भाषेकडे केवळ संवादाचे माध्यम म्हणूनच पाहण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. ती संस्कृतीची वाहक असते हे लक्षात घेतले जात नाही.

एकंदर भाषेच्या मुद्दय़ावर गुद्दय़ावर येणे हाच सांस्कृतिक उपक्रम असे मानले जात असल्याचा हा काळ. म्हणजे ‘शाळा सुटली – पाटी फुटली’च्या चालीवर ‘पाटी फुटली – भाषा वाचली’ अशी समज असणारे आजही आपल्या भोवती भरपूर आहेत. त्यामागे त्यांची जी भावना आहे, ती त्यांच्यापरीने प्रामाणिकच आहे. त्या भावनेवर शंका घेणे हे – निदान आजच्या काळात तरी – राज्यद्रोहाचा आरोप अंगावर ओढवून घेणे ठरू शकते. परंतु एक खरे की कोणतीही भाषा वाचवणे, टिकवणे, वाढवणे ही एक व्यापक सामाजिक मोहीम असते. स्वभाषेचा वापर सार्वत्रिक करणे हा त्यातलाच एक भाग. म्हणजे गाव महाराष्ट्रात असेल, तेथील बहुसंख्य मराठी भाषक असतील तर तेथील सर्व व्यवहार मराठीतूनच चालणे ही स्वाभाविक प्रक्रिया असावयास हवी. तसे होत नसेल, तर मात्र प्रश्न अस्मितेचा बनतो. मग पाटय़ा फुटतात. डोकीही फुटतात. फार काय, बॉम्बही फुटतात. आपण हे विसरूनच गेलो आहोत, पण खलिस्तान आणि तमिळ इलम या हिंसक चळवळींतील संघर्षांचा एक मुद्दा भाषिक अस्मितेबाबतचा होता. पण एकदा ही भाषिक अस्मिताही नीट समजून घ्यायला हवी. आपल्या भाषेचे सौष्ठव रोडावते, शब्दसंख्या कमी होते, नवी शब्दनिर्मिती थांबते म्हणून या अस्मितावाद्यांची माथी गरम झालेली असतात का? परंतु – उदाहरणार्थ – मराठी भाषेच्या नावाने गुलाल उधळणाऱ्या पक्षांच्या फलकांवरील मराठी पाहता तसे अजिबात दिसत नाही. एक वेळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. राजकीय कार्यकर्तेच ते. तसेही त्यांना एका वाक्यात शब्दांचे सात खून माफच असतात. या अस्मितावाद्यांप्रमाणेच भाषेच्या मुद्दय़ावर माथी गरम होत असतात ती भाषाशुद्धीवाल्यांची. त्यांना परभाषेच्या आक्रमणाची फारच चिंता असते. शक्य असते, तर त्यांनी आपल्या मराठीला फडताळातच ठेवले असते कडीकुलूप घालून. तसे करून भाषा जिवंत ठेवता येते असा त्यांचा प्राचीन समज. ही सर्व भाषिक अस्मितेच्या ऱ्हस्व राजकारणाचीच रूपे. त्यातून काहींचे राजकारण फळते-फुलते. पण भाषेचे काय? तिच्या जगण्या-मरण्याचे काय? आणि मुळात भाषेपुढे आज फक्त हीच आव्हाने आहेत का? भाषा संशोधक प्रा. गणेश देवी यांचे मत याबाबत वेगळे असून, भाषेबाबत किमान आस्था असणाऱ्या प्रत्येकाने ते समजून घेणे आवश्यक ठरते.

नुकतेच पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांचे भाषण झाले. त्याचे जे वृत्त प्रसिद्ध झाले त्यानुसार, भाषा मरतात, नष्ट होतात त्या त्यांची हेळसांड झाल्याने, असे त्यांचे मत आहे. योग्यच आहे ते. भाषा बोलणारे संपले की भाषा नामशेष होते हे जसे खरे, त्याचप्रमाणे बोलणारे भरपूर असूनही ती मरू शकते; म्हणजे तिचा सांगाडा उरतो, प्राण कधीच उडून गेलेला असतो, हेही खरे. भाषेचा हा प्राण म्हणजे ती ज्या समाजातून अवतरली, त्या समाजाची जन्मापासूनची संस्कृती. कोणत्याही भाषेतील शब्द म्हणजे केवळ स्वर आणि व्यंजनांचा समुच्चय नसतो. त्या शब्दांमागे संकल्पना असतात. त्या-त्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संस्कृतीमधून, परंपरांमधून त्या संकल्पना अवतरलेल्या असतात. त्या अर्थाने शब्द म्हणजे संस्कृतीचे वाहकच. सांस्कृतिक स्मृती घेऊन वावरत असतात ते आपल्या काळजात. परंतु अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रांना उपयुक्ततावादाने गिळून टाकले असल्याने भाषेकडेही केवळ संवादाचे माध्यम म्हणूनच पाहण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. आपण काय म्हणतो ते समोरच्याला समजले म्हणजे झाले. त्यासाठी भाषा चांगलीच असायला हवी, हा आग्रह कशाकरिता, असा त्यांचा सवाल असतो. येथे त्यांच्या हे लक्षातच येत नसते, की तुमची भाषा सशक्त नसेल, तर तुमचे सांगणे, तुमच्या भावना हे समोरच्यापर्यंत पोचूच शकणार नाहीत आणि समोरच्याची भाषाही तुमच्यासारखीच असेल, तर तो मुक्या-बहिऱ्यांचाच संवाद घडणार. आणि आज नेमके – निदान मराठीत तरी – सुरू आहे ते हेच. मराठी भाषेसमोर परभाषेचे, त्यातही खास करून इंग्रजीचे मोठे आव्हान आहे असे म्हणताना आपण कुठे तरी मूळ समस्येपासून तर पळ काढत नाही ना असे वाटत आहे. ते संकट नाकारून चालणार नाही. परंतु त्याहून मोठे संकट आहे ते मराठी सांस्कृतिक स्मृतींचे वहन करणाऱ्या शब्दांच्या हानीचे. भाषेच्या हेळसांडीचे.

