लेखकास मिळालेल्या प्रश्न विचारण्याच्या शापास नायपॉल यांनी कधीही उ:शाप शोधला नाही. म्हणूनच ते फार मोठे ठरतात..

लेखकाचा धर्म काय? प्रचलित मतलबी वाऱ्यांची दिशा ओळखून त्याप्रमाणे लेखन बेतायचे आणि लोकप्रिय व्हायचे की अलौकिकाची आस बाळगायची? लोकप्रिय होणे तसे सोपे. थोडीशी लेखनकला आणि बरेच सारे चातुर्य असले की आयुष्यभर लेखकराव म्हणून मिरवता येते. प्रचलित मूल्यांचे वारे ज्या दिशेने वाहात असतील त्या दिशेचा वारा आपल्या गलबताच्या शिडांत भरून घ्यायचा की झाले. लोकप्रियतेच्या बंदरास मग आपसूक आपले जहाज लागते. त्या तुलनेत अलौकिकत्व तसे अंमळ अवघडच. जखम वाहाती ठेवावी लागते सतत. स्वत:च्या मनास कायम धार लावत राहावे लागते. हे धार लावणे म्हणजे प्रश्न विचारणे. सतत. तेदेखील अपेक्षित प्रश्नसंचात न आढळणारे. पुन्हा ते एकदा आणि एकालाच विचारून चालत नाही. प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकास ते विचारावे लागतात. पण तेवढय़ाने भागत नाही. अशा प्रश्नांनी ओल्या राहणाऱ्या जखमेच्या वेदना आपल्या वाचकांच्या मनात पोहोचवाव्या लागतात. ते एकदा जमले की उत्कट लेखक म्हणून लोकप्रियतेची साय जमा होऊ लागते आणि लेखकाचा लेखकराव होऊ लागतो. बरेचसे याच टप्प्यावर स्थिरावतात. व्यवस्थेच्या विरोधाची हाळी घालून लक्ष वेधले गेले की मग स्वत:च व्यवस्था होऊ लागतात. अशा अनेक लेखकांचे स्मृतिस्तंभ शेकडय़ांनी आहेत आपल्या आसपास. अशा स्मृतिस्तंभांत स्वत:स थिजवून ठेवणे डोळसपणाने नाकारणारा उत्कट, करकरीत लेखक म्हणजे सर विद्याधर सूरजप्रसाद ऊर्फ विदिआ नायपॉल.

मोठेपणा मोजण्याच्या चतुर मोजमापांत नायपॉल मावणारे नाहीत. म्हणजे त्यांना बुकर पारितोषिक मिळाले, ते नोबेल सन्मानाने गौरविले गेले, चार्ल्स डिकन्स ते टोनी ब्लेअर यांच्यासारख्यांवर यथेच्छ टीका करूनही ब्रिटनने त्यांना ‘सर’की देऊन गौरवले वगैरे मुद्दे तसे गौण. बातमीच्या चौकटीपुरतेच. नायपॉल एवढय़ाच कारणामुळे मोठे नाहीत. ते फार मोठे ठरतात कारण लेखकास मिळालेल्या प्रश्न विचारण्याच्या शापास त्यांनी कधीही उ:शाप शोधला नाही म्हणून. हे प्रश्न त्यांनी मातृभूमी असलेल्या त्रिनिदाद देशास विचारले. अंगात ज्या संस्कृतीचे रक्त होते त्या भारतास विचारले. कर्मभूमी असलेल्या पाश्चात्त्य विश्वास विचारले आणि इस्लामसारख्या वरकरणी प्रश्नविरोधी वाटणाऱ्या संस्कृतीसही विचारले. या प्रत्येकाविषयी नायपॉल यांच्या मनात एक प्रकारची घृणा होती आणि आपल्या करवती लेखणीने ते ती सतत मांडत राहिले. असे करणे व्यावहारिकदृष्टय़ा धोक्याचे असते. कारण बाजारपेठीय मोजमापांत अडकलेले चतुरजन नकारात्मकतेचा शिक्का कपाळावर मारतात. माध्यमेही तोच मिरवतात आणि मग लोकप्रियपण हाती येता येता निसटून जाते की काय, अशी परिस्थिती तयार होते. लेखकांचा एक मोठा वर्ग या टप्प्यावर उसंत घेतो. जसे की सलमान रश्दी किंवा तस्लीमा नसरीन इत्यादी. कोणा संदर्भात प्रश्न उपस्थित केले की आपली लेखननौका आपसूक उचलली जाते हे एव्हाना कळू लागलेले असते. त्यामुळे आपली लेखनकला व्यवस्थित बेतून लोकप्रिय होणे सोपे जाते. नायपॉल यांनी असे लोकप्रिय होणे उत्साहाने आणि निगुतीने टाळले. नकारात्मकतेच्या टीकेस ते घाबरले नाहीत. व्यवस्थाधार्जिण्यांना नेहमीच सकारात्मकता आवडते. काय आहे त्याचा उदात्त गौरव करीत जगाचे कसे उत्तम सुरू आहे यासाठी आपली कला राबवणे म्हणजे जनताजनार्दनाच्या नावे व्यवस्था राबवणाऱ्यांना आवडणारी सकारात्मकता. अशा सकारात्मकतेची चैन  कलावंत आणि खऱ्या लेखकास परवडत नाही. अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी, चिं त्र्यं खानोलकर आदींसारख्या जीव पिळवटून टाकणाऱ्या आणि वेडावणाऱ्या वैश्विक लेखकांत नीरद चौधरी यांच्यासह नायपॉल यांचा समावेश करावा लागेल.

