News Flash

जिन्दगीनामा

कधी कधी एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतींशी अकारणच खूप उशिरा गाठभेट होते

जिन्दगीनामा

आताच्या पाकिस्तानातील गुजरात या प्रांतात १९२५ मध्ये जन्मलेल्या पंजाबी लेखिका कृष्णा सोबती यांनी आज वयाची ९२ र्वष पुरी केली आहेत. शरीर थकलंय, पण तरीही मनाचा उत्साह अजून कमी नाही. संयमित आणि वास्तवाशीच नातं राखणारा लेखनाविष्कार, अतिशय समृद्ध भाषा, चित्रशैली ही त्यांची वैशिष्टय़े आहेत. प्रत्येक कलाकृतीतून कृष्णा सोबती यांच्या वेगवेगळ्या लेखनक्षमतांचा प्रत्यय वाचकाला येत राहतो. एकूणच हिंदी साहित्यात त्यांचं लेखन हे मानदंड मानलं जातं.

कधी कधी एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतींशी अकारणच खूप उशिरा गाठभेट होते आणि मग त्या साहित्यकृतींना आपल्या मनात स्थान देण्यात आपल्याकडून विलंब झाला याची चुटपुट लागते. पंजाबी लेखिका कृष्णा सोबती यांची आणि माझी शब्दभेट कशी कोण जाणे, अशीच लांबत गेली होती. संयमित आणि वास्तवाशीच नातं राखणारा लेखनाविष्कार, अतिशय समृद्ध भाषा, चित्रशैली ही त्यांची वैशिष्टय़े आहेत. प्रत्येक कलाकृतीतून सोबती यांच्या वेगवेगळ्या लेखनक्षमतांचा प्रत्यय वाचकाला येत राहतो. विशेषत: ७० वर्षांपूर्वीच्या फाळणीचं कटू वास्तव त्यांच्या लेखनातून प्रत्ययकारितेनं प्रकटतं.  फाळणीविषयक साहित्यातच नव्हे तर एकूण हिंदी साहित्यात त्यांचं लेखन हे मानदंड मानलं जातं.

आताच्या पाकिस्तानातील गुजरात या प्रांतात १९२५ मध्ये जन्मलेल्या कृष्णाजींनी आज वयाची ९२ र्वष पुरी केली आहेत. शरीर थकलंय, पण तरीही मनाचा उत्साह अजून कमी नाही. भारतातील हयात व लिहित्या कादंबरीकारांत ज्येष्ठतेचा मान बहुधा त्यांच्याकडेच जाईल. अगदी या वर्षांतच त्यांची ‘गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्थान तक’ ही नवी आत्मचरित्रात्मक कादंबरी प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने त्यांनी जून २०१७ मध्ये दिलेल्या मुलाखतीवेळी, त्या अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये होत्या, पण त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. ती मुलाखत वाचताना कौतुकानं मनात आलं, यांच्याजवळ अशी कोणती विलक्षण शक्ती असेल की या वयातही लेखनप्रतिभा व लेखन ऊर्जा टिकून राहू शकते. लेखनाचे संकल्प आहेत, पण आपण आता निरवानिरव करतो आहोत, असं मात्र त्या म्हणाल्या.

जवळजवळ शतकाच्या साक्षीदार असणाऱ्या कृष्णाजींनी खूप आयुष्य पाहिलं, समरसून उत्कटतेनं जगल्या, चढउतार अनुभवले, पण कधीही नैराश्यानं मन झाकोळू दिलं नाही. अगदी लहानपणापासून त्यांचा स्वतंत्र बाणा असे. त्यांनी कधी कसली नक्कल केली नाही. आपलं वेगळं अस्तित्व कायम ठेवलं. पंजाबमधील संपन्न बालपणाच्या आठवणी त्यांच्या मनात अजूनही स्पष्ट आहेत. त्यांचं गाव म्हणजे पहाडी प्रदेश. चिनाब नदीच्या काठावरून त्या घोडय़ावरून रपेट करीत असत. त्या म्हणतात, ‘‘निसर्गाचं विलक्षण वेड आणि प्रत्येक वर्षीचा प्रत्येक ऋतू मला हवासा वाटे. हजारो सूर्यास्त मी पाहिले, पण प्रत्येक वेळी तो वेगळा दिसला. सूर्योदय मात्र अगदी कमी, कारण मी आहे सूर्यवंशी. सूर्य चांगला वर आल्याशिवाय उठतच नाही.’’