मराठीची आपण कशी हेळसांड करीत आहेत हे दिसले ‘लोकसत्ता’ने कालच्याच अंकात प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तातून. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेल्या वाचक सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर आधारलेली ती बातमी होती. त्या शितावरून भाताची परीक्षा करायची तर आज महाराष्ट्रात ललित साहित्याचा वाचकवर्ग उरला आहे केवळ दहा टक्के आणि माहितीपर पुस्तकांना पसंती आहे ४० टक्के वाचकांची. चरित्रे, आत्मचरित्रे यांकडे २१ टक्के वाचकांचा कल. आता चरित्रे, आत्मचरित्रे म्हणजे साधारणत: माहितीपर, प्रेरणादायी या वर्गातच मोडणारी. हे गृहीत धरले, तर माहितीपर पुस्तकांना पसंती असलेला वाचकवर्ग साठ टक्क्यांवर जातो. खंत त्याची नाही. संगणकाचा वापर, आर्थिक गुंतवणूक आणि सहलींचे नियोजन ही अशी माहिती लोकांना हवी आहे हे चांगलेच आहे. ती काळाची गरजच आहे. खेद याचा, की कथा-कादंबऱ्या-कविता यांचा वाचक कमी झालेला आहे. भाषा समृद्ध करणारे, मानवी मन सुसंस्कृत होण्यास साह्य़भूत होणारे असे हे वाङ्मय. त्याकडेच मराठी समाज पाठ करीत असेल, तर या भाषेबरोबरच या समाजाचे भवितव्यही कठीण आहे. याचा अर्थ ही भाषा संपेल असे नाही. पण तिच्याबरोबर वाहत येणारी संस्कृती आटलेली असेल, सांस्कृतिक स्मृतींच्या वाहक शब्दांचा दुष्काळ पडलेला असेल, नव्या संकल्पना कवेत घेण्याची तिची ताकद संपलेली असेल. अशी अशक्त भाषा असलेला समाज हा आपसूकच एक भरकटलेला, असंस्कृत आणि म्हणूनच टुकार असेल. हाच समाज पुन्हा त्या भाषेचे झेंडे मिरवत तिचे अस्मितावादी ‘इव्हेन्ट’ही साजरे करीत असेल. काही प्रमाणात हे दिसूही लागले आहे. विखारी जल्पकांच्या झुंडी आज समाजमाध्यमांतून धुमाकूळ घालताना दिसतात, ते का उगाच? भाषेच्या हेळसांडीचेच हे परिणाम.

या हेळसांडीला असंस्कृत चंगळवादाने जसा हातभार लावला, तसाच तो बदलत्या तंत्रज्ञानानेही. प्रा. देवी यांच्या मते या तंत्रज्ञानामुळे लिखित भाषेचे स्वरूपच बदलू लागले आहे. आजची ही समाजमाध्यमस्नेही पिढी मोठय़ा प्रमाणावर चित्र आणि प्रतिमांवर अवलंबून राहू लागली आहे. पूर्वी निरक्षरांना अंगठेछाप म्हणत. आज अहोरात्र मोबाइल वापरणारी पिढी अंगठेछापच म्हणावी लागेल. पूर्वीचे निरक्षरही चित्र, प्रतिमांवर अवलंबून असत. ही पिढीही त्याच मार्गाने चाललेली आहे. फरक एवढाच की ही तरुण मुले हाताचे दोन्ही अंगठे वापरतात! आक्षेप त्यावर नाही. नव्या तंत्रज्ञानानुसार असे बदल होतच जाणार. आक्षेप हा आहे, की या तंत्रज्ञानाने लिखाणाला दृक् -श्राव्यतेची, चित्र-प्रतिमेची जी जोड दिली आहे, त्यामुळे शब्द मागे पडून प्रतिमाच मनाचा ताबा घेऊ लागल्या आहेत. भावना व्यक्त करण्यासाठी पूर्वी शब्द लागत. तेथे आता एका ‘इमोजी’तून काम भागू लागले आहे. परिणाम? संस्कृतीच्या स्मृतींचे हरवणे. जलसाठे टिकवून ठेवणारे भूगर्भातील खडक, तसे हे शब्द. ते समाजाचा सांस्कृतिक इतिहास जपून ठेवत असतात. ‘इमोजीं’च्या कितीही बखरी लिहून ठेवल्या तरी त्यातून तो इतिहास कसा उभा राहणार? आपला समाज असा बिनसांस्कृतिक इतिहासाचा होऊ नये यासाठी सदा सावधान राहिलेच पाहिजे. अन्यथा इमोजीची बखर हेच आपल्या पुढच्या पिढीचे वाचन असेल..