13 December 2018

News Flash

एकत्र येण्याची सुरुवात?

तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि द्रमुकमधून विस्तवही जात नाही.

तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि द्रमुकमधून विस्तवही जात नाही. अण्णा द्रमुक सत्तेत आल्यावर एका मंत्र्याने द्रमुकच्या शिष्टमंडळाला फक्त भेट दिल्याचे निमित्त झाले आणि त्या मंत्र्याची जयललिता यांनी तात्काळ हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव आणि बसपच्या नेत्या मायावती यांच्यातही विळ्या-भोपळ्याचे नाते. १९९५ पासून गेली २३ वर्षे समाजवादी पार्टी आणि बसपमध्ये कधीही सख्य नव्हते. १९९२ च्या राम मंदिर आणि बाबरी मशीद वादात उत्तर प्रदेशचे राजकारण ढवळून निघाले, तेव्हा १९९३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्याकरिता समाजवादी पार्टी आणि बसप एकत्र आले. ‘मिले मुलायम और कांशीराम, हवा में उड गडा जय श्रीराम’ ही तेव्हा घोषणाच उत्तर प्रदेशात प्रसिद्ध झाली होती. दोन्ही नेते एकत्र आले आणि मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. पुढे १९९५ मध्ये बसपने मुलायम सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार अल्पमतात आले. तेव्हा घडलेल्या ‘लखनऊ गेस्ट हाऊसकांड’ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घटनेमुळे मुलायमसिंग आणि मायावती यांच्यात कायमचे वितुष्ट आले. सरकार अल्पमतात आल्याने संतप्त झालेल्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मायावती उपस्थित असलेल्या लखनऊतील शासकीय अतिथिगृहात घुसून गोंधळ घातला होता. मायावती यांचे कपडे फाडण्याचा तेव्हा प्रयत्न झाला होता. ही घटना आपण आयुष्यभर विसणार नाही, असे मायावती यांनी जाहीर केले होते. तेव्हापासून मायावती आणि मुलायमसिंग यांच्यातून विस्तवही जात नव्हता. अखिलेश यादव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ही कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला, पण मायावती यांनी त्याला दाद दिली नव्हती. याच मायावती यांनी पुढील आठवडय़ात होणाऱ्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीकरिता समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. या पाठिंब्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून बसपची पीछेहाट सुरू झाली. २००७च्या उत्तर प्रदेशच्या विजयानंतर भावी पंतप्रधान म्हणून स्वत:ची प्रतिमा तयार करणाऱ्या मायावती यांच्या पक्षाला गेल्या लोकसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता. गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपचे जेमतेम १९ आमदार निवडून आले. मायावती किंवा बसपचे राजकारण हे दलित, समाजातील दुर्बल घटक यांच्यावर आधारित असे. हा वर्ग २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बसपची ही हक्काची मतपेढी होती. पण भाजपने बसपच्या मतपेढीलाच सुरुंग लावला. विधानसभेच्या ८५ राखीव मतदारसंघांत भाजपकडे ४० टक्के, तर बसपकडे २४ व सपकडे १४ टक्के मतांचा वाटा होता. समाजातील दुर्बल घटकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने बसपला दारुण पराभव स्वीकारावा लागला. यानंतरच्या पहिल्या पोटनिवडणुकीत, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने भाजपच्या विरोधात अस्तित्वाची लढाई करणाऱ्या समाजवादी पार्टी आणि बसपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. फक्त लोकसभा पोटनिवडणुकीपुरता पाठिंबा असल्याचे मायावती यांनी जाहीर केले असले तरी ही सुरुवात मानली जाते. राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपच्या विरोधात विविध राजकीय पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात सुरुवात तर झाली आहे.

First Published on March 6, 2018 2:17 am

Web Title: samajwadi party alliance with bsp