अमेरिका अनेक आघाडय़ांवर आपल्यापेक्षा किती तरी पुढे आहे. मात्र गेल्याच आठवडय़ात जाहीर झालेल्या एका अहवालानुसार भारतानं एका क्षेत्रात अमेरिकेलाही मागे टाकलंय. पण त्या घटनेचा आनंद मानायचा की खेद.. असा प्रश्न काही मोजक्या विचारीजनांना पडू  शकेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी तुलना केलेली हल्ली अनेकांना आवडत नाही. कमीपणाचं वाटतं काहींना तुलना करणं. त्यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करून ज्यांना तुलनेत कमीपणा वाटत नाही त्यांच्यासाठी विषय समजून घेण्याचा सोपा मार्ग म्हणून ही तुलना करायला हवी.

ती करायची आहे दोन अतिअसमान व्यवस्थांत. त्यातल्या एकाचं नाव युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका..जिथं जगाच्या लोकसंख्येच्या फक्त पाच टक्के लोक राहतात आणि तरीही जवळपास २५ टक्के इतकं औद्योगिक उत्पादन करतात. दुसऱ्याचं नाव भारत. जगाच्या लोकसंख्येच्या १७ टक्के मानव या देशात राहतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत १७ टक्के इतकाही त्यांचा वाटा नाही. तेव्हा ही तुलना असमान आहे, हे तर उघड आहेच.

तरीही ती करायलाच हवी.. का? ते पुढे कळेलच. पहिल्यांदा तुलना.

गेल्या आठवडय़ात मुंबई विमानतळावर बराच वेळ थांबून राहावं लागलं. विमानात बसलोय. पण उड्डाणाची परवानगीच नाही. अनेकांनी हा अनुभव घेतलाच असेल. तर त्या वेळी कारण विचारलं तर कळलं की धावपट्टीच्या टोकाला काही तरी काम निघालंय. म्हणून विमानं थांबवून ठेवलीयेत. तो कर्मचारी म्हणाला.. काय करणार? एकच धावपट्टी आहे ना आपल्याकडे.

एकच. म्हणजे सहारला गेलं तर छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं परदेशी विमानंही त्याच धावपट्टीवरनं उडणार आणि सांताक्रूझला गेलं की छत्रपती शिवाजी देशांतर्गत विमानतळावरनं देशातल्या देशात जाण्यासाठीची विमानंही त्याच धावपट्टीवरनं उडणार. विमान कर्मचारी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या वेदनेवरनं गेल्या वर्षी शिकागोतला प्रसंग आठवला. तिथल्या विमानतळावर जो घ्यायला आला होता तो अमेरिकी सहज माहिती देत होता.. शिकागोच्या विमानतळावर एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल आठ धावपट्टय़ा आहेत. आम्ही पाचच वापरतो जास्तीत जास्त..असं तो सहज म्हणून गेला. आता त्याला आपण थोडंच सांगणार आम्ही तर एकच वापरतो म्हणून..

तर अमेरिकेतल्या विमानतळांची संख्या आहे १३,५१३ इतकी. त्या तुलनेत भारतात एकूण विमानतळ आहेत ३४६. यात सगळे आले. वापरातले आणि न वापरातलेही. अमेरिकेतले हे सगळे वापरातलेच आहेत. म्हणजे विमानतळांच्या मुद्दय़ावर अमेरिकेत आपल्यापेक्षा ३९ पटींनी अधिक विमानतळ आहेत.

आता रस्ते. तो अवघा जेमतेम ३० कोटी लोकसंख्येचा देश. त्या देशात दरडोई प्रति हजार लोकसंख्येसाठी महामार्गाची लांबी आहे २२.२२ किमी इतकी. आपल्या देशाची लोकसंख्या १३० कोटी. पण इतक्या लोकसंख्येच्या प्रवास सोयीसाठीच्या महामार्गाची दरडोई प्रति हजार लांबी आहे ५.३९ किमी इतकी. म्हणजे रस्त्यांच्या आघाडीवर अमेरिका आपल्यापेक्षा आठ पटींनी मोठी आहे. हे झालं साध्या रस्त्यांचं. पण आता अतिजलद असे महामार्गही असतात. आपल्याकडे अशा अतिजलद महामार्गाची लांबी आहे २१,१८१ किलोमीटर इतकी. अमेरिकेत अतिजलद महामार्ग आहेत ७६,३३४ किलोमीटर इतके लांब. म्हणजे आपल्यापेक्षा चौपट. या रस्त्यांवर वाहने हवीत. त्याशिवाय प्रवास कसा करणार? तर आपल्याकडे दरडोई प्रतिहजारी वाहनांची संख्या आहे १२. तर अमेरिकेत हेच प्रमाण आहे ८१९. म्हणजे हजारातल्या ८१९ जणांकडे अमेरिकेत मोटारी आहेत. आपल्या तुलनेत अमेरिका ६८ पट पुढे आहे. हे झालं खासगी मोटारींचं. आता प्रवासी मोटारी वा गाडय़ा. दर हजार प्रवाशांसाठी आपल्याकडे मोटारी आहेत ८ तर इतक्याच प्रवाशांसाठी अमेरिकेतल्या मोटारींची संख्या आहे ४५०. म्हणजे या आघाडीवर आपल्यापेक्षा ५६ पट अधिक. आपल्याकडे रेल्वेची एकूण लांबी आहे ६५ हजार किलोमीटर इतकी. अमेरिकेत रेल्वे आहे २,२४,७९२ किलोमीटर इतकी लांब. म्हणजे आपल्या साधारण तिप्पट.

