गिरीश कुबेर

Maratha Reservation Refusal to grant urgent interim injunction to anti-reservation petitioners
मराठा आरक्षण : आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांना तातडीचा अंतरिम आदेश देण्यास नकार
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
Nagpur, RTI Activist, Alleges, Factory Blast case, Torn Application, Directorate of Industrial Safety and Health Management,
सोलार कंपनीतील स्फोट प्रकरण : कारवाईबाबत माहिती मागितली तर अर्जच फाडला; माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा

साथीची संहारकता भारत, दक्षिण आशियाई वा दक्षिण अमेरिकी देश इथं फारशी नसण्याच्या कारणामागची पहिली दोन कारणं गैरलागू; मग तिसरं कारण काय असू शकतं? याचा कसून शोध त्या दोघांनी घेतला..

करोना हाताळणीत भारताइतकी वा क्वचित आपल्यापेक्षाही सरस कामगिरी करणाऱ्या देशांचा आढावा गेल्या ‘अन्यथा’त (‘सार्वभौमांचा काळ’) घेतला गेला. हेतू त्यामागचा हा की आपल्याइतकंच ‘कार्यक्षम’ सरकार आसपासच्या अनेक देशांत आहे याची जाणीव होऊन समस्त आशिया, आफ्रिका खंडाच्या अभिमानानं आपली छाती फुलून यावी. समस्त आशिया, आफ्रिका खंड अशासाठी म्हणायचं की आपल्या मायदेशाचा अभिमान बाळगता बाळगता या आपल्या अन्यदेशीय बांधवांचंही कौतुक आपल्याला करता यावं म्हणून. कारण त्यातल्या काही देशांत करोनाबाधितांची संख्या फक्त तीन आकडी आणि मृतांची संख्या तर दोन आकडी असल्याचं दिसून आलं.

तो तपशील दिल्यानंतरच्या आठवडय़ात आपलं संसदेचं अधिवेशन सुरू झालं. सरकारातल्या अनेकांनी या अधिवेशनात सांगितलं की करोना हाताळणीत जगातल्या अनेक देशांपेक्षा आपली कामगिरी सरस आहे कारण आपल्या सरकारनं दाखवलेली कार्यक्षमता. त्यामुळे दर दशलक्ष नागरिकांमध्ये आपल्याकडे बळींचं प्रमाण अत्यंत कमी आहे. परत इंग्लंड, अमेरिका, जर्मनी अशा अनेक देशांप्रमाणे आपल्या किनाऱ्यावर अद्याप तरी करोनाच्या दुसऱ्या लाटा थडकू लागलेल्या नाहीत. परिणामी आपल्याकडे आता करोनास्ताचा काल सुरू झाल्याचं मानलं जातंय. केंद्र सरकारने – पहिल्या टाळेबंदीचा धसका घेतल्यामुळे असेल बहुधा – एकामागोमाग एक अनेक बंद गोष्टी सुरू करायचा धडाका लावलाय. चित्रपटगृहं, तरणतलाव वगैरे.

या सगळ्याचा अर्थ इतकाच की आपण करोनावर उत्तम प्रकारे मात केली यावर आता शिक्कामोर्तब होत चाललंय. या करोना पराभवामागे कृतिशील, धाडसी, कर्तव्यतत्पर असं बरंच काही सरकार आहे, असंही आपल्याला सांगितलं जातंय. आता इतके सारे सांगतायत म्हणजे खरं असावं ते. असू दे.

पण ‘यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ या महत्त्वाच्या संस्थेनं एक प्रबंध प्रकाशित केलाय. डॉ. परवीन कुमार आणि डॉ. बालचंदर यांनी तो लिहिलाय. अमेरिकी संस्था आणि या दोघांचा त्यात निबंध म्हणजे हे दोघेही आपल्याला सल्ले देणाऱ्या अगणित अनिवासी भारतीयांपैकी असतील असाच कोणाचाही समज होईल. पण हे दोघेही हिमाचलातील कांग्रा इथल्या डॉ. राजेंद्र प्रसाद सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात असतात. म्हणजे त्यांची पाहणी, तिचे निष्कर्ष वगैरे आत्मनिर्भरतेच्या कसोटीवर उतरतील यात शंका नाही. म्हणून मग, ते मान्य करायला काही हरकत नाही.

