News Flash

उद्योगद्रष्टा..

एक सिगारेट कंपनी अशी सुरुवातीला ओळख असलेल्या आयटीसीच्या उत्पन्नात आज ५९ टक्के वाटा सिगारेटेतर उद्योगांचा आहे.

रूढार्थाने कोणत्याही उद्योगपती घराण्याचा वारसा न लाभताही, एखाद्या कंपनीत अगदी सुरुवातीला दाखल होऊन थोडय़ाच अवधीत त्या कंपनीत सर्वोच्च पदाला पोहोचल्याची आणि या वाटचालीत कंपनीची व्याप्ती, महत्त्व काही पटींनी वाढवल्याची मोजकी उदाहरणेच भारतीय उद्योग क्षेत्रात आढळून येतील. योगेश्वर चंदर तथा वाय. सी. देवेश्वर यांचे नाव अशा उदाहरणांच्या यादीत सदैव अग्रस्थानी राहील. इंडियन टोबॅको कंपनी किंवा आयटीसीचे एका सिगारेट कंपनीतून बडय़ा उद्योगसमूहात रूपांतर करण्यात देवेश्वर यांनी हयात वेचली. काही वर्षांपूर्वी आयटीसीमधील परदेशी भागधारकांनी (ब्रिटिश अमेरिकन टोबॅको) या कंपनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी भारतीय वित्तसंस्थांच्या मदतीने देवेश्वर यांनी आयटीसीचे भारतीयत्व कायम राखले होते. स्वदेशीवाद किंवा मेक इन इंडियासारख्या घोषणा क्षणभर लक्ष वेधतातही, परंतु भारतीय उत्पादनांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी, जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अभिमानाइतकेच किंबहुना काहीसे अधिक उद्योगभानही असावे लागते. परवाच ‘अमृत’ या अस्सल भारतीय व्हिस्कीचे निर्माते नीलकांत जगदाळे निवर्तले. देवेश्वर यांचेही शनिवारी निधन झाले. देवेश्वर किंवा जगदाळे यांसारख्यांनी बडय़ा घराण्यांमध्ये जन्म न घेताही जो असीम उद्योगविस्तार केला, तो त्यांच्या देशप्रेमाचीही प्रचीती आणणारा ठरतो.

आयआयटी आणि हार्वर्डसारख्या संस्थांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले उच्चविद्याविभूषित देवेश्वर १९६८ मध्ये आयटीसीत दाखल झाले.  केवळ सिगारेट बनवणाऱ्या कंपनीकडून ग्राहकोपयोगी वस्तू, कागद, हॉटेल व्यवसाय, इन्फोटेक अशा विविध क्षेत्रांमध्ये आयटीसीने हातपाय पसरले. आयटीसीने ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या शेतमालाचा वापर ‘पॅकेज्ड’ खाद्यपदार्थनिर्मितीसाठी केला. भारतीय वित्तीय संस्था आणि आयआयटीसारख्या संस्थांमधून गेल्या शतकात बाहेर पडलेले हुशार उद्योजक, तंत्रज्ञ यांच्या संयोगातून चांगली आणि यशस्वी कंपनी बनवता येते हे देवेश्वर यांनी दाखवून दिले. आयटीसी हॉटेल उद्योग देशात सध्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आणि यशस्वी हॉटेल समूह आहे. एकदा कोलकाताच्या एका जुनाट वस्तीत मोठे हॉटेल उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या वेळी या धाडसाबद्दल अनेकांनी त्यांना सावध केले होते. त्या वेळी त्यांचे उत्तर होते, की कोणीही येणार नाही अशा ठिकाणी एखादा उद्योग किंवा हॉटेल उभे केल्यास त्याचा फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला होतोच. देवेश्वर यांचे द्रष्टेपण आणखी एका अफलातून संकल्पनेतून दिसून आले. ती संकल्पना ई-चौपाल या नावाने जगभर प्रसिद्ध पावली. डिजिटलीकरण फारसे चर्चेत नसताना आणि सध्याच्या अभिनिवेशी डिजिटल युगाच्या जवळपास दोन दशके आधी आयटीसीने ई-चौपालमार्फत तब्बल दहा राज्यांतील शेतकऱ्यांशी संपर्क प्रस्थापित केला. आयटीसीच्या खाद्यपदार्थनिर्मिती तसेच इतरही काही उद्योगांसाठी कच्चा माल हे शेतकरी थेट कंपनीला उपलब्ध करू देऊ लागले. आडत्यांचा अडसर आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक दूर झाली.  शेतकरी त्यांच्या शेतमालाची किंमत थेट आयटीसीशी बोलून ठरवू लागले. इतकेच नव्हे, तर तालुका पातळीवरील मंडयांमधील ताजे भाव, बियाणांची व खतांची माहिती, कृषितंत्रातील क्लृप्त्या यांविषयीदेखील माहिती मिळू लागली. त्यातून उत्पादनांचा दर्जा आणि प्रमाणही वाढले. आयटीसीचे पुरवठादार अशा प्रकारे सुधारल्यामुळे आयटीसीला फायदा झालाच, पण संबंधित शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावले. महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये ३५ हजार गावांमध्ये ६१०० ई-चौपाल उभे राहिले आहेत आणि त्यांचा फायदा जवळपास ४० लाख शेतकऱ्यांना होतो आहे.

एक सिगारेट कंपनी अशी सुरुवातीला ओळख असलेल्या आयटीसीच्या उत्पन्नात आज ५९ टक्के वाटा सिगारेटेतर उद्योगांचा आहे.  कागदनिर्मितीपासून खाद्यपदार्थापर्यंत आणि ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते इन्फोटेकपर्यंत या समूहाचे वैविध्य आहे. १९९१ ते १९९४ या काळात देवेश्वर एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. या काळात त्यांनी एअर इंडियाला बऱ्यापैकी सुस्थितीत आणून ठेवले होते. वित्तीय संस्थांनी जबाबदारीने वागल्यास आणि कंपनीअंतर्गत सुशासन राबवल्यास (कॉर्पोरेट गव्हर्नन्स) कोणती कंपनी, उद्योग यशोशिखरावर पोहोचू शकतात, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. अशा प्रकारचे प्रारूप वापरून सार्वजनिक उद्योगातील कंपन्याही सुस्थितीत आणता येऊ शकतात अशी त्यांची धारणा होती. नैराश्य आणि नकारात्मकता यांना त्यांनी कधी थारा दिला नाही. आयटीसीची यशोगाथा ही त्यांच्या सकारात्मक द्रष्टेपणातूनच नावारूपाला येऊ शकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2019 12:06 am

Web Title: yc deveshwar
Next Stories
1 इराणचा इशारा
2 अतिरिक्त विजेचे गौडबंगाल
3 संशयाला नाहक वाव
Just Now!
X