स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या युवतीलाच खंडणीखोरीप्रकरणी अटक करण्याचा, उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) निर्णय अनेक बाजूंनी संशयास्पद ठरतो. संबंधित युवतीने मंगळवारी अटकपूर्व जामिनासाठी शहाजहानपूर येथील स्थानिक न्यायालयात अर्ज केला होता. त्या न्यायालयाने युवतीची याचिका दाखल करून घेतली आणि गुरुवारी त्या याचिकेवर निर्णय अपेक्षित होता. पण त्यापूर्वीच म्हणजे मंगळवारी सकाळी युवतीला ताब्यात घेतले गेले. तिच्याविरुद्ध खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि लगोलग १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही देण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना मुळात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची विशेष दखल (सुओ मोटो) घेऊन केली होती. ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे, ते चिन्मयानंद हे अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. भाजपचे ते माजी खासदार. ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर आरोप करणारी युवती तुरुंगात आहे आणि तिच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलू नये, असे निर्देश एसआयटीने दिलेले आहेत. युवतीच्या वडिलांनी बुधवारी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. त्यानंतर, अशा प्रकारे माध्यमांशी बोलल्यास तुमच्या मुलीविरुद्धच्या (खंडणीखोरीच्या) खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असे बजावण्यात आले आहे. चिन्मयानंद यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा (कलम ३७६) दाखल झालेला नसून त्याऐवजी आदरस्थानी असल्याच्या गैरफायद्यातून लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा (कलम ३७६ क) गुन्हा दाखल केल्याबद्दल विविध संघटना आणि युवतीच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे. या कलमातील शेवटचा उल्लेख ‘बलात्कार ठरू न शकणारा’ (नॉट अमाऊंटिंग टू रेप) असा असून, त्यामुळे चिन्मयानंद यांची संभाव्य शिक्षा काहीशी सौम्य होऊ शकते. उन्नावपाठोपाठ शहाजहानपूरमधील या प्रकरणात एक धागा समान आहे. तो म्हणजे, संशयिताऐवजी पीडितेविरुद्धच पोलीस आणि प्रशासन यंत्रणा उभी ठाकल्याचे दिसून येते. उन्नावमध्ये तर पीडितेला जिवे मारण्याचाही प्रयत्न झाला होता. शहाजहानपूरमधील प्रकरणातील पीडिता अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीसंदर्भात न्यायालयात जात असताना तिला अटक झाली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे तिच्याकडून चिन्मयानंद यांच्याशी संबंधित घेतल्या जाणाऱ्या जाबजबाबांवर मर्यादा येणार हे उघड आहे. चिन्मयानंद हे भाजपचे सदस्य नाहीतच, असे त्या पक्षाचे उत्तर प्रदेशातील प्रवक्ते हरीश श्रीवास्तव यांनी जाहीर केले आहे. वास्तविक चिन्मयानंद  १९९१ (बदाऊन), १९९८ (मछलीशहर) आणि जौनपूर (१९९९) अशा तीन लोकसभा निवडणुका भाजपच्या तिकिटावर लढले आणि जिंकले. वाजपेयी मंत्रिमंडळात ते गृहराज्यमंत्री होते. त्यांनी स्वत: आपण लज्जास्पद कृत्य केल्याचे कबूल केल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. त्यांच्यावरील आरोपाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. चिन्मयानंद यांनी भाजपचे सदस्यत्व कधी सोडले, याचा खुलासा झालेला नाही. तसेच ते भाजपचे सदस्य ‘कधीही नव्हते’, असेही एक ट्वीट भाजपतर्फेच जारी करण्यात आले. दोन विधानांमध्ये हा फरक काय सांगतो? उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने ३० महिने पूर्ण केल्याबद्दल गेल्या गुरुवारी कार्यक्रमांचा धडाका उडवून देण्यात आला होता. ‘इतर कोणत्याही राज्यापेक्षा उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे’ असा दावा मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी केला. परंतु सोनभद्र हत्याकांड, उन्नाव बलात्कार प्रकरण, शहाजहानपूर कथित बलात्कार प्रकरण, पोलीस अधिकाऱ्याचा झुंडबळी, झुंडबळीची इतर प्रकरणे यांमुळे आदित्यनाथ यांचे प्रगतीपुस्तक गुन्हे नियंत्रणाच्या बाबतीत तरी लाल शेऱ्यांनीच भरलेले दिसते. हे मान्य करून त्या दृष्टीने पावले उचलणे आदित्यनाथांपेक्षाही उत्तर प्रदेशच्या जनतेच्या दृष्टीने हितावह ठरेल.