तरीही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना अमेरिकेतल्यापेक्षा मध्य प्रदेशातले रस्ते चांगले आहेत, या झालेल्या साक्षात्काराकडे दुर्लक्ष करून या दोन देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना करता येईल.

दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केलं होतं की भारतीय अर्थव्यवस्थेनं दोन लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला ते. फार मोठी घटना होती ती आपल्यासाठी. पण अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे १६ लाख कोटी डॉलर्सची. म्हणजे आपल्यापेक्षा ८०० टक्के मोठी. आपलं दरडोई वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे २,६२५ डॉलर्स. अमेरिकी नागरिकाचं त्या तुलनेत उत्पन्न आहे ४५,७६० डॉलर्स एवढं. म्हणजे पुन्हा आपल्यापेक्षा साधारण १७ पट अधिक. इतकी श्रीमंत जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा ती श्रीमंती भविष्यासाठी वापरते. देशांचंही हेच आहे. म्हणजे अमेरिका आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातला प्रचंड वाटा शिक्षणावर खर्च करतो. त्यामुळे तिथल्या शाळा सुंदर असतात, शाळेच्या भिंतींचा रंग उडालेला नसतो किंवा पोपडे निघालेले नसतात, शिक्षक समाधानी असतात आणि मुलांनाही हवंहवंसं असं वातावरण असतं. अशा समाजात ‘मला शिक्षकच व्हायचंय’ असं म्हणून शिक्षक होणाऱ्यांची संख्या मोठी असते. म्हणजे बाकी काही जमत नाही..केलं आपलं बीएड्/ डीएड् आणि चिकटले शिक्षक म्हणून असं होत नाही. तर अमेरिका त्यांच्या देशाच्या प्रचंड अर्थसंकल्पातली तब्बल सात टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करते. आणि आपण? आपल्या मुळातल्या तुटपुंज्या अर्थसंकल्पातली जेमतेम ३.७ टक्के इतकी रक्कम शिक्षणासाठी देतो. (जाता जाता.. तुलना न आवडणाऱ्या राष्ट्राभिमान्यांना आवडणार नाही पण हेही सांगायला हवं की भाजपनं आपण सत्तेवर आलो की शिक्षणावरची तरतूद दुप्पट करू असं आश्वासन दिलं होतं. तीन अर्थसंकल्प गेले. तरतूद होती तितकीच आहे. असो.) या अशा भरभक्कम तरतुदींमुळे अमेरिकेत प्राथमिक शिक्षणावर जास्त लक्ष दिलं जातं. आपण प्राथमिक शिक्षणात पाच र्वर्षे घालवतो. अमेरिकी पोरं सहा र्वर्ष प्राथमिक शिकतात. या इतक्या पैशाचा दुसरा परिणाम म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे प्रमाण. प्राथमिक पातळीवर आपल्याकडे दर ३६ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असं प्रमाण आहे. तर अमेरिकेत १४ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो.

असे किती मुद्दे काढावेत? अनेक आघाडय़ांवर तुलना करता येईल.

पण ती आताच का करायची..असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

ती आताच करायची कारण गेल्याच आठवडय़ात जाहीर झालेला अहवाल. त्या अहवालानुसार भारतानं एका क्षेत्रात अमेरिकेलाही मागे टाकलंय.

म्हणजे फारच अभिनंदनीय घटना.

पण त्या घटनेचा आनंद मानायचा की खेद.. असा प्रश्न काही मोजक्या विचारीजनांना पडू शकेल. निदान तो पडायला हवा.

याचं कारण असं की आपण अमेरिकेला मागे टाकलंय ते मोबाइल हॅण्डसेटच्या संख्येत. गेल्या आठवडय़ात जाहीर झालेल्या तपशिलानुसार भारतातल्या मोबाइल हॅण्डसेट्सची संख्या ११८,६७,९०,००५ .. म्हणजे ११८ कोटी ६७ लाख ९० हजार ५ इतके मोबाइल या देशात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल २३ टक्के इतकी आहे. पण अमेरिका मात्र  फक्त ३७ कोटींच्या आसपासच अडकून राहिलीये. आपली आता स्पर्धा आहे ती फक्त चीनशी. (पुन्हा एकदा जाता जाता ..आपल्याकडे सगळ्यात जास्त मोबाइल फोन्स हे चिनी आहेत. त्या बहिष्काराचं काय झालं हे एकदा पाहायला हवं. पुन्हा एकदा असो.) चीनमध्ये १३२ कोटी इतके मोबाइल फोन्स आहेत. आणि चीनलाही मागे टाकलं की झालंच. आपण जगातले सर्वाधिक मोबाइलधारी देश. म्हणजे आपल्या महानपणावर शिक्कामोर्तबच तसं.

तर हे असं आहे. दीवार सिनेमातल्यासारखं. त्यात अमिताभ म्हणतो..माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, नोकरचाकर आहेत. तुझ्याकडे आहे काय? त्यावर सिनेमातला शशी कपूर उत्तरतो.. मेरे पास माँ है. तसं अमेरिका म्हणते..आमच्याकडे उत्तम रस्ते आहेत, हजारो विमानतळ आहेत, प्रचंड रेल्वे जाळं आहे, उत्कृष्ट शिक्षण आहे ..तुमच्याकडे आहे काय?

त्यावर भारत म्हणेल .. मेरे पास मोबाइल है.

कालच अ‍ॅपलचा iPhone X भारतात आलाय. त्या निमित्तानं ..

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India is second largest mobile using country indian economy american economy
First published on: 04-11-2017 at 01:42 IST