ऑलिम्पिक, एशियाड आणि राष्ट्रकुलसारख्या बहुविध क्रीडाप्रकारांच्या स्पर्धामध्ये भारताला पूर्वीपेक्षा अधिक पदके मिळत असली, तरी ती ‘व्यवस्थेमुळे’ नव्हे, तर ‘व्यवस्थेशिवाय’ मिळतात. म्हणूनच व्यवस्था सुधारली, तर सध्यापेक्षा किती तरी अधिक पदके मिळू लागतील आणि क्रिकेटकडून मोठय़ा संख्येने तरुणाई इतर खेळांकडे वळू लागेल. व्यवस्था सुधारण्याची गरज किती नितांत आहे हे भारतात कार्यरत असलेल्या एका जर्मन प्रशिक्षकाने ‘द संडे एक्स्प्रेस’ला पाठवलेल्या ई-मेलमधून पुन्हा एकदा पुरेसे स्पष्ट होते. उवे हॉन हे एके काळचे विख्यात भालाफेकपटू आता प्रशिक्षक बनले असून त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाचा लाभ भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला मिळत असतो. २० वर्षीय नीरज चोप्राकडून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा बाळगता येईल, अशी त्याची या वर्षांतली कामगिरी झाली. राष्ट्रकुल आणि एशियाड या दोन्ही क्रीडा स्पर्धामध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरज सातत्याने ९० मीटरच्या जवळपास भाला फेकत असून, ही कामगिरी सध्या तरी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्याला पदक जिंकून देण्यासाठी पुरेशी ठरते, असा तज्ज्ञांचा होरा आहे. नीरज अर्थातच एवढय़ावर समाधानी नाही. त्याला आणखी प्रगती करायची आहे. यासाठी भरपूर प्रशिक्षण लागते. प्रशिक्षणासाठी वेळ, जागा आणि सुविधा लागतात. त्यांचा अभाव असल्याची तक्रार हॉन यांनी ई-मेलमध्ये केली आहे. त्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणावर (साइ) ठपका ठेवला आहे. अनास्था हा या प्राधिकरणाचा स्थायीभाव असल्याची तक्रार यापूर्वीही अनेकांनी केली होती. हॉन यांनीही एक मासला दिला. नीरजसाठी आधुनिक भाले पुरवण्याबाबत दोन कंपन्यांना कळवावे यासाठी विनंतीवजा पत्र त्यांनी ‘साइ’कडे पाठवले. तिथल्या अधिकाऱ्यांनी पत्र अनेक दिवस उघडून पाहण्याचीही तसदी घेतली नाही! अशा प्रकारच्या ‘बाबू’शाहीमुळे अपुऱ्या सुविधा, अपुरा आहार, सामग्री पुरवण्यात विलंब, अप्रशिक्षित सहायकवृंद अशा अनेक समस्यांना खेळाडूंना तोंड द्यावे लागते. परदेशातून प्रशिक्षक आणले, तरी त्यांची कोणतीही मागणी सहसा मान्य होत नाही. त्यामुळे ते कंटाळून निघून जातात आणि त्यांच्यासाठी केलेली गुंतवणूक (पगार वगैरे) अक्षरश: फुकट जाते. नीरज चोप्राने आणखी एका समस्येवर बोट ठेवले. सत्कार-समारंभच संपेनात, तेव्हा प्रशिक्षण घ्यायचे कधी? मागे विख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद एक महत्त्वाची लढत खेळत होता. त्याच्यावरही सत्कारांचा इतका भडिमार झाला, त्यामुळे प्रशिक्षणाकडे पुरेसा वेळच देता आला नाही. परिणामी आनंद ती लढत हरला! क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड हे स्वत: ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. त्यामुळे उत्तम खेळाडू घडवण्यासाठी काय सायास पडतात, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. नीरज आणि हॉन यांना चांगल्या सुविधा आणि परदेशात प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी या ईमेलनंतर दिले आहे. पण क्रीडा प्राधिकरणातील अनागोंदी आणि अनास्था सुधारल्याशिवाय भविष्यात मोठय़ा संख्येने गुणवान खेळाडू घडू शकणार नाहीत. मग ‘खेलो इंडिया’सारख्या भव्य योजनाही इतर अनेक घोषणांप्रमाणे कागदावरच आकर्षक ठरतील. ऑलिम्पिकमध्ये २०१२च्या तुलनेत २०१६मध्ये भारताचा आलेख घसरला होता. कारण सारे काही छानच चालले आहे, या गैरसमजात आपण राहिलो. या देशात क्रीडा संस्कृती अद्याप रुजलेली नाही. ती रुजण्यासाठी निव्वळ खेळाडूंकडून शिस्त आणि कामगिरीची अपेक्षा धरणे अन्याय्य ठरेल. त्यासाठी व्यवस्थेमध्येही शिस्त आणावी लागेल, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.