प्रख्यात कथ्थक कलाकार मंजरी चतुर्वेदी यांचा लखनऊतील एक कार्यक्रम, त्या कव्वाली सादर करत होत्या म्हणून अर्ध्यावर थांबवण्यात आल्याचे वृत्त अस्वस्थ करणारे आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशात घडून यावा हा योगायोग खचितच नाही. विशेष म्हणजे संबंधित कार्यक्रम उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने संयोजित करण्यात आला होता आणि मंजरी चतुर्वेदी कार्यक्रमाच्या विशेष निमंत्रित होत्या. १५ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या राजधानीत झालेल्या या प्रकारावरून वाद-प्रतिवाद झडू लागले आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने झालेले, ‘कार्यक्रमादरम्यान तांत्रिक दोष निर्माण झाला’ आणि ‘सादरीकरणाची वेळ संपली म्हणून आवरते घ्यावे लागले’ असे दोन खुलासे या प्रकाराबाबत संदिग्धता आणि संशय वाढवणारे ठरतात. याउलट मंजरी चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीमध्ये सातत्य आणि उद्वेग दिसून येतो. कलास्वादाची ‘तेहजम्ीब’ हे वैशिष्टय़ असलेल्या लखनऊ शहरालाही सांस्कृतिक झुंडवादाची झळ बसू लागल्याच्या या स्पष्ट खुणा आहेत. त्याबाबत विश्लेषण करण्यापूर्वी नेमका प्रकार काय झाला, याची सखोल तपासणी समर्पक ठरेल.

राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागाच्या वतीने लखनऊमध्ये आयोजित तीनदिवसीय कला महोत्सवात मंजरी चतुर्वेदी यांचे सादरीकरण होते. कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाची होती. ‘इश्क के रंग’ नामक सुफी-कथ्थक सादरीकरणाअंतर्गत चतुर्वेदी ‘ऐसा बनना सँवरना मुबारम्क तुम्हें’ ही कव्वाली सादर करत होत्या. अचानक साथसंगीत थांबले. ही तांत्रिक बाब असावी, असे चतुर्वेदी यांना वाटले. पण तसे नव्हते. कारण लगेचच पुढील कार्यक्रमाची घोषणाही ध्वनिक्षेपकावरून करण्यात आली. लगेचच उत्तर प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे काही अधिकारी रंगमंचासमोर आले आणि ‘कव्वाली नहीं चलेगी’ असे म्हणू लागले. मंजरी चतुर्वेदी यांच्या मते, कव्वाली सादरीकरणाला विरोध झाल्यामुळेच कार्यक्रम थांबवण्यात आला होता. विशेष म्हणजे, याच सादरीकरणाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी राधा-कृष्णावर सादरीकरण केले होते. कार्यक्रमात अनेक आमदार उपस्थित होते. उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती हरी नारायण दीक्षित पहिल्या रांगेत बसले होते. त्यांनी किंवा आमदारांनी या प्रकारात कोणताही हस्तक्षेप केला नाही. चतुर्वेदी यांनी नंतर सांगितले की, ‘‘४५ मिनिटांचा कार्यक्रम होईल, असा उल्लेख कार्यक्रमपत्रिकेत होता. त्यामुळे माझे सादरीकरण लांबण्याची शक्यताच नव्हती. सारे काही वेळेनुसारच सुरू होते.’’ गेली २५ वर्षे त्यांनी जवळपास ३५ देशांमध्ये कार्यक्रम केले आहेत. परंतु कोठेही त्यांचा कार्यक्रम अशा पद्धतीने थांबवण्यात आलेला नाही. या अवमानास्पद वागणुकीनंतर दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांची माफी मागितली आणि ‘यूपी दिवस’ म्हणजे २४ जानेवारी रोजी आणखी एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. ते त्यांनी का स्वीकारावे, हा प्रश्न उरतोच. संबंधित कव्वाली पाकिस्तानचे विख्यात गायक नुसरत फतेह अली खान यांनी अनेक ठिकाणी गायल्यामुळे प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे त्यात कदाचित उत्तर प्रदेशातील आणि लखनऊतील सांस्कृतिक झुंडवाद्यांना पाकिस्तान किंवा इस्लाम दिसून आला असेल. हा त्यांच्या कोत्या दृष्टीचा व शहाणिवेतील अभावाचा दोष आहे. उत्तर प्रदेशात किंवा इतरत्रही गेल्या काही वर्षांमध्ये ‘ते’ आणि ‘आपले’ असा वाद उपस्थित करून समाजमन दुभंगवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. पण उत्तर प्रदेशातील प्रकार अधिक गंभीर आहेत, कारण त्यांना तेथील योगी आदित्यनाथ सरकारचे अधिष्ठान लाभत आहे!

गोरक्षकांची पुंडाई, आमदारांच्या बलात्कार-खुनाच्या गुन्ह्य़ांपासून ते झुंडबळीपर्यंत घटना जितक्या सातत्याने उत्तर प्रदेशात घडत आहेत, तितक्या त्या इतर कोणत्याही राज्यात होताना दिसत नाहीत. गेल्या दशकात गुजरातला ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ असे संबोधले जायचे. ही प्रयोगशाळा आता वादातीतपणे उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरित झालेली दिसते. कव्वालीचा कार्यक्रम गुंडाळण्यात आला, कारण तेथे योगी आदित्यनाथ यांचे आगमन होणार होते, असेही आता बोलले जाते. आदित्यनाथांना कव्वालीसारखे कार्यक्रम पसंत नाहीत, असे कळते. परंतु सांस्कृतिक खाते त्यांच्याच अखत्यारीत आहे. त्याची कार्यक्रमपत्रिकाही त्यांच्या स्वाक्षरीशिवाय छापली जाणार नव्हती. मग मुळात न आवडणारा कार्यक्रम कला महोत्सवात ठेवलाच का गेला? याचे खरे उत्तर असे की, योगी आदित्यनाथ हे बेबंदपणे दुभंगवाद रेटणारे नेते आहेत. या राजकीय धोरणाचा तडाखेबंद फायदा २०१७ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झाल्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची कोणतीही गरज नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दुकलीला वाटत नाही. परंतु यामुळे सर्वाधिक नुकसान देशाच्या सहिष्णू आणि सांस्कृतिक प्रतिमेचे होते. याची कोणतीही पत्रास योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या धाकाने उत्तर प्रदेश प्रशासन व पोलीस पाळत नाहीत, हे खरे दुःख आहे.