02 July 2020

News Flash

एक पत्थर तो तबियत से उछालो यारों..

आपल्याला काळजी वाटत होती तितकी काही अमेरिका बदललेली नाही. ती होती तशीच आहे.

स्टेफनी विल्किन्सन

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber

नाही.. आपल्याला काळजी वाटत होती तितकी काही अमेरिका बदललेली नाही. ती होती तशीच आहे. मोकळी. मतभिन्नतेचं स्वागत करणारी..

गेल्या वर्षी पहिल्यांदा या रेस्तराँविषयी लिहिलं होतं. (‘..आणि दगडफेक झाली नाही!’- २८ जुलै २०१८) रेड हेन नावाचं हे रेस्तराँ चांगलंच गाजलं. व्हर्जिनिया राज्यातल्या, लेक्सिग्टन शहरामधल्या या रेस्तराँमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्धी प्रमुख सारा हकबी सँडर्स आपल्या कुटुंबीयांसमवेत गेल्या असता त्या रेस्तराँच्या मालकानं त्यांना खाद्यपदार्थ द्यायला नकार दिला. त्यामुळे सारा हकबी यांना अपमानित होऊन तिथून जावं लागलं.

या रेस्तराँमालकानं असं करण्याचं कारण म्हणजे ट्रम्प यांची प्रतिगामी धोरणं. त्यामुळे अशा अध्यक्षाच्या कार्यालयात असणाऱ्याचं आम्ही स्वागत करणार नाही, अशी रेस्तराँमालकाची भूमिका. यावर मग सारा हकबी यांनीही लिहिलं आणि हे प्रकरण ट्रम्प यांनी ट्वीट केलं. त्यानंतर चांगलंच वादळ उठलं. काय काय झालं या काळात?

या हॉटेलच्या मालकीणबाई/ भागीदार स्टेफनी विल्किन्सन यांनी ही दास्ताँ जगासमोर आणलीये.

झालं असं की सारा हकबी यांना जवळपास ‘जा’ असंच सांगितल्यानंतर या रेस्तराँच्या मालकांना वाटलं प्रकरण मिटलं. तेवढय़ापुरतंच ते. ती होती शनिवारची दुपार. रविवारही तसा शांततेतच गेला. पण तोपर्यंत सारा हकबी आणि रात्री उशिरा ट्रम्प यांनी निषेध करण्याच्या निमित्तानं हे प्रकरण चव्हाटय़ावर आणलं. कोणताही हॉटेलमालक असं कसं वागू शकतो, यामागे डेमोक्रॅटिक पक्षाचंच कारस्थान आहे, हा मला बदनाम करण्याचा कट आहे.. वगैरे वगैरे असं ट्रम्प बरंच काही बोलले.

यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे या रेस्तराँमालकाची कृती म्हणजे आपल्या सरकारचा अपमान आहे, सबब या टिनपाट रेस्तराँच्या मालकांना आपण धडा शिकवायला हवा वगैरे असं काही ट्रम्प सरकारला वाटलं नाही. त्या रेस्तराँमालकाच्या घरावर ना सक्तवसुली संचालनालयाची धाड पडली ना आयकर खातं त्यांच्या मागे लागलं. पण ट्रम्प यांनी त्याविरोधात जाहीर गळा काढल्यानं त्यांच्या पक्षाचे अनुयायी मात्र या रेस्तराँमालकावर चांगलेच संतापले.

आणि मग समाजमाध्यमातनं त्याविरोधात राळ उडायला लागली. फेसबुक या रिकामटेकडय़ांच्या चव्हाटय़ावर त्याला वाचा फोडली गेल्यानं या माध्यमाआधारे आपल्या कमकुवत विचारशक्तीला पोसणाऱ्या अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातनं या रेस्तराँच्या विरोधात हवा तपावायला सुरुवात केली. त्यात अर्थातच अमेरिकेतले प्रतिगामी, वैचारिकदृष्टय़ा मागासच मोठय़ा प्रमाणावर होते हे सांगायची गरज नाही. सगळ्याच देशांत खरं तर या माध्यमांचा असा वापर करणारे बहुतेक जण असेच असतात. तर समाजमाध्यमातनं उडायला लागली त्यांच्या विरोधात राळ. या रेस्तराँचे मालकगण हे वंशद्वेषी आहेत, स्वत:स पुरोगामी समजणारे ढोंगी आहेत, अमेरिकेचे शत्रू आहेत, अमेरिकेत राहून दुसऱ्या देशाचं भलं चिंतणारे आहेत, अमेरिकेचं महानपण न पाहवणारे आहेत. अशा छापाच्या प्रतिक्रिया दुथडी भरभरून वाहायला लागल्या. तसंही हे करायला कुठं काही डोकं लागतं. आलं काही व्हॉट्सअ‍ॅपवर की करा फॉरवर्ड. हाच काय तो खेळ.