‘‘आपल्या वा आपल्याप्रमाणे अन्य देशांतल्या नागरिकांना ‘ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियां’च्या ‘हाय मायक्रोबियल एक्स्पोजर’चा सामना मोठय़ा प्रमाणावर करावा लागत असल्याने त्यांच्यात मोठय़ा प्रमाणावर करोना-विषाणूविरोधात चांगली प्रतिकारशक्ती तयार झाली आणि त्यामुळे या आजाराच्या साथीतील बळींचे प्रमाण उपरोल्लेखित देशांत कमी राहिले,’’ असं या दोघांचा प्रबंध सांगतो.

याचा साधा अर्थ असा की या देशांतील नागरिकांना दारिद्रय़, अस्वच्छता, अन्य साथीचे आजार किंवा न्यूमोनिया वगैरेंचा इतका सामना करावा लागतो की त्यांच्यात करोनासारख्या विषाणूशी दोन हात करण्याची क्षमता अंगभूतच असते. यात ‘ग्राम निगेटिव्ह’ असा ज्या जिवाणूंचा उल्लेख केलेला आहे त्या एक प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे त्यांचा अंतर्भाव असलेल्या शरीरांत ‘इंटरफेरॉन टाइप १’ या नावानं ओळखला जाणारा एक प्रथिन-समूह प्रसृत होतो आणि मग ही प्रथिनं करोनाच्या विषाणूला झोपवतात.

म्हणजे आपल्या आणि आपल्यासारख्या अन्य देशांतली अस्वच्छता, उघडय़ावरची गटारं, धूळ, शुद्धाशुद्धतेच्या सीमारेषेवर असलेलं पिण्याचं पाणी, त्याच्या गळक्या वाहिन्या आणि गंजक्या साठवण टाक्या वगैरे अशा अनेक घटकांमुळे आपल्या शरीरात प्रगत देशांच्या तुलनेत अतिरिक्त, अधिक अशी प्रगत ‘संरक्षण व्यवस्था’ तयार होते. म्हणून करोनाच्या व्यापक साथीनंतरही आपल्या देशात या साथीत बळी पडलेल्यांची संख्या तितकी मोठी नाही.

आता ही या दोघांची वरवर परिस्थिती पाहून व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे की काही निश्चित पद्धतीनं केलेल्या शास्त्रीय पाहणीचा हा निष्कर्ष आहे?

हा प्रबंध लिहिण्याआधी या वैद्यकद्वयीनं तब्बल १२२ देशांतल्या आकडेवारीचा प्रदीर्घ अभ्यास केला. या १२२ देशांमधले ८० देश हे श्रीमंत वा विकसित निवडले आणि उर्वरित ४२ हे गरीब वा अर्धविकसित. यात जमा झालेल्या माहितीच्या आणि आकडेवारीच्या चिरफाडीनंतर समोर आलेलं सत्य असं की अमेरिका, इंग्लंड, इटली, फ्रान्स आणि स्पेन या उद्योगसंपन्न आणि सुदृढ सार्वजनिक आरोग्य सेवाधारी देशांत करोनाचा प्रकोप अधिक आहे. आपल्याकडे १८९७ सालच्या प्लेग साथीत जशी माणसं बघता बघता कोसळत आणि गतप्राण होत, तशी यंदा त्या देशांची परिस्थिती होती.

पण त्या तुलनेत अनेक विकसनशील, अर्धविकसित आणि थेट मागास देशांत तुलनेनं करोनासाथीत माणसं मरण्याचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. हे देश अर्थातच आशिया, आफ्रिका वा लॅटिन अमेरिकेत आहेत. या देशांत आपल्या धारावीसारख्या वस्त्या आहेत, नागरिकांना अर्धपोटी राखणारी विपन्नावस्था आहे आणि सार्वजनिक आरोग्यसेवाही बेतास बात वा असून नसल्यासारख्याच आहेत. त्यामुळे या देशांत करोनाचा फैलाव झाला तर सरकारांना आणि आरोग्यसेवकांना पळता भुई थोडी होईल अशी भीती सर्रास व्यक्त केली जात होती. ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकाने मात्र अनेक पद्धतींनी, ‘कोविडोस्कोप’सारख्या स्तंभातून करोनाचं वास्तव आणि सरकारी निर्बंधाचा अतिरेक याकडे लक्ष वेधण्याचा सातत्याने प्रयत्न केला.

