News Flash

अंगणातले आयसिस

देशाच्या विविध भागांतील काही तरुण आयसिससारख्या अत्यंत क्रूर संघटनेमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत

NIA , abdul rauf , ISIS, isis recruitment network in India, Pune, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
isis recruitment network in India : इस्माईल अब्दुल रौफ हा कर्नाटकच्या भटकळ इथला मूळचा रहिवासी आहे. रौफ पुणे विमानतळावरुन दुबईला जात होता.

देशाच्या विविध भागांतील काही तरुण आयसिससारख्या अत्यंत क्रूर संघटनेमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत, ही चिंतेची बाब आहे. सव्वाशे कोटींच्या भारतात अशांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. तेव्हा उगाच काळजीने कपाळ बडवण्याचे कारण नाही, असे यावर कोणी म्हणेल; परंतु तसे म्हणणे ही आपणच केलेली आपली फसवणूक ठरेल. कल्याणमधील दोन-तीन, मालवणीतील दोन-तीन, आता नागपूर विमानतळावर ताब्यात घेतलेले हैदराबादचे तीन तरुण ही हिमनगाची टोके आहेत. मध्यंतरी मुंबईच्या मालवणीतील तीन तरुण बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. ते आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय तेव्हा पोलिसांनीच व्यक्त केला होता. मात्र त्यातील दोघे जण घरी परतले असून चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. त्यांचा आयसिसशी संबंध असल्याचे त्यांच्या चौकशीतून निष्पन्न झाले नाही. त्यामुळे प्रत्येक बेपत्ता मुस्लीम तरुण हा आयसिसच्या दिशेनेच गेला, असे म्हणणे ही पाठीवर पान पडताच आभाळ कोसळले, असे ओरडत पळणाऱ्या ‘पंचतंत्रा’तील सशासारखी मानसिकता झाली हे खरेच आहे; परंतु त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की, असे काही तरुण सीरिया वा इराकमध्ये गेले आहेत. मध्यंतरी पुण्यातील एक अकरावीतील विज्ञान शाखेची मुलगी आयसिसच्या विचारसरणीने भारावल्याचे उदाहरण समोर आले होते. नागपूरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांपकी दोघा जणांचा तर तो दुसऱ्यांदा आयसिसमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न होता असेही स्पष्ट झाले आहे. उघडकीस आलेल्या या उदाहरणांमधून मुस्लीम तरुणांमधील कट्टरीकरणाची व्यापकता लक्षात यावी. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पíरकर यांनी, आयसिसकडून होत असलेले कट्टरीकरणाचे प्रयत्न रोखण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असल्याचे म्हटले होते. ‘‘आयसिसचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी करण्याचे आमचे प्रयत्न होते आणि आम्ही त्यात यशस्वी ठरलो आहोत,’’ हे त्यांचे तेव्हाचे उद्गार होते. तो कदाचित त्यांचा ‘राजकीयदृष्टय़ा योग्य’ बोलण्याचा प्रयत्न असावा किंवा आपल्याकडील इस्लामवरील गंगाजमनी संस्कृतीच्या प्रभावामुळे येथे आयसिसच्या अतिरेकी इस्लामचा तितकासा प्रभाव पडतही नसेल; परंतु युरोपातील देशांचा अनुभव पाहता, त्याबाबत शहामृगी पवित्राही घेता कामा नये. इंटरनेटवरील समाजमाध्यमे हे सर्वच धर्मातील अतिरेक्यांच्या हातातील एक मोठे अस्त्र आहे. िहदूंमधील कट्टरतावादी वाढविण्यासाठी त्या माध्यमातून कशा प्रकारे विखारी, द्वेषपूर्ण प्रचार केला जातो, हे आपण पाहतोच. आयसिसकडूनही तसाच प्रचार केला जात असून, आयसिसमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे यासाठी इस्लाममधील ‘जिहाद’ या संकल्पनेचा अत्यंत कौशल्याने वापर केला जातो. या प्रचाराचा मुकाबला करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. ती प्रामुख्याने मुस्लिमांतील मान्यवरांची जबाबदारी आहे आणि त्यांना समाज म्हणून साथ देणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय मुस्लिमांना अलग पाडणे हे भारतविरोधी आहे हे समजून घेणे हा त्या कर्तव्याचा भाग आहे. मात्र आयसिसचा विचार हा इस्लामची प्रमुख विचारधारा असल्याचे इस्लामद्वेष्टय़ांचे मत जसे चुकीचे, तसेच धर्माचा दहशतवादाशी संबंध नसतो हे इस्लामद्वेष्टय़ांच्या विरोधातील लोकांचे मतही चूक आहे. इस्लामचे नाव घेऊन जिहाद पुकारला जात असेल, तर तो इस्लामचाच अपमान आहे हे सांगण्याचे काम मुस्लिमांचेच आहे. त्यात कमतरता राहिल्यामुळेच आयसिस आपल्या अंगणात आले आहे. ते रोखण्यासाठी धर्माला आधुनिक मूल्यविचारांशी जोडण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 1:02 am

Web Title: information about isis group
Next Stories
1 फक्त कोल्हापूरच का?
2 आता तरी जाग यावी
3 शिक्षण खात्याची नामुष्की
Just Now!
X