इस्लामचे ते कडवे टीकाकार होते. एके काळी पाश्चात्त्य जीवनाचे त्यांना आकर्षण होते. पण ते जीवन जगू लागल्यावर त्यांनी त्यावरही कठोर टीका केली. इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची संभावना तर त्यांनी चाचा (पायरेट) अशी केली. (पण म्हणून त्यांना इंग्लंडने राष्ट्रविरोधी ठरवले नाही की देशातून हाकलून द्या अशी मागणीही तेथे कोणी केली नाही. असो.) ई एम फॉर्स्टर, चार्ल्स डिकन्स यांनाही त्यांनी सोडले नाही. पाश्चात्त्य नजरेतून भारत वा आशियाई देशांकडे पाहणाऱ्यांची तर त्यांना घृणाच होती. तसे पाहणारे या देशांतील कथित उच्च, उदात्त आध्यात्मिकादी परंपरांचे गोडवे गातात. नायपॉल यांना ते मंजूर नव्हते. म्हणूनच आपल्या भारतभेटीनंतरच्या लेखनात त्यांनी तुडुंब वाहणारी गटारे, त्या आसपासच्या खुराडय़ात राहणाऱ्यांचे जगणे, आत्यंतिक बकालपणा आणि हातापायांच्या काडय़ा आणि फुगलेली पोटे घेऊन हिंडणारी लहान मुले यांना आणणे टाळले नाही. ‘अ हाऊस फॉर मि. बिस्वास’ या त्यांच्या अत्यंत लोकप्रिय कादंबरीच्या लेखनाने आलेल्या मनाच्या रिकामेपणात ते भारतात आले होते. त्यानंतरही ते अनेकदा आले. ऐंशीच्या दशकात मुंबईतल्या भेटीत ते नामदेव ढसाळसमवेत मुंबई पालथी घालती झाले. वंचितांचे जगणे त्यांना अनुभवायचे होते. या भेटीत ते काही समाजकारण्यांच्या घरीही गेले. त्यांतील दोघे एका पक्षाशी संबंधित होते. एक दीड खोलीचे आयुष्य जगणारा आणि दुसरा बंडखोरीतून स्थिरावलेला. त्या दीड खोलीत जगणाऱ्याकडे नायपॉल यांनी वैवाहिक सुखासाठी आवश्यक एकांत मिळतो का, अशी विचारणा केली होती तर दुसऱ्याकडे, त्याची ओढूनताणून पाहुणचार करण्याची हौस पाहून नायपॉल यांनी त्यास तुम्ही इतरांच्या समाधानासाठी का इतके झटता असे विचारले होते. पहिल्याने आपल्या वैवाहिक सुखाचे उदात्तीकरण केले आणि दुसऱ्याने भारतीयांसाठी पाहुणा कसा देवासमान असतो वगैरे पोपटपंची ऐकवली. नायपॉल यांच्या लेखनात वेगळ्या रूपात हे सर्व आले. ते खरे होते. कारण पुढे वैवाहिक सुखाची बढाई मारणाऱ्याने आपल्या पत्नीस मनोरुग्ण ठरवून दुसरा घरोबा केला आणि दुसरा संशयास्पद मार्गाने मिळवलेल्या संपत्तीसंचयाने मोठा होत गेला. एक खरा कलात्मक लेखक म्हणून नायपॉल या अशा संस्कृतीचे भाष्यकार होते. कॅरेबियनमध्ये त्यांचा जन्म झाला. पण कृष्णवर्णीयांविषयी त्यांना कणव नव्हती. त्यांच्या जगण्याचेही ते टीकाकार होते. त्यांचे वडील पत्रकार. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने ते शेक्सपियरच्या उत्तम कलाकृतींचे मोठय़ांदा वाचन करीत. त्यामुळे नायपॉल यांच्यावर लहान वयातच उत्तम वाङ्मयीन संस्कार होत गेले. आपण मोठेपणी लेखक व्हावे असे तेव्हाच त्यांच्या मनाने घेतले. पुढे इंग्लंडातील ऑक्स्फर्ड आदी अभिजनी विद्यापीठांत त्यांना शिक्षण घेता आले आणि अत्यंत वेगळी पाश्र्वभूमी लाभलेल्या संवेदनशील तरुणांची अशा वातावरणात वावरताना कशी घुसमट होते हेदेखील त्यांना अनुभवता आले. ही घुसमट थेट त्यांना आत्महत्येच्या टोकापर्यंत घेऊन गेली होती.