या ‘आत्मनिर्भर’ वैद्यकांच्या संशोधनातून नेमकी हीच बाब सिद्ध होते. जगात अनेक देशांत करोनानं इतका हाहाकार होत असताना काही देशांत मात्र त्याचा दंश इतका कमी कसा, या प्रश्नातून उभयतांच्या या संशोधनास सुरुवात झाली. त्यांच्या मते हा संहार कमी असण्याची शक्यता दोन कारणांमुळे असू शकते. एक म्हणजे या देशांत अनेकांना करोनाबाधा होऊन समूह-प्रतिकारशक्ती तयार झाली असावी किंवा मोठय़ा प्रमाणावर या देशांत लसीकरण झालं असावं.

यातलं काहीच या देशांत घडलेलं नाही, हे उघड आहे. तेव्हा या साथीची संहारकता फारशी नसण्याच्या कारणामागे तिसरं कारण काय असू शकतं, हा प्रश्न निर्माण झाला.

‘इंटरफेरॉन टाईप १’ हे त्याचं उत्तर असावं असं या दोघांच्या लक्षात आलं. प्रत्येकाच्या शरीरात गरजेप्रमाणे कमीअधिक असा हा प्रथिन समूह तयार होत असतो. त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती या इंटरफेरॉनवर अवलंबून असते. मग याच देशांतल्या इतक्या साऱ्या नागरिकांच्या शरीरांत हे इंटरफेरॉन का तयार झालं, याचा शोध सुरू झाला.

अनेक प्रकारचं ‘मायक्रोबिअल इन्हिबिशन’ आणि ‘ग्राम निगेटिव्ह’ बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव ही दोन कारणं यातून समोर आली. तो सारा अभ्यासलेख, ncbi.nim.nih.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

याचा तुम्हाआम्हास कळणारा अर्थ इतकाच की भारताप्रमाणेच या समानशीलेषु देशांतील नागरिकांना इतक्या काही जिवाणू, विषाणूंना सामोरं जावं लागतं की त्यामुळे त्यांच्या शरीरात विकसित देशांतील नागरिकांपेक्षा अतिरिक्त अशी ‘सुरक्षा यंत्रणा’ तयार होते.

खरं तर आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी हा अनुभव घेतलेला असतो. चाळीत राहणाऱ्या, मातीत खेळणाऱ्या पोराटोरांच्या तुलनेत पलीकडच्या बंगल्यात राहणाऱ्या, नीटनेटकं असणाऱ्या ‘गुड बॉइज’ची प्रकृती जरा जास्तच तोळामासा असते. ही चाळीतली पोरं थेट नळाला तोंड लावून पाणी पिणाऱ्यांतली असतात तर हे गुड बॉइज ‘मिनरल वॉटर’नं आपली तहान शांत करतात. पहिल्या गटातले वडापाववर आनंदाने ताव मारतात तर दुसऱ्यांना हे ‘फूड’ अनहायजेनिक वाटत असतं.

मग कधी तरी करोना येतो आणि त्या श्रीमंत गटातल्यांना त्याचा जास्त फटका बसतो. या सर्वमान्य निरीक्षणाला वर उल्लेखलेल्या दोघांच्या शास्त्रीय पाहणीनं सैद्धांतिक आधार दिलाय. येल विद्यापीठात सादर झालेल्या दुसऱ्या एका पाहणीचाही निष्कर्ष असाच आहे. ‘करोनाचा विषाणू सर्व देशांतल्या समान वयाच्या नागरिकांवर समान परिणाम करत नाही. श्रीमंत, शहरी देशांच्या तुलनेत गरीब आणि ग्रामीण जनजीवन शाबूत असणाऱ्यांना त्याचा कमी त्रास झाला कारण त्यांची प्रतिकारशक्ती अधिक चांगली असते,’ हा या पाहण्यांचा निष्कर्ष.

करोना फैलाव रोखण्यातल्या सरकारच्या कथित कार्यक्षमता आणि यशामागाचं खरं कारण हे आहे तर!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber