व्यावसायिक रंगभूमीवरही सुधाताई करमरकरांनी उत्तम भूमिका केल्या. पण त्यांच्याविषयी अधिक कृतज्ञ राहायला हवे ते लिटल थिएटरसाठी..

मराठी बालरंगभूमीने दोनच अवस्था अनुभवल्या. बालिश आणि वृद्ध. या दोन टोकांच्या अवस्थांतील अपवाद म्हणजे सुधा करमरकर यांचे असणे. लाल भोपळा, चेटकीण, जादू, राक्षस आणि त्याचे अकटोविकट हसणे म्हणजे बालरंगभूमी असे आपल्याकडे फार काळ मानले गेले. मोठय़ांनी आब राखत छोटय़ांचे मनोरंजन करणे आपणास मान्य नाही. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’, असे साने गुरुजी आपल्याकडे म्हणून गेले खरे. परंतु मुलांसाठी काही करणे म्हणजे बौद्धिक कमीपणा किंवा शिंगे मोडून वासरांत शिरण्याचा आचरटपणा असेच आपण मानत राहिलो. डिस्नेचा लायन किंगसारखा मोठय़ांनाही लाजवील असा अवाढव्य प्रयोग आपल्याकडे घडला नाही. तो घडण्याची सुतराम शक्यताही नाही. कारण लहानांना बालबुद्धीचे म्हणून पाहण्याची सांस्कृतिक सवय आपल्यात भिनलेली आहे. वास्तविक मानसशास्त्र बालांचे वर्णन ‘मिनिएचर अ‍ॅडल्ट्स’ म्हणजे लहानग्या आकारातील प्रौढ असेही करते. भारतीय मानसिकतेस हे वास्तव लक्षात आल्याचे दाखवून देणारी उदाहरणे फारच कमी. बालांना लहान म्हणून वागवण्यातच आपल्याला कोण आनंद. लहानपणाची सरासरी करायची आणि डोक्यास कमीत कमी त्रास होईल असे वर्तन करीत काहीबाही करायचे म्हणजे बालनाटय़. अर्थात या काहीबाही करण्याच्या वर्तनाचा फटका पुढे मोठय़ांच्या रंगभूमीसही बसला, हे खरे. पण त्याची चर्चा नंतर. एरवी मुलांना एटू लोकांचा देश दाखवीत, पिशीमावशी भेटवणाऱ्या अजबखान्यात नेणारे विंदा, बालांसाठी म्हणून विशेष लिखाण करणारे आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, अरिवद देशपांडे, सुलभा देशपांडे, ढुम टकाटका ढुमसारखी बहारदार गाणी लिहिणारे गुलजार, अनंत भावे, रत्नाकर मतकरी हे असे सन्माननीय अपवाद कमीच. या मंडळींच्या रांगेत मानाचे पान मांडायलाच हवे अशी व्यक्ती म्हणजे अर्थातच सुधा करमरकर.

