18 November 2017

News Flash

गणिताची हद्दपारी

गणित हा विषय ‘ऑप्शन’ला टाकण्याची मुभा द्यावी, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

लोकसत्ता टीम | Updated: June 21, 2017 2:24 AM

ज्या भारताने जगाला शून्य ही संकल्पना सांगितली आणि त्याच्या आधारावर माणसाने गणित ही जीवनव्यापी विज्ञान शाखा निर्माण केली, त्याच भारतातील विद्यार्थ्यांना गणित हा विषय सर्वात अवघड वाटावा, हे क्लेशदायी आहे. विद्यार्थ्यांना इतिहासातील सनावळी पाठ करण्याचा जसा त्रास होतो, तसाच भूगोलातील खारे आणि मतलई वाऱ्यांचाही. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांही मुलांना अवघड वाटतात. हिंदी आणि इंग्रजीचे एक वेळ ठीक, त्या मातृभाषा तरी नाहीत; त्यामुळे त्यांचे व्याकरण, त्यातील लय आणि शब्दकळा यांच्याशी गाठीभेटी होण्यास काही काळ जावा लागतो. पण मराठी तर जन्मल्यापासूनच न शिकवता येणारी भाषा. तरीही गेल्या चार वर्षांत मराठीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.२९ वरून ९०.२१ पर्यंत घसरली आहे. या सगळ्या घटना पाहता उच्च न्यायालयाने एक वेगळाच आणि अनाकलनीय तोडगा सुचवला आहे. गणित हा विषय ‘ऑप्शन’ला टाकण्याची मुभा द्यावी, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. गणित आणि भाषा या विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे शाळा सोडण्याकडे त्यांचा कल असतो, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने गणित हा विषय पर्यायी करता येईल काय, याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे केल्यास विद्यार्थ्यांना कला शाखेची पदवी सुलभपणे मिळवता येईल, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. हे म्हणणे ग्राह्य़ धरायचे, तर असे आणखी बरेच विषय पर्यायी म्हणून द्यावे लागण्याची शक्यता आहे. भारतातील विद्यार्थ्यांचे गणित कच्चे आहे, असे म्हणावे, तर अभियांत्रिकीसारख्या गणितावर आधारित विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची भरारी वेगळेच निष्कर्ष काढते. आयआयटीमधील प्रवेश असो की स्थापत्यशास्त्रासारखा विषय असो; तेथे तर गणिताशिवाय डाळच शिजणे अशक्य. कला शाखाच नव्हे, तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही गणित सक्तीचे असतच नाही. तरीही गणित कच्चे आहे, म्हणून त्याला पर्याय द्यावा, हे म्हणणे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण प्रगतीस खीळ घालणारे आहे, असेच म्हणायला हवे. अगदी चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात गणितातील पाढय़ांच्या बरोबरीने औटकी, पाऊणकीचे पाढेही पाठ करणे अत्यावश्यक ठरत असे. बीजगणित आणि भूमितीमधील पायथागोरसच्या सिद्धान्ताने अनेकांची झोपही उडवली होती. तरीही गणित हे जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यावश्यक ठरते, हे विसरून चालणार नाही. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे, असे म्हणतात. ते इतके खरे आहे, की त्याचा जीवनशैलीशी अतिशय निकटचा संबंध प्रस्थापित होत असतो. अमूर्तातून भौतिकतेकडे वाटचाल कशी करायची, याची जाणीव करून देणाऱ्या गणित या विषयास शालेय अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान असायला हवे. दुर्दैव असे, की गणित एखाद्या गोष्टीसारखे रंजक करून शिकवणारे अध्यापक हळूहळू नाहीसे होऊ लागले आहेत. अनेकांचे गणित कच्चे राहिले, याचे कारण त्यांचे शिक्षक कच्चे होते हेच आहे. गणित शिकवणारा चांगला अध्यापक विद्यार्थ्यांमध्ये किती जादू करू शकतो, याचीही अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. पण शिक्षकांना गणित शिकवता येत नाही, म्हणून विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात आणि म्हणून हा विषयच नसला तरी चालेल, हे मात्र गणिती तर्कशास्त्राच्या अगदीच विरुद्ध आहे. आयुष्यातील कोणताही कठीण निर्णय घेताना गणिती विचार पद्धती अतिशय उपयुक्त ठरते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आपण त्यालाच पर्याय देऊ लागलो, तर मग जगण्यातील गुंतागुंत सोडवताना आयुष्यात किती अनंत अडचणी येतील. ज्ञानाच्या विस्ताराच्या अतिवेगामुळे शिणलेल्या मुलांसाठी भविष्यात ही गुंतागुंत अधिक असणार आहे, असे समाजशास्त्रज्ञांना वाटते. या सगळ्याकडे काणाडोळा करून गणितालाच हद्दपार करणे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक अपंगत्वास निमंत्रण देण्यासारखे आहे, हे ध्यानात घेतलेच पाहिजे.

First Published on June 21, 2017 2:11 am

Web Title: maths optional subject education department high court