पाहता पाहता या व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाच्या कुलगुरूंनी. म्हणजे इथे प्रत्येक स्नातक हा कुलगुरूच असतो. या रेस्तराँच्या विरोधात असं काही वातावरण तापवलं की आता काय होणार अशीच चिंता वाटायला लागली. अमेरिकेत समाजमाध्यमांतल्या या निरुद्योग्यांवर पोलिसांचं लक्ष असतं. त्यामुळे त्याची दखल घेतली गेली. मामला इतका गंभीर झाला की रेस्तराँला पोलीस संरक्षण द्यायची वेळ आली. या रेस्तराँत काम करणाऱ्यांना धमक्या यायल्या लागल्या. फोन लाइन कापली गेली आणि यातल्या काही प्रतिगामी माध्यमतज्ज्ञांनी इंटरनेटच्या माध्यमातनं त्या रेस्तराँविरोधात ठरवून असा काही धडाका लावला की या रेस्तराँचं मानांकनच घसरलं. ही अशी मानांकनं तकलादू असतात. पण तरीही व्यवसायासाठी महत्त्वाचीही असतात. तीच घसरतायत म्हटल्यावर काळजी वाढली. टपाल तर इतकं यायला लागलं की ते ठेवायला जागा अपुरी पडू लागली. चार चार हजार पत्रं यायला लागली. सुरुवातीला त्यातली काही पत्रं वाचायचा प्रयत्न केला विल्किन्सन आणि सहकाऱ्यांनी. पण लगेच लक्षात आलं सगळ्यातला मजकूर एकच आहे. तंतोतंत तसा. ती पत्रं पाठवणाऱ्यांची नावं तेवढी बदललेली. पण बाकी सारं तेच. एक शिवी त्या सगळ्यात समान. ट्रम्पग्रस्त अशी. अर्थात सगळीकडे समाजमाध्यमी टोळ्यांची कार्यपद्धती सारखीच असते. पण विल्किन्सनबाईंना ते त्या वेळी माहीत नसावं.

तशा त्या धडाडीच्या. पण आपल्या रेस्तराँमधल्या कर्मचाऱ्यांची त्यांना काळजी वाटू लागली. पोलिसांनीही सल्ला दिला. काही दिवस रेस्तराँ बंदच ठेवा. विल्किन्सनबाई तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. पण भागीदारही म्हणाले. किती किती वेडपटांच्या नादाला लागणार तुम्ही. तेव्हा काही दिवस गप्प राहा. त्यांनी तो सल्ला ऐकला. रेस्तराँ बंद ठेवलं. दहा दिवस.

या दहा दिवसांत त्यांच्या मनाची काय उलघाल झाली असेल? आपल्याला व्यवसाय पहिल्यासारखा करता येणार की नाही? अमेरिका खरोखरच इतकी बदललीये? आपल्याकडे असहिष्णुता इतकी कधीच नव्हती.. ट्रम्प यांची धोरणं निश्चितच अयोग्य आहेत. मी तसं म्हटलं तर काय बिघडलं? निर्वासितांना हा देश दरवाजे बंद कसे काय करतो? ट्रम्प यांची आताची बायकोदेखील निर्वासितच आहे, त्याचं काय? सरकारवर टीकाच करायची नाही की काय?