वास्तविक घरून सुधाताईंना वारसा मिळालेला होता तो तात्या आमोणकर यांच्यासारख्या नाटय़चळवळीचा. तात्यांच्या काळात बालरंगभूमी वगैरे संकल्पना असण्याची काही शक्यता नव्हती. ते गंभीर अशा साहित्य संघाच्या पठडीतले. त्या संस्थेत महत्त्वाच्या पदावर असलेले. त्या काळास सांस्कृतिक आकार देण्यात अ. ना. भालेरावांसारख्या रंगभूमीस वाहून घेतलेल्या साहित्य संघाचा मोठा आहे. तो काळच तसा भारलेला म्हणता येईल. बालगंधर्वाचा प्रभाव ओसरू लागलेला. त्याचा परिणाम म्हणून संगीत रंगभूमीचे बरे-वाईट झाले तर आपले काय होणार, असे वाटणारा रसिकांचा मोठा वर्ग घरोघरी उसासे टाकत होता. विजया मेहता, माधव वाटवे, विजय तेंडुलकर वगैरे मंडळी आणि रंगायन क्षितिजावरदेखील नव्हती. या अशा काळात सकारात्मक म्हणावी अशी होती एकच बाब. ती म्हणजे रंगभूमी आणि कलाविषयक जाणिवांचे जिवंत असणे. आपल्या मिजाशीत राहणाऱ्या आणि गाणाऱ्या केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, त्याआधीच्या हिराबाई, नंतरच्या मध्यमवर्गीय सात्त्विकतेत ‘क्षण आला भाग्याचा..’ म्हणणाऱ्या ज्योत्स्ना भोळे अशांच्या पुण्याईने रंगभूमीवर महिलांनी चेहऱ्याला रंग लावण्यातली नकोशी कधीच पुसली गेली होती. तो पहिला टप्पा. त्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी नव्या दमाचे रंगकर्मी दमसास घेत होते. आणि अशा वेळी सुधाताई अमेरिकेला गेल्या ते बालरंगभूमीच्या अभ्यासासाठी. हे सर्वार्थाने अद्भुत म्हणावे असेच. मुळात रंगभूमीत परदेशी शिकण्यासारखे काय आहे.. आपले नानासाहेब काय कमी आहेत की काय.. असे मानले जाण्याच्या काळात बालरंगभूमीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी जावेसे वाटणे हेच मोठे विलक्षण आहे. महाराष्ट्रात त्या काळी असे काही जगावेगळे करू पाहणारी आणि त्यांना ते तसे करू देण्याची, उसंत देण्याची प्रथा होती. महाराष्ट्र नर्मदेच्या वरील राज्यांपेक्षा चांगल्या अर्थाने वेगळा ठरतो ही त्या काळाची पुण्याई. असो. तर अमेरिकेत बालरंगभूमीचा अभ्यास करून सुधाताई भारतात परतल्या त्याच मुळी तसे काही आपल्याकडे करण्याच्या निश्चयाने. ही फारच मोठी, काळाच्या पुढे जाणारी उडी होती. ती पहिल्याच झटक्यात यशस्वी होण्याची तशी शक्यता कमीच होती. तसेच झाले. रत्नाकर मतकरी यांना हाताशी धरीत सुधाताईंनी साहित्य संघाच्या साह्य़ाने मधुमंजिरी हे पहिले बालनाटय़ सादर केले खरे, पण ते पहिल्यापासूनच डगमगत गेले. यामागचे कारण अर्थातच आर्थिक. ही १९५९ सालातली घटना. द. ग. गोडसे यांच्यासारख्या द्रष्टय़ा चित्रनेपथ्यकाराने या नाटकाची मांडणी केली होती हे लक्षात घेता त्याची उंची लक्षात यावी. या नाटकात सुधाताई चेटकीण करीत. पण या नाटकाचे चेटूक मुलांवर पडण्याआधीच त्यास साहित्य संघापासून घटस्फोट घ्यावा लागला. संघास हे झेपेना. सुधाताईंना वेगळे व्हावे लागले. वडिलांच्या मदतीने ही मुलगी संघ तर ताब्यात घेणार नाही, अशा भीतीने विरोध करणारेही त्यामागे होते. संघालाही बालरंगभूमीचे महत्त्व पटले नाही, हे कारणदेखील त्यामागे आहेच. पण बालरंगभूमीच्या ध्यासाने सुधाताई इतक्या भारलेल्या होत्या की संघापासून वेगळे व्हावे लागल्याचे जराही दु:ख न मानता त्यांनी बालांसाठीच वाहून घेतलेली स्वतंत्र संस्था काढली आणि १९५९ सालातल्या ऑगस्टात लिटल थिएटर या संस्थेचा जन्म झाला.