लाहोर, सिमला, दिल्ली येथे त्यांचं शिक्षण झालं, पण ऐन तारुण्यात फाळणीच्या जबरदस्त आघाताला तोंड द्यावं लागलं आणि ती जखम कधीच बुजली नाही. आपल्या नव्या कादंबरीत त्या म्हणतात, ‘‘फाळणी झाली आणि चांगलं राहतं घर, जमीनजुमला, ऐश्वर्य सोडून, ‘स्वतंत्र’ भारतात यावं लागलं- निर्वासित म्हणून! आपली दु:खं व आपली आसवं यांचं ओझं वाहात! घराच्या वाटण्या झाल्यावर मध्ये उभ्या राहणाऱ्या भिंतींवरून आपलाच आवाज परका होऊन परततो, परक्या झालेल्या आपल्या अंगणात आपलंच अस्तित्व कडकड करत मोडून पडतं, तसं आमचं झालं. फाळणीचं दु:ख इकडे होतं तसं तिकडेही होतंच. इथे डोळे पुसायला कोणी नाही आणि तिकडे खांदा द्यायला कोणी नाही.’’

या पाश्र्वभूमीवर, आरंभी इथे मिळतील ती वेगवेगळी कामं करत कृष्णाजी पोट भरत राहिल्या तरी, वाचणं, लिहिणं, यांच्याशीच संबंध ठेवत गेल्या. त्यांचं अनुभवविश्व समृद्ध होतं. लेखनाची सुरुवात कवितेनं झाली तरी त्या कवितेच्या जगात फारशा रमल्या नाहीत. मैलोगणती पसरलेली, सोन्यासारखं पीक देणारी आपली शेतं, हवेली सारं सोडून, साऱ्या गावाचं पालकत्व सोडून, काहीही न घेता, कुठल्या कॅम्पवर नेतील तिथे जायचं आणि शून्यातून जगणं सुरू करायचं यासारखा विदारक अनुभव वर्णिणारी ‘सिक्का बदल गया’ ही त्यांची पहिली कथा फार गाजली (१९४४). त्यानंतर त्यांची वाटचाल संथपणे व  सातत्याने चालू राहिली. पण म्हणून कृष्णाजींची लेखणी कायम फाळणीतच गुंतून राहिली नाही.

आजवर बारा-एक कादंबऱ्या आणि ४०-५० कथा, शब्दचित्रे, प्रासंगिक स्फुट लेख (हम हशमत), कृष्ण बलदेव वैद या प्रख्यात लेखकाशी संवाद- गप्पा (सोबती-वैद संवाद) काही मुलाखती आणि साहित्यविषयक, मोलाचं चिंतन असा त्यांच्या लेखनाचा पसारा आहे. त्यांची हिंदी भाषा पंजाबी ढंग आणि वीररसयुक्त राजस्थानी लहेजा घेऊन येते. त्यामुळे तिची आपली वेगळी शब्दसंपत्ती झालीय. ती अनुवादात उतरवणं कठीण. शिवाय मिताक्षरी व अर्थबहुल संवाद हे त्यांचं बलस्थान. ‘दूरदर्शन’वर गाजलेल्या ‘बुनियाद’ मालिकेच्या लेखनात त्यांचा मोठा वाटा होता.

कृष्णाजींच्या बाबतीतील एक आगळी बाब सांगावीशी वाटते. अनेक पुरुष लेखक कधी कधी टोपणनावाने लिहितात. पूर्वी स्त्रिया टोपणनावाने (विभावरी शिरूरकर आठवतील) किंवा ‘अनाम’ लिहीत असत. मात्र एखाद्या स्त्रीने पुरुषाचे नाव टोपणनाव म्हणून वापरण्याची पद्धत विरळा होती. जॉर्ज इलियट (१८१९-१८८०) हा लेखक नसून ती मेरी अ‍न-इव्हान्स नावाची लेखिका आहे हे रहस्य काही वर्षांनी उलगडलं.

कृष्णाजींनी जवळजवळ दहा वर्षे ‘हशमत’ असं पुरुषी नाव घेऊन लेखन केलं. ते लेखन शब्दचित्रात्मक, प्रासंगिक, स्फुट स्वरूपाचं होतं. हशमत म्हणजे गौरव, ऐश्वर्य. या नावानं केलेल्या लेखनात समकालीन लेखकांची, परिचितांची शब्दचित्रं रेखाटली, तात्कालिक घटनांसंबंधी कधी नर्मविनोदाने, कधी उपहासाने त्यांनी लिहिलं. फार पूर्वीपासून कृष्णाजींचं प्रिय शहर दिल्ली. तेथील ‘नामांकित’ बससेवा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा बाबींवर त्यांनी व्यंगचित्रात्मक, उपहासपूर्ण भाषेत लिहिलं आहे. तसेच निर्मल वर्मा, भीष्म साहनी, यांसारखे लेखकमित्र, प्रकाशक शीला सन्धूसारख्या मैत्रिणी याविषयी लिहिलंय. साहित्यिकांच्या एका स्नेहमेळाव्याचं खुसखुशीत भाषेतलं वर्णन वाचताना साहित्यिकांचे समान नमुने न्याहाळता येतात आणि हरिवंशराय व तेजी बच्चन, जैनेन्द्र, अमृता प्रीतम-इमरोज अशा आपल्याही परिचयाच्या कवी-लेखकांबरोबर संध्याकाळ घालवल्यासारखं वाटतं.

