News Flash

वृत्तश्रवणाचा आनंद

बातम्यांचा असाच ‘श्रवणानंद’ पोहोचवणारे ‘खबरी’ हे अ‍ॅपही अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.

झपाटय़ाने बदलत असलेल्या जगात दर सेकंदाला काही ना काही नवीन घटना घडत असते. आपण सर्वच जण वृत्तपत्रे, समाजमाध्यमे, मोबाइल, इंटरनेट, टीव्ही या माध्यमांशी इतकी जोडले गेलो आहोत की आपल्या कळतनकळत, आवश्यक असो वा नसो नवीन बातमी आपल्यापर्यंत पोहोचत असते. साहजिकच मानवी मनाची जिज्ञासू वृत्ती एखाद्या घटनेबद्दलचे कुतूहल वाढवून आपल्याला त्याबद्दलची इत्थंभूत माहिती घेण्यास भाग पाडते. दुसऱ्यांपेक्षा ‘अपडेट’ राहण्याची इच्छाही आपल्याला वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यास प्रोत्साहित करते. अशा वेळी आपले हातातील काम करता करता बातम्या जाणून घेण्याची संधी ‘ऑडिओब्लीस’ नावाच्या अ‍ॅपद्वारे मिळाली आहे. विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या संकेतस्थळांवरील बातम्या एकाच अ‍ॅपद्वारे उपलब्ध करणारे ‘डेलिहंट’सारखे अनेक अ‍ॅप आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच धर्तीवर काम करणारे ‘ऑडिओब्लीस’ विविध वृत्तवाहिन्यांवरील बातम्या श्राव्य रूपात आपल्यापर्यंत पोहोचवते. गाडी चालवताना किंवा प्रवासादरम्यान, कार्यालयात काम करता करता किंवा घरातील दैनंदिन कर्तव्ये पार पाडत असताना ‘ऑडिओ’ रूपात या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. विशेष म्हणजे, अलीकडेच ‘लाँच’ झालेल्या या अ‍ॅपवर सध्या मराठीतील बातम्या श्राव्य स्वरूपात पोहोचवतात. जगभरातील विविध वृत्तवाहिन्या तसेच अन्य माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांपैकी लक्षवेधी बातम्या निवडून व त्यांची वर्गवारी करून ‘ऑडिओब्लीस’ त्या आपल्यापर्यंत पोहोचवते. या बातम्या रोजच्या रोज अपडेट केल्या जातात. विशेष म्हणजे, या बातम्या जशाच्या तशा न पोहोचवता त्या कमीत कमी शब्दांत आणि सोप्या भाषेत श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात. या बातम्या ‘ऑफलाइन’ सेव्ह करून ऐकण्याचीही सुविधा या अ‍ॅपमध्ये आहे.

बातम्यांचा असाच ‘श्रवणानंद’ पोहोचवणारे ‘खबरी’ हे अ‍ॅपही अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. ‘ऑडिओब्लीस’प्रमाणेच ‘खबरी’ही काम करते. या अ‍ॅपमध्ये जास्तीत जास्त एक मिनिटांइतक्या बातम्यांच्या ध्वनिफिती आहेत. या अ‍ॅपचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, ब्लुटुथद्वारे गाडीच्या ऑडिओ सिस्टीमच्या माध्यमातून या बातम्या मोठय़ा आवाजात ऐकता येतात.

 

आरोग्याची काळजी

बदललेल्या जीवनशैलीमध्ये आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेणे शक्य होत नाही. छोटीमोठी दुखणी अंगावर काढून आपण दैनंदिन गाडा हाकत असतो. मात्र, कधी कधी हीच दुखणी तीव्र होतात आणि त्यामुळे आरोग्य बिघडते. यासाठीच आपल्या आरोग्याबद्दल आपण सजग असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या टिप्स सांगणारे अनेक अ‍ॅप्स अँड्रॉइड किंवा अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण ‘प्रॅक्टो’ हे अ‍ॅप त्यापेक्षा पुढे जाऊन डॉक्टर आणि रुग्णांमध्ये थेट संवाद घडवून आणणारे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये प्रत्येक आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे संपर्क क्रमांक, पत्ते तसेच त्यांची अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा आहे. या डॉक्टरांनी ‘ऑनलाइन चॅट’ करून आपल्या आजाराचे किंवा आरोग्यविषयक शंकांचे निराकरण करून घेणे शक्य होते. या अ‍ॅपवर तुम्ही आपल्या सर्व आरोग्याच्या नोंदी जमा करू ठेवू शकता. त्यामुळे डॉक्टरांशी बोलताना किंवा त्यांना भेटायला गेल्यानंतर तुम्हाला एका ‘क्लिक’वर सर्व नोंदी सापडू शकतील. याशिवाय औषध घेण्याच्या वेळांचे गजर, दवाखान्यापर्यंत जायचा मार्ग, डॉक्टरांचे वेळापत्रक या गोष्टीही तुम्हाला अ‍ॅपद्वारे पाहता येतात. याशिवाय डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेही तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. याखेरीज या अ‍ॅपवर डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्याच्या टिप्सही वाचायला मिळतात.

 

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2016 1:11 am

Web Title: application world
Next Stories
1 सर्व ई मेल एका क्लिकवर
2 झटकन संदर्भ, पटकन माहिती
3 संगणकाचा ‘रिमोट कंट्रोल’
Just Now!
X