23 February 2019

News Flash

सारं कसं सोपं सोपं..

गुणसूत्रं आणि आपलं व्यक्तिमत्त्व यांचं नातं तसं अनेकांना बऱ्यापैकी माहीत आहे.

चीनने सध्या  कर्करोग रुग्णांची गुणसूत्रं अभ्यासण्याचे अफाट असे काम हाती घेतले आहे.

चीनने सध्या  कर्करोग रुग्णांची गुणसूत्रं अभ्यासण्याचे अफाट असे काम हाती घेतले आहे.. सध्या कर्करोगावर एकसारखीच औषधं दिली जातात. पण नव्या चिनी पद्धतीत रुग्णाप्रमाणे, रुग्णागणिक औषधं बदलतील. म्हणजे आपल्या आयुर्वेदात सांगितल्यानुसारच ते करणार..

आपण आपण का असतो.. उंच, बुटके, गोरे, सावळे, गव्हाळ वर्णाचे, भुऱ्या केसांचे, घाऱ्या डोळ्यांचे.. घामट, सारखे पडशानं बेजार असणारे, कधीच कशानं आजारी न पडणारे वगैरे वगैरे ते केवळ गुणसूत्रांमुळे हे आता काही कोणाला सांगायची गरज नाही. गुणसूत्रं आणि आपलं व्यक्तिमत्त्व यांचं नातं तसं अनेकांना बऱ्यापैकी माहीत आहे.

जगात या गुणसूत्रांवर मोठं संशोधन सुरू आहे. कारण एकाच परिस्थितीत राहणाऱ्या, एकसारखं अन्न खाणाऱ्या अशा दोन जणांपैकी एकाला एक आजार होतो आणि दुसऱ्याला तो का नाही, हा प्रश्न या संशोधनातला कळीचा मुद्दा आहे. हे आजारपण साधं सर्दी-पडशासारखं असलं तर ठीक. पण त्यापेक्षा अधिक गंभीर असेल तर हे संशोधन अगदीच महत्त्वाचं ठरतं. जगातल्या अनेक बडय़ा कंपन्यांनी या संशोधनावर कोटय़वधी रुपये गुंतवलेत. लष्करी साधनसंपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या खालोखाल जगात आर्थिक ताकद औषध कंपन्यांची असावी. म्हणजे लक्षात येईल यात किती प्रचंड गुंतवणूक झालेली आहे ते.

यातला सगळ्यात मोठा गुंतवणूक वाटा आहे तो कर्करोगासंदर्भात. सारख्याच परिस्थितीत वाढणाऱ्या दोघांतील एकाला कर्करोग का होतो? व्यसनांच्या बाबत सुपारीच्या खांडाचंच फक्त व्यसन नसलेले ठणठणीतपणे जगतात. पण कसलंही काहीही व्यसन चुकूनसुद्धा न करणाऱ्याला कर्करोग गाठतो, तो कसा? कर्करोगाचे सुद्धा किती प्रकार. पण ते काहींनाच का होतात?

या सगळ्याच्या मुळाशी त्या व्यक्तीची गुणसूत्रं असतात. एखाद्याच व्यक्तीच्या शरीरातली ही गुणसूत्रं, जनुकं मिळून त्या व्यक्तीच्या शरीरात हैदोस घालू शकतात. कोणत्या तरी कारणानं या गुणसूत्रांना आदेश जातो आणि शरीरातल्या कोणत्या तरी अवयवातल्या पेशी स्वत:ची संख्या भरमसाट वाढवण्याचा निर्णय घेतात. मग एखाद्या अवयवात अचानक पेशीसमूहांची वाढ व्हायला लागते. आपण म्हणतो त्याला कर्करोग झालाय. मग उपचारातनं या पेशींच्या समूहाचा नायनाट करणं हे सुरू होतं. काहींच्या बाबत हा पेशीसमूह त्याला दाद देतो. काहींचं शरीर ऐकत नाही. हे पेशीसमूह वाढतच राहतात. कोणाचंच ऐकत नाहीत. इथेही पुन्हा मुद्दा हाच की काहींचं शरीर उपचारांना प्रतिसाद देतं, तर काहींचं नाही, असं का होत असावं?