आश्चर्याची बाब म्हणजे हे लेखन वाचताना ते स्त्रीने केलं असावं अशी जराही शंका येत नाही. भाषेचा ढंग, शब्दांची योजना सारं काही पुरुषी थाटाचं. अगदी क्वचित येणाऱ्या शिव्याही. कृष्णाजी म्हणतात, ‘‘हा हशमत कधी माझ्या टेबलावर येऊन माझ्या मनाचा ताबा घेतो कळतच नाही. माझ्या भाषेचा पोत बदलतोच, पण माझं हस्ताक्षरही आपोआप बदलतं. जणू काही परकायाप्रवेशच. आपली अर्धनारीनटेश्वराची कल्पना मला स्वानुभवाने पटते. माझ्यात दोन वेगळी व्यक्तित्वं वास करतात असं मला वाटतं. मी स्वत:च स्वत:च्या निर्मितीचं गूढ उकलताना पाहाते, साक्षीदार असते.’’

कृष्णाजींचं लेखन बहुतांशी स्त्रीकेंद्री आहे. पण त्या स्वत:ला स्त्रीवादी समजत नाहीत. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी हिन्दी लेखिकांची संख्या अल्प होती, त्या संकोचत लिहीत असत. अशा काळात कृष्णाजींनी ‘मित्रो मरजानी’सारखी धीट कादंबरी लिहिली. कुलीन, विवाहित स्त्रीची लैंगिकदृष्टय़ा होणारी कुचंबणा त्यांनी यात दाखवली आहे. तो विषय आणि त्यातील भाषा त्यावेळी वाचकांना धक्कादायक वाटली तरी त्या कादंबरीला कोणीही अश्लील ठरवू शकलं नाही.  एकत्र कुटुंबातील स्त्री कोणकोणत्या सासुरवासाला तोंड देत असे याची उदाहरणे कथाकादंबऱ्यांतून येत, पण कृष्णाजींनी हा विषय एका वेगळ्याच रीतीने पुढे आणला. मित्रो, ही स्त्री सहज पण सूचक तर कधी स्पष्टपणे आपली अतृप्ती व्यक्त करते. नवऱ्याची अक्षमता दाखवून देते, भांडते. पण वेळ येते तेव्हा घरासाठी काहीही करायला तयार होते.

कृष्णाजींच्या कथा व कादंबऱ्या यातील स्त्रीपात्रं वास्तवाचा स्वीकार कणखरपणे करतात आणि त्यांची वृत्ती इतकी ठाम आहे की जमिनीवरचे पाय कधी सुटत नाहीत. आपली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या संघर्षांला तयार असतात, प्रयत्नांमध्ये कमी पडत नाहीत. स्त्रियांच्या दुरवस्थेला भारतीय समाजरचना आणि स्त्रीची घडवली जाणारी मनोवृत्ती कारण आहे असं त्यांना ठाम वाटतं. ‘सूरजमुखी अंधेरे के’ यातही स्त्रीची देहामनाच्या वासना-आकांक्षा यांची सांगड घालण्याची धडपड दिसते, त्याचप्रमाणे बलात्कारातून जन्मलेल्या मुलीची होणारी परवड त्या चित्रित करतात. विवाहित पुरुषाच्या अन्य प्रेमसंबंधांमुळे त्याची बायको आणि त्याची प्रेयसी या दोघींच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांचा विचार त्या करतात (दिल-ओ-दानिश).

