बेळगाव जिल्ह्यतील मणगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविण्याची संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर, हा पुतळा पुन्हा उभारला जाईल, असे आश्वासन कर्नाटक सरकारने दिल्यामुळे या वादावर तात्पुरता का होईना, पडदा पडला. महाराष्ट्र सीमा भागातच नव्हे तर नागपूर, मुंबईसह ठिकठिकाणी आंदोलन झाले. हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची

चिन्हे असतानाच, सात दिवसांत पुतळा उभारण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. त्याची पूर्तता करावी लागेल. अन्यथा पुन्हा वाद उफाळून येऊ शकतो. मणगुत्ती  हे बेळगाव जिल्ह्यच्या हुक्केरी तालुक्यातील छोटे गाव. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांसह पाच पुतळे उभारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने गेल्या वर्षी घेतला होता. यानुसार ५ ऑगस्टला उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेला गावातील काही जणांनी विरोध केला. महालक्ष्मी यात्रेच्या वेळी या जागेचा वापर होतो, असे त्यांचे म्हणणे. मग दोनच दिवसांत क्रेनच्या साहाय्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला. पुतळा उभारण्यापूर्वी रीतसर परवानगी नव्हतीच, असाही युक्तिवाद या अधिकाऱ्यांनी केला. वास्तविक शिवाजी महाराजांचा पुतळा हा ग्रामपंचायतीच्या परवानगीनेच उभारण्यात आला होता. तो हलविल्यास जनक्षोभ उसळेल याचा विचार स्थानिक अधिकाऱ्यांनी करणे क्र मप्राप्त होते. तरीही गावातील एका गटाच्या विरोधातून पुतळा हटविण्यात आला. सीमा भागात काहीही आक्षेपार्ह झाल्यास त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात आणि हा वाद तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा. राज्यात शिवसेना तर कर्नाटकात भाजप सत्तेत. काहीच दिवसांपूर्वी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेरीस जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिल्याबद्दल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली होती. यावरूनही भाजपला घेरण्याचा प्रयत्न राज्यात झाला होता. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सतत आवाज उठविणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आल्यानंतर गप्प का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईसह अन्यत्र शिवसेनेतर्फे निदर्शने होत असताना केला. तर स्थानिक काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांच्याच मागणीमुळे पुतळा हटविल्याचा आरोप भाजप आमदार आशीष

शेलार यांनी के ला. पुतळे हे श्रद्धेचे प्रतीक समजले जातात. मुळात पुतळे उभारावेच कशाला, किती पुतळे उभारावेत, हे मुद्दे वादाचेच. परंतु एकदा का पुतळा उभारल्यावर त्याचे पावित्र्य जपावे लागते. कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांना नेमके  याचे भान आले नसावे. मणगुत्ती गावातील स्थानिक प्रशासनाने सर्वाशी चर्चा करून तोडगा काढणे आवश्यक होते. बेळगाव जिल्ह्यबाबत महाराष्ट्र – कर्नाटक संबंध एकदम नाजूक असतात. अशा वेळी ठिणगी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला होता. याच शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक सरकारने हटविल्याने भाजपची अधिकच पंचाईत झाली. शिवसेनेला आयतेच कोलीत मिळाले. शेवटी राज्यातील भाजप नेत्यांनी कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे लक्ष वेधल्यावर वादाला तूर्त विराम मिळाला. शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागी उभारला जावा ही शिवभक्तांची मागणी पूर्ण होईपर्यंत हा वाद धगधगता ठेवण्यात महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांना रस नसेल, पण शिवसेनेला असणे स्वाभाविक आहे.