दिवाळी. देशप्रेमाची. ‘जरा याद करो कुर्बानी’ म्हणत अश्रू ढाळण्याची. गोडधोडाची. फटाक्यांची. चिनी मालावर आणि पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्काराची. ती आता संपली. आता कवित्व सुरू आहे ते फटाक्यांचे प्रदूषण आणि त्यामुळे झालेल्या अपघातांचे, हानीचे. या दिवाळीचे हे एक वैशिष्टय़च ठरले. ते म्हणजे ती बऱ्यापैकी कर्णसुखद होती. दरवर्षी दीपावलीमध्ये दिवाळी पहाट या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. यंदाही ते झाले. मुंबईसारख्या शहरांत काही राजकीय पक्षांनी त्याबाबत जरा जास्तच आस्था दाखविली. त्यामुळे त्यांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे सुसंस्कृत जनांना श्रवणानंद मिळाला. एखाद्या सुरेल आलापीने तृप्त झालेल्या कानांवर पुढच्या एक-दोन दिवसांत अत्याचार होणार असतात. सर्वानीच हे गृहीत धरलेले असते. यंदा मात्र सर्वाच्याच कानांना जरा धक्का बसला. याचे कारण घटलेले आवाजी फटाक्यांचे प्रमाण. काही लोकांना भला मोठा आवाज झाला की खूप आनंद होतो. आपल्याकडे अशा लोकांचे प्रमाण भलतेच मोठे. त्यामुळे कानाचे पडदे फाडणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांना आपल्याकडे चांगलीच मागणी असे. अशा आवाजामुळे लहान मुलांना, वृद्धांना, गर्भवती महिलांना, रुग्णांना त्रास होतो. फार काय, प्राणी आणि पक्ष्यांनाही त्याचा फटका बसतो. परंतु आपल्या आनंदापुढे याची काय मातब्बरी असा विचार करणारे आनंदप्रेमी जगात खूप. यंदाच्या दिवाळीत त्यापैकी अनेकांना सुबुद्धी लाभली आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण कमी झाले. ही सुबुद्धी आली त्याची विविध कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत सरकारी आणि बिगरसरकारी संस्थांनी केलेली प्रदूषणाबाबतची जनजागृती. प्रदूषण गणेशमूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे असो, कर्णकटू भोंग्यांचे असो की फटाक्यांचे. ते टाळावे याकरिता अनेक संस्था आणि व्यक्ती झटत होत्या. केवळ आमच्याच सणातील प्रदूषण तुम्हाला दिसते का, असा अविवेकी सवाल करणारांचा विरोध सहन करून प्रदूषणाविरोधात जागृती करीत होत्या. याबाबत शाळा आणि तेथील शिक्षकांना आवर्जून गुण द्यावे लागतील. विद्यार्थ्यांना पर्यावरणस्नेही बनविण्यात या घटकांचे मोठे योगदान आहे. त्याच्या परिणामी या दिवाळीत किमान कानांवरील अत्याचाराचे प्रमाण तरी कमी झाले. काही संस्थांनी केलेल्या ध्वनिमापनातून हे दिसून आले. त्याचा आणखी एक दृश्य परिणाम म्हणजे या वेळी पशू आणि पक्ष्यांना फटाक्यांची कमी झळ लागली. पण याचा अर्थ फटाके कमी झाले असे नाही. फटाके फुटलेच. फक्त त्यात बिनआवाजी, नुसतीच रोषणाई करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण अधिक होते. या बिनआवाजी फटाक्यांमुळे व्हायचे ते वायुप्रदूषण झालेच. ते किती भयंकर असू शकते हे दिल्लीने साऱ्या जगाला दाखविले. दिल्लीतील प्रदूषणात फटाक्यांच्या धुराचा वाटा बराच मोठा आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतही ते जाणवले. येत्या काही दिवसांत त्या प्रदूषणाचे परिणामही ओसंडून वाहणाऱ्या दवाखान्यांतून पाहता येतील. वस्तुत सण हे आनंददायी. थकलेल्या तनामनांना उभारी देणारे. तेच माणसाला रुग्णाईत करीत असतील तर त्यांचे प्रयोजनच चुकले, हेतू फसले असे म्हणावे लागेल. याचा अर्थ केवळ दिवाळीसारखे सणच प्रदूषणकारी असतात असे नाही. प्रदूषण करणारे अनेक घटक, अनेक उद्योग आपल्या सभोवती आहेत. त्यात सणांची तरी आणखी भर पडू नये. येत्या वर्षांत, निदान दिल्लीतील वायुप्रदूषणाची तीव्रता पाहून तरी आपणांस त्याबाबत जाग येईल अशी आशा आहे. सणांवर चढलेली फटाकेबाजीसारख्या अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्या ज्योतीने ज्योती पेटत्या राहिल्या तरच सणांचे हेतू सफल झाले असे म्हणता येईल.

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन