युवक क्रांती दलाचे संस्थापक-अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांना ‘जीवनगौरव’ने गौरविण्याचा मानस व्यक्त केला होता. यंदाचा पुरस्कार त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून देण्यात येणार आहे. तर त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. डॉ. कुमार हे मूळचे समाजवादी. लढाऊ  बाण्याचे. महाविद्यालयात असताना ‘युग की जडता के खिलाफ’ इन्कलाब करीत भारतीय आणि मानवीय सांस्कृतिक क्रांती करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. आपला जीवनगौरव होत असताना त्यांना कदाचित त्या स्वप्नाची पूर्ती झाल्याचे समाधानही मिळाले असावे. त्याच वेळी त्यांच्या समाजवादी आणि युक्रांदी साथींनाही कुमारांनी अस्पृश्यता निवारणाची एक भलीथोरली क्रांती केल्याची भावनाही झाली असावी. याचे कारण कुमारांच्या सत्कारास उपस्थित असलेली सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी. आजवर समाजवाद्यांवर, डाव्यांवर उजव्यांकडून राजकीय अस्पृश्यतेचा आरोप केला जात असे. समाजवादी मंडळीही समरसता मंचावर वा म्हाळगी प्रबोधिनीत वगैरे कोणी डावा दिसताच एकच कावकाव करून त्यास जातबाह्य़ करीत असत. तर कुमारांनी जीवनगौरवच्या निमित्ताने ही अस्पृश्यता पुरती धुऊन काढली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे. त्यांच्या हस्ते सत्कार घेण्याचे कुमारांनी कबूल केले तेव्हाच खरे तर या मानवीय क्रांतीची सांगता झाली होती. या समारंभाच्या आमंत्रितांत भाजपचे नेते गिरीश बापटही होते. तेही कुमारांचे वैचारिक शत्रूच.  शिवाय आधीच साथी जॉर्ज फर्नाडिस यांनी भाजपच्या मांडीवर बसून त्याचा दाखला तयार करून ठेवला होता. ठाकरे यांच्याबाबत तसे म्हणता येणार नाही. हे ठाकरे ज्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात त्या विचारसरणीविरोधात, फॅसिझमविरोधात लढण्यात कुमार यांची उभी हयात गेली. पुण्यातील पतितपावन, शिवसेना अशा संघटना हे युक्रांदचे शत्रुराष्ट्र होते. आज त्याच्याच ‘राष्ट्रपती’ला सत्कारासाठी पाचारण करून आपण त्या विचारसरणीविरोधात तह केला आहे हे कुमारांनी एकदा मान्य केले की त्यांच्या समाजवादी सांस्कृतिक क्रांतीचे उद्यापन घालण्यास त्यांचे चाहते मोकळे होतील. पण हा जर तह नसेल, तर मात्र वेगळीच समस्या निर्माण होते आणि त्या सगळ्या गोष्टींना समाजवादी ढोंग असे म्हणावे लागते. या अशा भंपकपणासाठी समाजवादी मंडळी नेहमीच ओळखली जातात. कुमारांचा पंचाहत्तरी सोहळा हे त्याचेच आणखी एक देदीप्यमान उदाहरण म्हणावे लागेल. नेतेमंडळींच्या हातून आपली ओवाळणी करून घेण्याची हौस तशी अनेकांना असते. तीच कुमारांना असावी यातही काही गैर नाही. या वयात तर नक्कीच नाही. पण ओवाळणारे नेते आणि आपली राजकीय भूमिका यांत द्वंद्व असता कामा नये, हे बजावून सांगण्यात वयाचा अडसर येण्याचे काहीच कारण नाही. कुमारांनी ते केले नाही हे शल्य त्यांच्या विचारसरणीवर खरे प्रेम करणाऱ्या, त्यांच्या लढय़ांबद्दल सहानुभूती असणाऱ्यांना नक्कीच असेल. पण बहुधा पंचाहत्तरीतले कुमार आता याच्या पलीकडे गेले असावेत. तेव्हा त्यांनी राजकीय अस्पृश्यता दूर करण्याची सांस्कृतिक क्रांती केली हे समाधान त्यांना मिळू द्यावे हेच बरे. त्यांच्या या समाधानामागे समाजवादी भंपकपणा आहे असे म्हणणारे खचितच म्हणतील. पण त्या टीकेचे धनी एकटे कुमारच नव्हते. त्यांच्या अनेक साथींनी आपला समाजवाद खादीच्या रंगीबेरंगी कुडत्यांच्या खिशात टाकून काँग्रेसी पांढरी टोपी चढवली आहे.  यात ‘सुदैवा’चा भाग एवढाच की पंचाहत्तरीतल्या कुमारांनी वेदमंत्रांच्या घोषात आपला सत्कार व्हावा एवढी मागणी केली नाही!

 

supriya sule ajit pawar
“साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या”, अजित पवारांच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाल्या…
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?