‘मारुती कांबळेचे काय झाले,’ हा ‘सामना’ चित्रपटाने महाराष्ट्रासमोर ठेवलेला चिरंतन सवाल. त्याचे उत्तर अजून हाती लागायचे आहे. पण आता ते शोधण्यातील रसच संपला आहे समाजाचा. त्यामुळे ‘मारुती कांबळे’चे जे पूर्वी होत होते, तेच आजही होताना दिसते. फरक एवढाच की, ‘काय झाले’ हा सवाल मात्र आज विचारला जात नाही. हैदराबाद विद्यापीठातही गेल्या वर्षीच्या जानेवारीत असाच एक सवाल आला. तेथील ‘मारुती कांबळे’चे नाव होते रोहित चक्रवर्ती वेमुला. पीएच.डी. करीत असतानाच ‘आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशन’ (एएसए) या विद्यार्थी संघटनेचे काम करायचा तो. १७ जानेवारी २०१६ रोजी त्याने आत्महत्या केली. त्यावरून हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. त्यात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी उतरले. पाहता पाहता आंदोलन देशातील विविध विद्यापीठांत पसरले. आंदोलकांचे म्हणणे होते, की तो जातीय अन्यायाचा बळी होता. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार याकूब मेमनला फाशीची शिक्षा झाली. आंबेडकरी विचारांचा फाशीच्या शिक्षेलाच विरोध आहे. त्यामुळे त्यांनी त्याविरोधात निदर्शने केली. त्यावरून अभाविप आणि एएसए यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. अभाविपने केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे तक्रार केली. हे आंबेडकरी कार्यकर्ते जातीयवादी आणि देशद्रोही विचार पसरवीत असल्याचे त्यात म्हटले. दत्तात्रेय यांनी ते पत्र तेव्हाच्या मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे पाठविले आणि त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव यांनी रोहित आणि इतर विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढले. त्या आदेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रोहितने एक पत्र लिहून आपले जीवन संपविले. तेव्हा हे सारे त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहेत असा आरोप करण्यात आला. हा आरोप म्हणजे भाजपच्या दलितप्रेमी प्रतिमेला काळिमाच. तो दूर करण्यासाठी मग माजी न्यायमूर्तीची चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने रोहित वेमुलाचे काय झाले, या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधून काढले, की रोहित वेमुला हा दलित नव्हता. त्याची आई अनाथ, दलित. तिचे ओबीसी व्यक्तीशी लग्न झाले. पुढे त्याला जेव्हा ती दलित आहे हे समजले तेव्हा त्याने तिला अस्पृश्यासारखी वागणूक देण्यास सुरुवात केली. तिला घर सोडावे लागले. दलिताचे जगणेच जगावे लागले. तेव्हा स्थानिक नागरिकांपासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वाच्या दृष्टीने ते सारे दलितच होते. पण कायदा सांगतो, तो दलित नव्हता. तेव्हा ‘काय झाले’ हा प्रश्नच गैरलागू ठरला आहे. आपला जन्म हाच प्राणघातक अपघात आहे, असे रोहितने मरणापूर्वी लिहून ठेवले होते. कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात त्याने आम्हाला फाशीचा दोर आणून द्या असे संतापाने सुनावले होते. परंतु तो दलित नसल्याचे आता सिद्ध झाल्यामुळे त्याच्या आक्रोशाला काहीच अर्थ राहत नाही. कागदोपत्री दलित नसल्याने त्याला जे भोगावे लागले त्याला सरकार काहीही करू शकत नाही. राहता राहिला प्रश्न त्याच्या आत्महत्येचा. तर ‘ती त्याने जिवाला वैतागून केली. का वैतागला होता ते त्याचे त्यालाच माहीत’ हे चौकशी समितीचे उत्तर आहे. तेव्हा सगळेच सवाल मिटले. यावर कारवाईची तर गरजच नाही. पोरे मरतात. काँग्रेस सरकारच्या काळातही मरतच होती. तेव्हा आताच जर रोहित वेमुलाचे काय झाले हा सवाल कोणी करीत असेल, तर ते राजकारण आहे हे समजून जावे. मारुती कांबळे काय अन् रोहित वेमुला काय, हे आजचे सवाल असूच शकत नाहीत.