र, सांख्यिकी आणि संगीत असे विषय शिकून लोककलांच्या स्थितीचा सखोल अभ्यास करायचा, असे एखादीने ठरवलेले असू शकते. किंवा संगणकशास्त्र आणि भारतीय संगीत असे विषय शिकून पुढे भारतीय वाद्य-वादन शिकवणारे संगणक उपयोजन करण्याचा विचार एखादा करू शकेल.. या सध्या तरी जर-तरच्या गोष्टी आहेत. लिबरल आर्ट्सचे सुपरिणाम दिसू लागण्याचा दिवस दूर आहे. तोवर कळ काढायला हवीच. तरुणांचा कल बदलतो आहे, त्यांच्या आकांक्षाही सरधोपट किंवा झापडबंद नाहीत, यावर विश्वास ठेवला  की मग, आज  रूढ कलाशाखेकडे असणारा ओढा हादेखील पुढेमागे मानव्यविद्या आणि समाजविज्ञान यांमधील मोठय़ा योगदानाची नांदी आहे, अशी आशा ठेवता येईल.

तोवर समाधान बाळगायचे, ते कलाशाखेला बरे दिवस आल्याचे नव्हे..  विद्यार्थ्यांचा कल अधिक मोकळा होतो आहे आणि या बदलत्या कलाचे भान ठेवून आपली  शिक्षणव्यवस्था देखील वाढू लागली आहे,  याचे!