ही ऐतिहासिक घटना. मराठी रंगभूमीपुरतेच तिचे मोठेपण नाही. तर देशातही त्या वेळी अशी बालरंगभूमीस वाहिलेली संस्था नव्हती. मराठीत त्याआधी अप्पासाहेब शिरगोपीकर यांच्या ‘आनंद संगीत मंडळी’तर्फे काही बालनाटय़े सादर झाली होती. त्यांचे ‘गोकुळचा चोर’ हे कृष्णलीला सादर करणारे नाटक चांगलेच लोकप्रिय होते. परंतु त्यात बालरंगभूमीचा म्हणून असा विचार होता असे नाही. तो विचार पहिल्यांदा सुधाताईंनी केला. ते श्रेय निर्वविाद त्यांचेच. थोरांइतक्याच गांभीर्याने, भव्यतेने बालनाटय़े सादर व्हायला हवीत हा त्यांचा आग्रह असे. त्या काळी एकूणच आर्थिक चणचण ही समाजाच्या पाचवीस पुजलेली असताना ही चन परवडणे शक्य नव्हते. निर्मात्या म्हणून त्यांना आणि सादरकत्रे म्हणून नाटय़गृहांनाही. याचे कारण नाटके भले बालांसाठी असतील. परंतु त्यांचे महत्त्व पालकांना कळल्याखेरीज ज्यांच्यासाठी प्रयोग करावयाचे तो वर्ग नाटय़गृहात येणार तरी कसा, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेनासे झाल्यावर सुधाताईच मग प्रेक्षकांकडे जाऊ लागल्या. मुंबईतील विख्यात शाळांत त्या आपल्या नाटकांचे प्रयोग करीत. त्या वेळी राज्याच्या राजधानीत मातृभाषेचा आदर करणाऱ्या शैक्षणिक संस्था होत्या. अशा शाळांतून प्रयोग होऊ लागल्याने त्यांना हक्काचा प्रेक्षक मिळाला आणि कमी खर्चात रंगमंचाचीही सोय झाली. त्या वेळी प्रस्थापित नाटय़गृहे उपलब्ध नव्हती म्हणून मग सुधाताईंनी अमराठी नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रंगमंचाचाही आसरा घेण्यास कमी केले नाही. ही त्यांची जिद्द सर्वार्थाने कौतुकास्पद. ती त्यांना दाखवता आली यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे बालरंगभूमीस त्यांच्याइतकाच गांभीर्याने घेणारा डॉ. सुधाकर करमरकर यांच्यासारखा जोडीदार लाभल्यामुळे. डॉ. करमरकर यांचा वाटा लिटल थिएटरच्या यशात मोठा आहे. आजच्या रंगभूमीवरचे अनेक मान्यवर हे लिटल थिएटरच्या मांडवाखालून गेलेले आहेत. कळलाव्या कांद्याची कहाणी, मधुमंजिरी, बजरबट्ट अशी एकापेक्षा एक सरस नाटकांनी सुधाताईंनी किमान दोन पिढय़ांच्या शालेय वातावरणातल्या करपलेल्या बालपणात हास्य फुलवले. त्याच वेळी आविष्कार-चंद्रशालाच्या ‘दुर्गा झाली गौरी’ने- गुरू पार्वतीकुमारांसह देशपांडे दाम्पत्य, अरुणकाका काकडे यांनी काही काळ ही पुण्याई पुढे चालू ठेवली.

व्यावसायिक रंगभूमीवरही सुधाताईंनी उत्तम भूमिका केल्या. पण त्यांच्याविषयी अधिक कृतज्ञ राहायला हवे ते लिटल थिएटरसाठी. आता सुधाताई गेल्या, गौरी झालेली दुर्गाही दिसेनाशी झाली आणि आजचा बालवर्ग डोरेमॉन किंवा तत्समांच्या कबजात गेलेला पाहणे आपल्या नशिबी आले. सुधाताईंनंतर बालरंगभूमी तगली तरी ती वयानेच वाढली. जी झेप सुधाताईंनी घेतली, ती पुढच्यांना जमली नाही. पुलंचे एक सुंदर बालनाटय़ आहे ‘वयम् मोठ्ठम् खोट्टम्’. बालरंगभूमीचे ‘वयम् खोट्टम’ सुधाताईंनंतर दिसले. त्यांच्या निधनानिमित्ताने त्या बालरंगभूमीलाच ‘लोकसत्ता’ची आदरांजली.