याच प्रश्नाच्या उत्तरात जगातले अनेक संशोधक, औषध कंपन्या, काही देश लागलेले आहेत. माणसांचं आयुष्यमान सुधारणं हे कोणत्याही सरकारला हवंच असतं. कारण त्यामुळे सामाजिक क्षेत्रासाठी जास्त खर्च करावा लागत नाही. त्यामुळे नागरिक निरोगी आहेत हे संबंधित सरकारांच्या फायद्याचंच असतं. या फायद्याकडे पाहून असेल, पण सरकारलाही वाटत असतं आपल्या नागरिकांच्या आरोग्यावर आपल्याला फार खर्च करायला लागू नये. त्यामुळे अशी अनेक सरकारं आपापल्या प्रदेशातल्या नागरिकांना होणाऱ्या आजारांवर संशोधन करतायत. या सर्व आजारांत कर्करोग हा एक आजार असा आहे की तो या सगळ्या भौगोलिक मर्यादा ओलांडून जगभर पोहोचलाय. त्यामुळे अशा आजारांवरील संशोधनाचा मोठा वाटा हा कर्करोगावर खर्च होतोय.

तीन देश यासाठी लक्षात घ्यायला हवेत. या तीनही देशांनी कर्करोगावरील संशोधनासाठी अमाप.. किती? अ..मा..प.. अक्षरश: पाण्यासारखा पैसा यावर ओतलाय. तो करणारे हे तीन देश कोणते? एक अर्थातच अमेरिका. दुसरा जागतिक राजकारण, अर्थकारणात अमेरिकेशी स्पर्धा करणारा चीन आणि तिसरा देश जरा धक्कादायक वाटेल, पण सौदी अरेबिया. हे तीनही देश धनाढय़ आहेत यापेक्षा वेगळे काही कारण यामागे देता येणार नाही. असं दोन देशांबाबत म्हणता येईल. अमेरिका आणि सौदी. ते आपले वैद्यकीय नजरेतनं आणि नंतर आपल्या औषध कंपन्यांना याचा कसा नफा करून देता येईल, या विचारानं या संशोधनात रमलेत.

चीनचं मात्र तसं नाही. कर्करोग उच्चाटनात वा नियंत्रणात आपलीच मक्तेदारी असावी, असा चीनचा आग्रह आहे. संशोधनावरची बौद्धिक संपदा, औषधांवरचं नियंत्रण आदींवर आपलं आणि आपलंच नियंत्रण असावं, असा चीनचा आग्रह आहे. गेल्या दहाएक वर्षांत चीन हा अमेरिकेस टक्कर देण्याची इच्छा बाळगून आहे. महासत्तापदाकडे तो झेपावतोय. आणि महासत्तापद म्हणजे केवळ अचाट लष्करी ताकद मिळवणं नव्हे. जगण्याशी संबंधित अनेक घटकांवर त्यासाठी हुकूमत लागते. चीनचा तो प्रयत्न आहे. त्यासाठी एक क्षेत्र चीनच्या डोळ्यासमोर आहे. ते म्हणजे आरोग्य आणि त्यातही पुन्हा कर्करोगावरचे उपचार. इथपर्यंत सर्व ठीक एक वेळ. पण एवढय़ावरच थांबला तो चीन कसला?

या देशानं एक अफाट प्रयोग हाती घेतलाय.

तो म्हणजे जगभरातनं किमान १ कोटी कर्करोग रुग्णांची गुणसूत्रं अभ्यासायची. आणि नुसतीच अभ्यासायची नाहीत तर आपल्या संशोधन केंद्रांत हा सगळा डेटा.. माहिती तपशील..  जमा करून ठेवायचा. चीनची स्वत:ची अशी कार्यशैली आणि पद्धती आहे. तो चर्चा, परिसंवादात वेळ घालवत नाही. थेट कामाला लागतो. त्यानुसार हे गुणसूत्रांचे नमुने गोळा करायला चीननं सुरुवात केलीये.  बीजिंगमधल्या Tsinghua विद्यापीठात या कामाला सुरुवात झालीये. इतके सगळे नमुने काही लगेच गोळा करून होणार नाहीत. चीननं त्यासाठी तीन वर्षांची मुदत घालून घेतलीये. अमेरिकेत कर्करोगावर उपचार आणि संशोधन केलेले Dr Yang Xuerui हे मूळचे चिनी संशोधक या मोहिमेचे प्रमुख आहेत. जगातल्या सर्व वंशीय कर्करोग रुग्णांच्या गुणसूत्रांचे नमुने या विद्यापीठात गोळा केले जाणार आहेत. तशी त्याला सुरुवातही झाली आहे.

