जे. जयललिता आणि एम. करुणानिधी या दोन नेत्यांच्या मृत्यूनंतर तमिळनाडूमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रत्येक पक्ष आणि नेता आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षात फूट पडली. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अलागिरी यांनी बंडाची भूमिका कायम ठेवली. जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांची मैत्रीण शशिकला यांनी पक्षाचे नेतृत्व आणि मुख्यमंत्रिपद स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून अण्णा द्रमुकमधील बेदिली समोर आली. शशिकला यांचे भाचे दिनकरन यांना मानणाऱ्या १८ आमदारांच्या गटाने मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करीत पाठिंबा काढून घेतला. पक्षांतरबंदी कायद्यानुसार एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी वेगळा गट स्थापन केला तसेच पक्षात उभी फूट पडल्याचा पुरावा दिला तरच पक्षांतर ग्राह्य़ मानले जाते. अण्णा द्रमुकमधील १८ आमदारांच्या गटाने पाठिंबा काढून घेण्याचे पत्र दिले असले तरी पक्षांतरबंदी कायद्यानुसार पुरेसे संख्याबळ नव्हते. यातूनच विधानसभा अध्यक्षांनी या १८ आमदारांना अपात्र ठरविले. मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देताना दोन वेगवेगळे निकाल दिले. एका न्यायमूर्तीनी आमदारांची अपात्रता ग्राह्य़ मानली तर दुसऱ्या न्यायमूर्तीनी अपात्रता चुकीचे असल्याचे मत नोंदविले. त्यातूनच तिसऱ्या न्यायमूर्तीकडे सुनावणी झाली. तिसऱ्या न्यायमूर्तीनी १८ आमदारांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. ताज्या घडामोडींनुसार १८ आमदार आता अपात्र ठरले आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात लाभाच्या पदावरून दिल्ली विधानसभेतील आपच्या २० आमदारांना अपात्र ठरविण्यात आले होते. नैसर्गिक न्यायानुसार बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा आमदारांचा युक्तिवाद दिल्ली उच्च न्यायालयाने ग्राह्य़ धरीत या आमदारांचे सदस्यत्व कायम ठेवले. अण्णा द्रमुकच्या आमदारांनीही असाच युक्तिवाद केला असला तरी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना म्हणणे मांडण्यास सांगितले असता या आमदारांनी उपस्थित राहण्याचे टाळले होते. १८ आमदार अपात्र ठरल्याने तमिळनाडूतील पलानीस्वामी सरकारवरील टांगती तलवार तात्पुरती तरी टळली आहे. कारण द्रमुक, काँग्रेस आणि दिनकरन यांना मानणारे आमदार एकत्र आले असते तर अण्णा द्रमुक आणि विरोधकांचे समसमान संख्याबळ झाले असते. सरकार कधीही कोसळू शकले असते. या १८ जागांबरोबरच करुणानिधी आणि अन्य एका आमदाराच्या निधनाने रिक्त झालेल्या अशा एकूण २० मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होतील. द्रमुक आणि दिनकरन यांनी बाजी मारल्यास अण्णा द्रमुकचे सरकार गडगडू शकते. अण्णा द्रमुकने जागा कायम राखल्यास सरकार अधिक स्थिर होऊ शकते.  अण्णा द्रमुकमधील नेतृत्वाची पोकळी लक्षात घेता भविष्यात सत्ता संपादन करण्याच्या उद्देशाने द्रमुकचे नेते आणि करुणानिधी पुत्र स्टॅलिन यांनी आतापासूनच भर दिला आहे. जयललिता यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणूक मोठय़ा संख्याबळाने जिंकल्याने बंडखोर अण्णा द्रमुकचे नेते दिनकरन यांची महत्त्वाकांक्षा बळावली आहे. तमिळनाडू्च्या राजकारणात लाट आणि भावनिक मुद्दे अधिक उजवे ठरतात. यामुळेच अण्णा द्रमुक, द्रमुक, दिनकर यापैकी कोणाला मतदार पसंती देतात हे महत्त्वाचे. पक्षांतरबंदीबाबत न्यायालयांचे अनेक निकाल आले. पण अजूनही फरक पडलेला नाही. मद्रास उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने पक्षांतरबंदीला आळा बसेल ही अपेक्षा.