नुकतेच भारतीय दौऱ्यावर येऊन गेलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वत:ची निवडणूक लढाईदेखील सुरू झाली आहेच. नोव्हेंबरात होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तरी प्रत्यक्ष अध्यक्षपदाची निवडणूक मध्यंतरी वाटली तितकी एकतर्फी होणार नाही अशी चिन्हे आहेत. याचे कारण म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाचे बर्नी सँडर्स यांची त्या पक्षातली उमेदवारी दिवसागणिक प्रबळ होऊ लागलेली दिसते. डेमोक्रॅटिक पक्षाचा आवाज सध्या तेच ठरले असून विविध विषयांवर ते मतप्रदर्शनही करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा हा विषय या बर्नीसाठी अजिबातच अप्रिय! ट्रम्प यांनी भारताशी ३०० कोटी डॉलरचे संरक्षणसामग्री करार केले, त्या वेळी सँडर्स यांनी ‘शस्त्रे कसली पुरवता त्यांना? त्यापेक्षा पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान पुरवा. जगाला त्याची गरज आहे’ असे म्हटले होते. ट्रम्प हे आपले परममित्र आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार म्हणतात. तो संदेश शिरोधार्य मानून त्यांच्या भाजप सहकाऱ्यांनी ट्रम्प यांच्याप्रमाणेच सँडर्स यांना आपला शत्रू मानण्यास सुरुवात केली असावी, अशी शंका आली, ती एका घटनेमुळे. भाजपचे एक ज्येष्ठ सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी एका ट्वीटद्वारे असे म्हटले होते, की ‘आम्ही कितीही तटस्थ राहायचे ठरवले, तरी तुम्ही (सँडर्स) आम्हाला अध्यक्षीय निवडणुकीत सक्रिय भूमिका घेण्यास भरीस पाडत आहात.’ संतोष यांनी लगेचच हे ट्वीट हटवले. त्यांनी इतके खवळून जावे, असे काय म्हणाले होते सँडर्स? त्यांचे ट्वीट होते, ‘भारतात २० कोटी मुस्लीम राहतात. दिल्लीत नुकतेच मुस्लीमविरोधी दंगलीत २७ लोक मारले गेले. तरीदेखील ट्रम्प म्हणतात हा भारताचा प्रश्न आहे. हे मानवी हक्कांविषयी संवेदनाहीन नेतृत्वाचे लक्षण ठरते.’ सँडर्स हे विरोधी पक्षीय असल्यामुळे ते सत्ताधीशांविरुद्ध काही तरी बोलणारच. त्यामुळे येथील कोणत्याही पक्षाच्या नेत्याने बिथरून जाण्याचे खरे तर काही कारण नाही. डेमोक्रॅटिक पक्षाचे अलीकडचे दोन अध्यक्ष बिल क्लिंटन आणि बराक ओबामा हे वरकरणी भारतस्नेही वाटत असले, तरी त्यांची काही धोरणे पराकोटीची भारतविरोधी होती. कारण त्यांनी त्या वेळचे अमेरिकी हितसंबंध पाहिले. पण ते कायमस्वरूपी भारतविरोधी राहिले नाहीत हेही खरेच. अमेरिकेच्या इतिहासात डोकावल्यास, डेमोक्रॅटिक अध्यक्षांपेक्षा रिपब्लिकन अध्यक्षच जरा अधिक (पण फार नाही) भारतस्नेही ठरले. हा झाला इतिहास. अमेरिकेत कोणत्याही डेमोक्रॅटिक नेत्याने मोदी-ट्रम्प दोस्ताना पाहून, भविष्यात भारतीय निवडणुकांमध्ये ‘सक्रिय भूमिका घेण्याची’ भाषा केलेली नाही. तो तेथील राजकीय शहाणिवेचा भाग आहे, जी किमान डेमोक्रॅटिक पक्षात तरी अजून बरीचशी शाबूत आहे. पण गतवर्षीच्या ‘हाउडी मोदी!’ कार्यक्रमानंतर  ुस्टनदेखील गुजरातसारखेच मोदी लाटेवर झुलते असा समज भाजपमधील काहींचा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प यांची तेथील उपस्थिती आणि गुजरातेतील उपस्थिती हा आणखी एक समान दुवा. ुस्टन, न्यूजर्सीसह आणखी काही भागांत ट्रम्प आणि मोदी यांचे समसमान चाहते आहेत, तेव्हा आम्ही तुमची निवडणूकही प्रभावित करू शकतो, ही येथील भाजपवाद्यांची भावना. रशियानेच गेल्या खेपेस अमेरिकी निवडणुकांत सुप्त शिरकाव केला होताच. बी. संतोषसारख्यांना तो व्यक्तपणे करायचा आहे काय? ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ ही त्याची सुरुवात तर नव्हती?