यात आव्हान आहे ते संगणकाचं. कारण इतक्या जगड्व्याळ आकाराची माहिती साठवायची, तिचं पृथक्करण करायचं, निष्कर्ष नोंदवायचे वगैरेंसाठी तितकीच महाप्रचंड संगणक यंत्रणा हवी. आजमितीला चीनमधील संगणक क्षमता प्रचंडच आहे. पण या कर्करोग प्रकल्पासाठी ती महाप्रचंड असायला हवी. त्यामुळे चीन सध्या या विद्यापीठात मोठमोठी दालनं उभारून संगणकाचे सव्‍‌र्हर्स ठेवायची व्यवस्था करतोय.

चीनच्या पद्धतीप्रमाणे हे सगळं एकाच वेळी सुरू आहे. म्हणजे हे काम झाल्यावर ते बघू.. वगैरे असला प्रकार नाही. अशी अनेक आघाडय़ांवर बांधून घेऊन सुरुवात केली की कामं लवकर पूर्ण होतात. तेव्हा आपला हा प्रकल्पही वेळेत पार पडेल अशी चीनला खात्री आहे. एकदा यातल्या माहितीच्या पृथक्करणाला सुरुवात झाली की त्यातून आढळणारे निष्कर्ष औषध कंपन्यांना सादर केले जाणार. या औषध कंपन्याही अर्थातच चिनी. आणि त्यानंतर मग या औषध कंपन्या त्या त्या रुग्णापुरतीच औषधं तयार करणार. सध्या कर्करोगावर सरसकट एकसारखीच औषधं दिली जातात. पण नव्या चिनी पद्धतीत रुग्णाप्रमाणे, रुग्णागणिक ही औषधं बदलतील.

म्हणजे आपल्या आयुर्वेदासारखंच अगदी. आयुर्वेदही असंच सांगतो. उपचार व्यक्तीनुसार असायला हवेत, एकच एक औषध सरसकट सगळ्या रुग्णांना देऊ नये, प्रत्येक रुग्णाची प्रकृती भिन्न असते, तेव्हा त्या औषधांचा त्याच्यावर होणारा परिणामदेखील भिन्न असतो.

हे सगळं आपल्याला तसं माहितीचं. कारण आयुर्वेदाची ही अशी महती आपण ऐकतच असतो कायम.

तेव्हा मुद्दा तो नाही.

लक्षात घ्यायला हवी ती बाब म्हणजे हे चीन जसं काही करतोय, तसं काही आपणही करायला हवं हे आपल्या एखाद्या आयुर्वेद औषध कंपनीला वगैरे कधी वाटलं का? चीनच्या या प्रयोगात त्या देशाच्या सरकारचा सहभाग आहे. उठता बसता भारतमाता की जय..च्या आरोळ्या ठोकणाऱ्या आपल्या राष्ट्रप्रेमी सरकारला आयुर्वेदासाठी असं काही शास्त्रशुद्ध संशोधन करायची गरज कधी वाटली का? आपण काय केलं त्यासाठी? शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर टिकून राहील, काळाच्या पुढे जाईल असं हे काही करणं हे गर्व से कहो.. या शाब्दिक शड्डूपेक्षा जास्त महत्त्वाचं नाही का? आणि मुख्य म्हणजे याची जाणीव आपल्याला कधी होणार? की आपण आपली चिनी वस्तूंवर बहिष्काराची पोकळ, निर्बुद्ध आवाहनंच सहन करायची?

सोप्या मार्गाची सवय लागली की हे असं होतं.

गिरीश कुबेर @girishkuber

girish.kuber@expressindia.com

First Published on September 23, 2017 2:31 am

Web Title: cancer research in china