खरं म्हणजे वास्तवातील सामाजिक समस्यांची मांडणी आपल्या कथानकातून त्या करतात. हे प्रश्न आजही तसेच आहेत, उलट त्यांची धार अधिक तीव्र झालीय, कारण समाजात वाढलेला चंगळवाद, अतिरेकी व्यक्तिवाद आणि एकटा होत गेलेला माणूस! त्यामुळे आजही त्यांच्या लेखनाशी वाचक सांधा जुळवू शकतो. कृष्णाजींच्या लेखन कारकीर्दीचा मानबिंदू, म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त महाकादंबरी-‘जिन्दगीनामा-जिन्दा रुख’ (१९७९). या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र म्हणजे विसाव्या शतकाच्या आरंभीचं, पाकिस्तानातील पंजाबचं ग्रामीण जीवन, तेथील समाज, परंपरा, लोकगीतं, उद्योगधंदे असं सारं काही. खरं म्हणजे ही बखर आहे, त्या काळाची. आरंभ होतो तो त्यांच्या, प्रस्तावनात्मक दीर्घ कवितेनं. त्या म्हणतात-‘‘इतिहास। जो नहीं है। और इतिहास। जो है.. वह नहीं। जो हुकूमतों की तख्तगाहों में। प्रमाणों और सबूतों के साथ। ऐतिहासिक खातों में दर्ज कर। सुरक्षित कर दिया जाता है। ..बल्कि वह जो। लोकमानस को। भागीरथी के साथ साथ। बहता है। पनपता और फैलता है। और जनसामान्य के। सांस्कृतिक पुख्तापन में। जिंदा रहता है।’’

या चार ओळींवरूनही कादंबरीच्या सखोलतेची व व्यापक पैसची जाणीव होते. ही कादंबरी म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर आपल्या अस्तित्वाची मुळं जाणून घेण्याचा, आपल्या जगण्याचा ताळेबंद मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशोक वाजपेयींसारख्या लेखकाने ही कादंबरी म्हणजे आधुनिक महाभारत आहे, असं म्हटलं. फाळणीची चरचरती जखम अनेक माध्यमांतून समाजात झिरपत गेली. पण ‘जिन्दगीनामा’सारखं चित्रण दुसरं नाही असं सगळ्यांचं मत आहे. कृष्णाजींना समकालीन अमृता प्रीतम यांनी हेच शीर्षक त्यांच्या एका कादंबरीसाठी वापरलं-(हरदत्त का जिन्दगीनामा). दोघींमध्ये वाद झाले आणि कृष्णाजींनी आपल्या स्वामित्वहक्काचा भंग झाला म्हणून खटला दाखल केला. २६ र्वष खटला चालला. पण निकाल अमृताजींच्या बाजूने लागला, तोही त्यांच्या मृत्यूनंतर. कादंबरीचं मोठेपण बाजूला राहिलं आणि खटल्यामुळेच तिची चर्चा झाली.

वयाच्या सत्तराव्या वर्षांपर्यंत अविवाहित राहिलेल्या कृष्णाजींनी डोगरी लेखक शिवनाथ यांच्या रूपात आपला साथीदार शोधला व ७०व्या वर्षी लग्न केलं. जेमतेम २० वर्षांचं सहजीवन. दोघांचाही जन्म एकाच दिवशी झालेला. तीन वर्षांपूर्वी शिवनाथ यांचा मृत्यू झाला. सोबतींची सोबत सुटली आणि पुन्हा एकटेपण वाटय़ाला आलं.

स्वत:तच रमणं प्रिय वाटणाऱ्या कृष्णाजींनी २०१० चा ‘पद्मभूषण’ पुरस्कार नाकारला. आपलं स्वातंत्र्य यामुळे हिरावलं जाईल असं त्यांना वाटलं. देशातील वाढत्या असहिष्णुतेचा निषेध म्हणून साहित्य अकादमीचा पुरस्कार व मानाची फेलोशिपही २०१५ मध्ये परत केली. त्यावेळचे त्यांचे उद्गार किती सार्थ आहेत. त्या म्हणतात- ‘‘विभाजनाच्या जखमा आताशी कुठे बुजत आल्या होत्या, त्याच पुन्हा उघडय़ा झाल्या आणि भळभळू लागल्याहेत. त्या आणखी दु:खदायक आहेत, कारण आपण इतिहासाचा धडा विसरून वागतोय. लोकशाहीच्या आधारे लोकशाहीचाच बळी देतोय.’’ विचारक्षम लेखकाचं हे भळभळतं दु:ख कुणी जाणेल का?

कृष्णा सोबती (१९२५)

  • कादंबरीकार, कथाकार, ललित लेखक
  • ‘जिन्दगीनामा’- साहित्य अकादमी पुरस्कार -१९८०
  • साहित्य अकादमी फेलोशिप – १९९६
  • ‘समय सरगम’- व्यास सम्मान, २००८
  • हिन्दी साहित्य शिरोमणी, शलाका पुरस्कार, हिन्दी अकादमी पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार.

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 4:59 am

Web Title: marathi articles on fiction writer krishna sobti
Next Stories
1 नाते जडले गतकालाशी
2 ‘पोलादी पडदा’ दुभंगताना
3 शब्द पडे टापुर टुपुर..
Just Now!
X