असे अनेक प्रश्न त्यांना खायला उठले. परिसंवादात त्यांवर चर्चा करणं वेगळं आणि स्वत:च्या पोटावर त्यामुळे पाय आला की त्यांना सामोरं जाणं वेगळं याची जाणीव विल्किन्सन आणि जोडीदारांना या काळात झाली. मतस्वातंत्र्याची किंमत काय आणि किती हा खरा यातला प्रश्न. दहा दिवस या प्रश्नानं त्यांना ग्रासलं. त्यातच दहा दिवस संपले. रेस्तराँ परत सुरू करायची वेळ आली. काय होईल आता?  टीकेचा जोर कमी झालेला असेल का? अनेक चिंता. त्या तशाच मनात आणि चेहऱ्यावर वागवत त्या रेस्तराँ उघडायला आल्या.

पाहतात तर काय? समोर गर्दीच गर्दी. शेजारी सुरक्षारक्षकाकडे पत्रांचा भला मोठा गठ्ठा. छाती धडधडायला लागली ते पाहून. म्हणजे निदर्शकांचा जोर अजूनही कायमच होता. आणि निषेध करणाऱ्यांच्या संख्येतही कपात झालेली नव्हती. याचा अर्थ परिस्थिती उलट अधिकच खालावली असं त्यांच्या मनानं घेतलं. त्या खट्टू झाल्या.

पण क्षणभरच. समोरची गर्दी ही रेस्तराँच्या मालकीणबाईंच्या स्वागताची होती. सगळ्यांच्या हातात फुलं, गुच्छ वगैरे पाहिल्यावर विल्किन्सन आणि सगळ्यांना त्याचा अर्थ कळला. सगळे अभिनंदनोत्सुक. आणि पत्रं? त्यातली काही उघडल्यावर विल्किन्सन बाईंच्या डोळ्यातनं अश्रू ओघळू लागले. ती पाठिंबा देणाऱ्यांची पत्रं होती. आणि पाठिंबाही कसा? त्यातल्या अनेकांनी आपापल्या मगदुराप्रमाणे पाच, दहा डॉलर्सची नोट पत्रांतनं पाठवलेली. काहींनी कूपन्स तर काहींनी विम्याच्या हप्त्यासाठी मदत पाठवलेली. कर्मचाऱ्यांना बक्षिसी दिलेली. विल्किन्सन बाई हरखून गेल्या. नाही.. आपल्याला काळजी वाटत होती तितकी काही अमेरिका बदललेली नाही. ती होती तशीच आहे. मोकळी. मतभिन्नतेचं स्वागत करणारी. त्यानंतर जवळपास महिनाभर त्या रेस्तराँमधली गर्दी हटेना. लोक लांबलांबनं, अगदी परराज्यातनं देखील आले. जे काही खायचे ते खायचे आणि भूमिका घेतलीत म्हणून अभिनंदन करायचे.

..तर आपल्या या सगळ्या अनुभवावर त्यांनी एक छानसा लेख लिहिलाय. मी सारा हकबीला बाहेर काढणाऱ्या रेस्तराँची मालकीण.. अशी सुरुवात करत. त्या लेखाचं शीर्षक आणि सुरुवातीची काही वाक्यं फार छान आहेत. ‘रेझिस्टन्स इजन्ट फ्युटाईल’ आमचा द्वेष करणाऱ्यांना वाटलं असेल आपण संख्येने अधिक आहोत आणि ते कमी. पण वास्तव उलट आहे. लोकशाही मूल्यं मानणारे अधिक आहेत आणि ते संख्येने कमी. हा धडा आहे. भूमिका घ्यायला घाबरणाऱ्यांसाठी. त्यांनी घाबरू नये. प्रतिकार कधी वाया जात नाही. तुम्ही व्यवसायात आहात म्हणून घाबरायचं कारण नाही.’

आपला कवी दुष्यंतकुमार हेच तर सांगून गेलाय.

‘कैसे आकाश में सूराख नहीं हो सकता..

एक पत्थर तो तबियतसे उछालो यारों..’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2019 4:48 am

Web Title: red hen restaurant owner stephanie wilkinson asked sarah sanders to leave
Next Stories
1 बदलाची गरज..!
2 ‘अ‍ॅप’की आँखों में कुछ..
3 ती आहे तशीच आहे..
Just Now!
X