ट्विटर हे अखेर समाजमाध्यम असल्यामुळे, त्यावरील एखादे खाते कायमचे वा तात्पुरते बंद होण्याची कारवाई कुणाच्या तरी तक्रारीनंतरच होते. मग त्या तक्रारी, दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलन किंवा अन्य प्रसंगी सरकारने केलेल्या असोत किंवा अन्य कुणी केलेल्या. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या १६ डिसेंबर २०१७ च्या, म्हणजे बांगलादेश विजयदिवसानिमित्त केलेल्या ट्वीटवर तक्रार झालीच नसती, तर ट्विटरने कारवाईदेखील केली नसती. पण अशी तक्रार, ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द फोनोग्राफिक इंडस्ट्री’ या ७० देशांमध्ये आठ हजारांहून अधिक सदस्य संस्था असणाऱ्या महासंघाने सोनी म्युझिक एंटरटेनमेंट कंपनी या सदस्य कंपनीच्या वतीने केलेली होती. ज्या गाण्यावर त्या अमेरिकी कंपनीचा स्वामित्वहक्क आहे, ते ‘माँ तुझे सलाम’ हे गाणे आणि सैनिकांची चलत्चित्रे वापरून रविशंकर प्रसाद यांनी केलेले ते ट्वीट होते; त्यावर तक्रार होती ती स्वामित्वहक्क भंगाच्या अमेरिकी कायद्याआधारे झालेली. ‘डिजिटल मिलेनियम कॉपीराइट अ‍ॅक्ट’ हा कायदा अमेरिकी असला तरी अन्य अनेक देशांचे डिजिटल स्वामित्वहक्क कायदे त्यावर बेतलेले आहेत. त्यामुळे ट्विटरने, प्रसाद यांचे ट्विटर खाते तात्पुरते गोठवण्याची कारवाई केली आणि तासाभरानंतर, प्रसाद यांनी नियमभंग करणारे ते ट्वीट मागे घेतल्यानंतरच ही कारवाई मागे घेण्यात आली.

स्वामित्वहक्क भंग आणि ट्वीट रद्द करणे याविषयीची माहिती उघड होईपर्यंतच्या तासाभरात मात्र केंद्रात कायदा व न्याय, दळणवळण, वीजतांत्रिकी तसेच माहिती तंत्रज्ञान ही महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरील स्वत:चे खाते स्वत:ला हाताळता येत नाही, या परिस्थितीचा कसून पाठपुरावा केला. आधी त्यांनी ‘कू’ या ट्विटरसदृश भारतीय समाजमाध्यमातील खात्यावरून ट्विटरच्या या वर्तनाविषयी त्यांना वाटलेले आश्चर्य प्रकट केले आणि ते करताना त्यांनी, नव्यानेच लागू झालेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ प्रमाणे कोणाहीवर कोणत्याही समाजमाध्यमाने खातेबंदीची कारवाई करताना संबंधित खातेधारकाला पूर्वकल्पना देणे कसे बंधनकारक आहे आणि हे बंधन ट्विटरने कसे पाळलेच नाही, असा जाहीर तक्रारीचा किंवा नापसंतीचा सूर लावला. त्यांचे हेच म्हणणे, त्या तासाभरात वृत्तवाहिन्याही दाखवू लागल्या. कारवाईचे कारण उघड झाल्यानंतरही ट्विटरची कारवाई अमेरिकी कायद्याप्रमाणे झालेली आहे आणि आम्ही ट्विटरसारख्या सर्वच समाजमाध्यम कंपन्यांना भारतीय कायद्यांचे पालन करण्यास भाग पाडणार आहोत, असे प्रसाद म्हणत होते आणि सत्ताधारी पक्षाच्या विचारांशी योगायोगाने फारच मिळतेजुळते विचार प्रसृत करणारी ‘ऑपइंडिया.कॉम’सारखी संकेतस्थळे- ‘हेच ते ट्वीट ज्यामुळे केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध ट्विटरने कारवाईचा प्रकार केला’ असे म्हणत, नियमभंग करणारे दृक्मुद्रण उपलब्ध नसणारे ट्वीट पुन:प्रसृतही केले.

आपले विरोधकच नेहमी चुकीचे असतात, असा प्रचार याही प्रकरणी करण्यामध्ये सत्ताधारी यशस्वी ठरल्याचे रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावरील कारवाईबद्दल केलेल्या ट्वीटना मिळालेल्या प्रतिसादावरून दिसते. आता ट्विटरवर कारवाईच करून टाका, असा सूर अनेकांनी दिलेल्या प्रतिसादात आहे.

वास्तविक, त्याच अमेरिकी कायद्याखाली झालेल्या तक्रारीनुसार काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावरही अशीच कारवाई झाली होती. त्याविषयी प्रसाद यांना उद्देशून ट्वीट करताना थरूर यांनी- ट्विटरने नियतकर्तव्य केले, त्याबद्दल तक्रार कशासाठी, असा सूर लावला. प्रसाद यांचा सूर मात्र अजिबात नरमलेला दिसत नाही. ट्विटर आणि सोनी म्युझिक यांची मुख्यालये अमेरिकेत असल्याने त्यांना परकीय मानायचे, ट्विटर भारतात धंदा करते आणि कायदे मात्र अमेरिकेचे मानते, अशी ओरड करायची, हे प्रकार येथे गैरलागू ठरतात हे कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान ही दोन्ही खाती सांभाळणाऱ्या प्रसाद यांना माहीत असणारच. शिवाय ते कायदेपंडित असल्यामुळे एखाद्या कायद्याची चिकित्सा त्याचा कीस पडेपर्यंत करणे हेही त्यांना पुरेसे अवगत असणार. पण त्यांच्या ट्वीटवरून तरी तसे दिसत नाही. दिसतो तो, आपल्याला पूर्वकल्पना दिली नाही याविषयीचा संताप. त्याहीपेक्षा, ट्विटर भारतीय कायदे पाळत नसल्याचा राग. भारतात मात्र मंत्री वा उच्चपदस्थांनाही ट्विटरविषयीची नापसंती ट्विटरवरच व्यक्त करावीशी वाटते. वास्तविक ट्विटरकडे एखाद्या खात्याची तक्रार केल्यास त्या खात्यावर कारवाई होते, हे तंत्र विद्यमान सत्ताधाऱ्यांना पूर्णत: अवगत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये शेतकरी आंदोलन पुन्हा ट्विटरवरून जोर धरत असताना सरकारनेच दीडशेहून अधिक खात्यांविरुद्ध तक्रार केली होती आणि ती खाती काही काळासाठी बंदही झाली होती. कारवाई विरोधकांवर होते तोवर सारे ठीक, पण ती स्वत:वर- तीही अगदी तांत्रिक कारणाने जरी झाली तरीही आकांडतांडव, असा हा अंतर्विरोध असून, तो एकपक्षीय मनोवृत्तीला शोभणारा ठरतो. एखाद्या केंद्रीय मंत्र्याने तो करावा, यात मात्र त्याचीच नव्हे तर देशाचीही शोभा होते!