कलाकाराच्या मनाचा गुंता पूर्णपणे सुटणे अवघडच असते. अगदी निकटवर्तीयांनाही ते जमत नाही. नायपॉल यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांनाही ते साध्य झाले नाही. काही काळ तर प्रेयसीस मारहाण केल्याचीदेखील टीका त्यांच्यावर झाली. ते समर्थनीय नव्हतेच. अमेरिकी कादंबरीकार पॉल थेरॉ हा त्यांचा अत्यंत जवळचा मित्र. नायपॉल यांच्या अनेक प्रवासांत तो त्यांचा साथीदार होता. पण त्याच्याशीही त्यांचे तीव्र मतभेद झाले. एकदा एका जुन्या पुस्तकाच्या दुकानात पॉल यांना त्यांनी नायपॉल यांना स्वाक्षरीसह दिलेले पुस्तक आढळले. म्हणजे आपल्या जिवलग मित्राने दिलेल्या पुस्तकालाच नायपॉल यांनी बाहेरची वाट दाखवली. तेव्हा पॉल चिडणेही स्वाभाविक होते. दोघांतील दुरावा पंधरा वर्षे टिकला. पण नंतर ते पुन्हा जवळ आले. नायपॉल यांच्या निधनानंतर रविवारीच त्यांना पॉल यांनी वाहिलेली श्रद्धांजली अत्यंत उत्कट आहे. ‘नायपॉल आजच्या इंग्रजीतील सवरेत्कृष्ट लेखक ठरतात कारण ते खरे होते आणि त्यांचे लेखनही तसेच खरे होते. शब्दजंजाळात खरेपण दडवणाऱ्यांचा त्यांना कायम तिटकारा होता.’

या खरेपणामुळे त्यांनी आपल्या बोलण्यावरील, लिखाणावरील प्रतिक्रियेची तमा बाळगली नाही. १९९२ साली अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर काही वर्तमानपत्रांनी जागतिक भारतीय लेखकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यात नीरद चौधरी आणि नायपॉल यांची प्रतिक्रिया तेवढी वेगळी होती. इस्लाम समजून घेताना जो खोटा निधर्मीवाद अंगीकारला गेला त्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे बाबरी पाडणे, असे मत नायपॉल यांनी उच्चभ्रू निधर्मीवादय़ांची तमा न बाळगता निर्भीडपणे नोंदवले. विद्यमान सत्ताधारी भाजपस मिळालेल्या जनमताचा कौल हा त्याचाच निदर्शक असल्याचे त्यांचे मत होते. तसे त्यांनी बोलून दाखवले. भाजपने तेवढय़ाच मुद्दय़ाचा गवगवा करून नायपॉल यांना आंबेडकर, गांधी, सरदार पटेल यांच्याप्रमाणे ‘आपले’ मानण्याचा प्रयत्न केला. पण नायपॉल यांनी त्याच वेळी भाजपस ‘इतिहासात रमू नका, पुढे जा. नपेक्षा देश पाच हजार वर्षे मागे न्याल,’ असेही सुनावले होते. नकारात्मकतेच्या भाष्यकाराचे हे भाकीत खरे ठरले तर नायपॉल किती द्रष्टे होते ते कळेल आणि खोटे ठरल्यास आपण भाग्यवान ठरू. काहीही झाले तरी तो नायपॉल यांचाच विजय असेल. या ‘खऱ्या’ लेखकास ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.