फ्रेंच अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांचा पराभव होणे ही जेवढी धक्कादायक बाब आहे तेवढेच त्या निवडणुकीत सार्कोझी यांचे उजवे हात मानले जाणारे माजी पंतप्रधान फ्रान्स्वॉँ फिलॉन हे दुसऱ्या स्थानावर येणे हेही आश्चर्यजनक आहे. सार्कोझी हे तसे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. जहाल उजवी मते, भ्रष्टाचाराचे आरोप, भंपक वक्तव्ये अशा गोष्टींमुळे ते नेहमीच वादात राहिलेले. तरीही त्यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचेच पारडे जड होते. याचे साधे कारण म्हणजे येत्या मे महिन्यात फ्रान्समध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यात नॅशनल फ्रंट या अतिरेकी उजव्या पक्षातर्फे जहाल नेत्या मेरीन ले पेन या उमेदवार म्हणून असणार आहेत. या ले पेन म्हणजे फ्रान्समधील डोनाल्ड ट्रम्पच. त्यांचा मुकाबला करण्याचे बळ असेल ते एकटय़ा सार्कोझींमध्ये अशीच आजवरची धारणा होती. त्यामुळे रिपब्लिकन उमेदवाराच्या निवडणुकीत तेच निवडून येतील अशी खात्री वर्तविण्यात येत होती. झाले उलटेच. फिलॉन हे फारसे गणतीत नसलेले उमेदवार पहिल्या क्रमांकावर निवडून आले. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली माजी पंतप्रधान अलान ज्युपे यांना. सार्कोझी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या निकालाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अंतावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनीही आता राहिलो मी पाठिंब्यापुरता, असे जाहीर करून ते मान्य केले आहे. त्यांचा पाठिंबा असणार आहे फिलॉन यांना. येत्या रविवारी उमेदवार निवडीची दुसरी फेरी होणार आहे. त्यात त्यामुळे फिलॉन हे ज्युपे यांच्यावर मात करतील अशी दाट शक्यता आहे. तसे झाल्यास अध्यक्षपदाच्या स्पर्धेत ले पेन यांच्यासमोर रिपब्लिकनांतर्फे असतील फिलॉन. हा सामना रंगतदार होईल यात शंका नाही. आजवरची ले पेन यांच्या नॅशनल फ्रंटची सर्व प्रचार मोहीम सार्कोझी किंवा ज्युपे यांना नजरेसमोर ठेवून आखण्यात आली होती. रविवारच्या निवडणुकीत फिलॉन जिंकले तर तो ले पेन यांच्यासाठी मोठा धक्का असेल. याचे कारण फिलॉन यांची विचारसरणी. लंडनच्या ‘गार्डियन’ने त्यांचे मार्मिक वर्णन केले आहे. आर्थिक मते मार्गारेट थॅचर यांच्यासारखी उजवी, सामाजिक मते कॅनडाच्या स्टीफन हार्पर यांच्यासारखी म्हणजे सनातनी आणि राजकीय मते व्लादिमीर पुतिन यांच्या जवळ जाणारी म्हणजे पुन्हा उजवी, हुकूमशाहीकडे वळणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे आपण अभिजन वर्गाविरोधात असल्याची प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. ले पेन यांच्या दृष्टीने ही बाब अधिक अडचणीची ठरणार आहे. त्यांचे स्वत:चे जहाल उजवे राजकारण हे सगळी व्यवस्था कशी अभिजनवादी आहे, भ्रष्ट आहे, बहुजनविरोधी आहे, माध्यमेही कशी उच्चभ्रू आहेत, याच रुळावरून चाललेले आहे. अभिजनांच्या हातून सत्ता निसटत चालली असल्याचेच ट्रम्प यांच्या विजयातून दिसले, ही त्यांची प्रतिक्रिया होती; परंतु फिलॉन हेही यापेक्षा काही वेगळे सांगत नाहीत. ते अर्थातच ले पेन यांच्याइतके जहाल नाहीत; पण अभिजनविरोधी भूमिकेमुळे त्यांचा प्रतिवाद करणे ले पेन यांना काहीसे कठीण जाईल. हे काहीही असले, तरी एकंदर पुढची निवडणूक ही उजवे आणि अतिउजवे यांच्यातच होणार असून, तेथील डाव्या समाजवादी पक्षांना त्यात काहीही स्थान असणार नाही. ट्रम्प यांच्या विजयाने एक प्रकारचा उजवा-समाजवाद अमेरिकेत अवतरला, तशीच गत – ले पेन येवोत वा फिलॉन – फ्रान्सची होणार आहे हे नक्की. अरब स्प्रिंगमध्ये तेथील जुन्या व्यवस्था कोलमडून पडल्या. सार्कोझी यांच्या पराभवाने तशाच प्रकारचा वसंत युरोपात अवतरणार असल्याची द्वाही दिली आहे.