पाकिस्तानी कलावंत, नेते यांच्या कार्यक्रमांना विरोध करून शिवसेना आपले राष्ट्रवादी बाहू थोपटत असताना, पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करणाऱ्या आयोजकांच्या तोंडास काळा रंग फासून आपल्या राष्ट्रभक्तीची राडेबाज व्याख्या लोकांच्या गळी उतरवीत असताना तिकडे चीनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडत होती. भारताच्या सुरक्षेपासून पर्यावरणापर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम करू शकणारी अशी ती घटना. ती मात्र या गदारोळात दुर्लक्षितच राहिली. ती घटना म्हणजे चीनने तिबेटमध्ये बांधलेल्या धरणावरील जलविद्युत केंद्रांचे काम सुरू होणे. वरवर पाहता अत्यंत साधी वाटणारी ही घटना. प्रत्येक देश अशी धरणे बांधतच असतो. तेव्हा त्याचे एवढे विशेष काय असे अनेकांस वाटू शकते. पण हे धरण ज्या नदी, खरे तर नदावर बांधलेले आहे त्याचे नाव आहे ब्रह्मपुत्र. हिमालयातील चेम्युंगडुंग हिमनदीत उगम पावून तिबेटमार्गे अरुणाचल प्रदेश, आसाम, बांगलादेश असा दोन हजार ९०० किमी प्रवास करीत बंगालच्या उपसागराला मिळणारी ही महानदी. या नदीवर चीनने एक महाकाय धरण बांधले आहे. त्यावर सुमारे नऊ हजार ७६४ कोटी रुपये खर्चून जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. त्याचे नाव झांग्मु. मंगळवारी तो चीनच्या विद्युतजाळ्याशी जोडण्यात आला. त्यामुळे तिबेटमध्ये लखलखाट तर होईलच, पण त्यातून शिल्लक राहणारी वीज शेजारच्या क्विंगझाई प्रांतातही पाठविण्यात येणार आहे. एकंदर चीनच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, पण तेवढाच तो भारताच्या दृष्टीने धोकादायकही आहे. एखादे धरण काही एका दिवसात उभे राहत नसते. त्याचे काम सुरू झाले तेव्हा भारतात सत्तेत काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारला या धरणाच्या धोक्याची पुरेपूर जाणीव होती. एकदा हे धरण बांधून पूर्ण झाले की ब्रह्मपुत्रचे पाणी चीन हवे तेव्हा रोखू शकेल, हवे तिकडे वळवू शकेल हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही. भारताची प्रमुख चिंता होती ती ही. या पाण्यावरील नियंत्रणातून चीनच्या हाती अरुणाचल आणि आसामच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम हा तर वेगळाच भाग झाला. याबद्दल भारताने वेळोवेळी चीनशी चर्चा केली आहे. चीनने तसे काही होणार नाही असे वेळोवेळी आश्वस्तही केले आहे. पण चीनची वीज आणि पाण्याची प्रचंड तहान पाहता त्या आश्वासनांवर किती विसंबायचे हा प्रश्नच आहे. ‘वॉटर – एशियाज न्यू बॅटलफिल्ड’ या पुस्तकाचे लेखक ब्रह्म चेलानी यांनी या आधीच हा धोका अधोरेखित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चीन या पाण्याचा वापर राजकीय अस्त्र म्हणून करते की नाही हा भाग वेगळा. पण त्या क्षमतेचा वापर करून तो देश आपल्या शेजारी राष्ट्रांना ‘चांगले वागण्यास’ भाग पाडू शकतो. भारतापुढे आता कायमच हे भय असणार आहे. चीनकडून त्याबाबत ठाम आश्वासन घेणे हाच एकमेव उपाय आता भारताच्या हाती आहे. तेव्हा या धरणाविरोधात आवाज उठविणारा भाजप आज सत्तेवर आहे. तेव्हा त्यांच्या सरकारकडून निदान या धोक्याची तीव्रता कमी करण्याचे काम तरी होईल हीच आशा आहे.