News Flash

चालता फिरता ‘वाचू आनंदे’

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वाचन कमी कमी होत चाललं आहे. एकीकडे कामाच्या वाढत्या व्यापातून सवड काढून वाचन करणे शक्य होत नाही तर दुसरीकडे, फावल्या वेळेत आपले

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वाचन कमी कमी होत चाललं आहे. एकीकडे कामाच्या वाढत्या व्यापातून सवड काढून वाचन करणे शक्य होत नाही तर दुसरीकडे, फावल्या वेळेत आपले डोळे टीव्ही किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनवर खिळलेले असतात. खरं तर वाचन हे केवळ ज्ञानसमृद्धीचेच नव्हे तर विरंगुळय़ाचेही साधन आहे. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. वर त्याचे समर्थन करण्यासाठी ‘चांगली पुस्तकेच येत नाहीत हल्ली’, ‘काय वाचावं तेच कळत नाही’, ‘सगळय़ा पुस्तकांत तेच ते असते’ अशा सबबी दिल्या जातात. वाचनाची सवय सुटत चालल्याचे दुष्परिणाम सध्याच्या तरुण पिढीच्या सामान्य ज्ञानातून अनेकदा दिसून येतात. त्यामुळे वाचन हे आवश्यकच आहे. त्यासाठी कोणते वाचनालय किंवा पुस्तकभांडाराची वाट धरायचीही गरज नाही. कारण स्मार्टफोन या आपल्या सर्वाच्याच जिवलग दोस्ताकरवी वाचनभूकही सहज भागवता येते. यातही मराठी पुस्तकांच्या वाचनाचा आनंद लुटायचा असेल तर ‘डेलीहंट’ हा एक उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहे. या अ‍ॅपवर एकूण १२ भारतीय भाषांतील पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यात मराठीमधील ‘श्यामची आई’, ‘सिंहासन बत्तीसी’, ‘इसापनीती’ अशा पुस्तकांपासून अमिष त्रिपाठीच्या ‘शिवा त्रिक’ पुस्तकांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कथा, कादंबऱ्या, चरित्र, सामान्य ज्ञान, अभ्यासविषयक अनेक पुस्तकांचा भरणा ‘डेलीहंट’वर आहे. अर्थात यातील सर्वच पुस्तकं मोफत नाहीत. काही पुस्तकांसाठी शुल्कही आकारण्यात येते. मात्र, हे पैसे तुम्ही तुमच्या मोबाइल ऑपरेटरकरवी भरू शकता. त्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असणे आवश्यकच आहे, असे नाही. ‘डेली हंट’चे आणखी एक प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे, यावर भारतातील अनेक वृत्तपत्रेही ‘ऑनलाइन’ वाचता येतात. विविध भाषांतील प्रमुख वृत्तपत्रांचा यात समावेश आहे. शिवाय अभ्यास आणि विविध परीक्षांसाठी आवश्यक साहित्यही ‘डेलीहंट’वर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड, विंडोज आणि अ‍ॅपल या तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ते डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर आपण कुठेही ही पुस्तके वाचू शकतो.
इंग्रजी साहित्याचे भांडार
स्मार्टफोनवरून वाचनाचा विषय निघालाच आहे तर, ‘किंडल’ या अ‍ॅपचा उल्लेख अपरिहार्य आहे. विविध भाषांतील पुस्तकांचा भरणा असलेल्या ‘किंडल’वर इंग्लिश साहित्य अतिप्रचंड आहे. अगदी जुन्या कादंबऱ्यांपासून आता आता प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंतची तब्बल दहा लाखांहून अधिक इंग्लिश पुस्तके ‘किंडल’वर उपलब्ध आहेत. अतिशय आकर्षक रचना, सहज हाताळणी आणि न समजलेल्या शब्दाचा केवळ अर्थच नव्हे तर त्याबद्दल इंटरनेटवर उपलब्ध असलेला अधिक तपशील अ‍ॅपमध्येच उपलब्ध करून देणारी सुविधा ही ‘किंडल’ची वैशिष्टय़े आहेत. हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी मोफत असून त्यावर शेकडो पुस्तके मोफत आहेत. मात्र, अलीकडच्या काळातील प्रसिद्ध पुस्तके वाचकांना खरेदी करावी लागतात. यासाठी ‘किंडल’ने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. एकतर तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा ‘किंडल अनलिमिटेड’सारख्या मासिक शुल्क भरण्याच्या सुविधेमार्फत हवी तेवढी पुस्तके मोफत डाउनलोड करून वाचू शकता.
मात्र, तुमचे ‘सबस्क्रीप्शन’ संपले की ही पुस्तके तुम्हाला वाचता येणार नाहीत.
‘किंडल’चे खास वाचनासाठी स्वतंत्र उपकरणही आहे. पण स्मार्टफोनवरून ‘किंडल’ची पुस्तके वाचण्याचा अनुभव चांगला आहे. यात अडचणीची गोष्ट एकच की, या अ‍ॅपवरून तुम्ही ‘किंडल’ची खास ‘मोबी’ असे ‘फाइल एक्स्टेन्शन’ असलेली पुस्तकेच वाचू शकता.
– असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:11 am

Web Title: apps for reading books
Next Stories
1 आता कुटुंबाची चिंता नको!
2 सात मिनिटांचा ‘वर्कआऊट’
3 स्मार्ट स्त्रीचे स्मार्ट अॅप्स
Just Now!
X