08 August 2020

News Flash

 ‘बोलता बोलता ‘नोट्स’

अ‍ॅपमध्ये नोंदवलेल्या नोट्स शोधण्यासाठीही तुम्ही ‘व्हॉइस कमांड’चा वापर करू शकता.

थांबा! ही माहिती ‘नोटां’बद्दल नाही; नोट्सबद्दल आहे. त्यामुळे शीर्षक वाचून तुमच्या मनात वेगळी आशा पल्लवित झाली असेल तर, माफ करा! तर ही माहिती ‘नोट्स’ अर्थात नोंदी ठेवणाऱ्या अ‍ॅपबद्दल आहे. रोजच्या दैनंदिन व्यवहारांत आपण अनेक व्यक्तींना भेटत असतो, अनेक ठिकाणी जात असतो, अनेक कामे उरकत असतो. हे सर्व करीत असताना भविष्यातील किंवा पुढच्या काही दिवसांतील कामांची आपल्याला नोंद करावी लागते. त्यासाठी नोंदवही हा प्रकार अस्तित्वात आला. अगदी फार पूर्वीपासून नोंदवही ही संकल्पना रूढ आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या खिशात तुम्हाला हमखास अशी नोंदवही दिसेल. खिशात मावणाऱ्या एखाद्या छोटय़ा डायरीत संपर्क क्रमांक, पत्ते, आगामी जबाबदाऱ्या, जमाखर्च अशा अनेक गोष्टी नोंदवलेल्या असतात. मात्र, स्मार्टफोनचा प्रभाव वाढल्यापासून कागदांच्या वह्यंना महत्त्व उरलेले नाही. स्मार्टफोनमधील नोंदवही अर्थात ‘नोटबुक’चे डिफॉल्ट अ‍ॅपही अनेकांना या कामी उपयोगी पडते. त्यामध्ये तारीखवार गोष्टी नोंदवता येतात आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी ‘रिमाइंडर’ही लावता येतात. विशेष म्हणजे, या नोंदी तुमच्याकडे फोनसोबत वर्षांनुवर्षे राहू शकतात. अगदी फोन बदलला तरीही तुम्ही हा सगळा तपशील नवीन फोनमध्ये स्थानांतर करू शकता. ही झाली एक सोय! पण आता तुम्हाला अशा नोंदी करण्यासाठी ‘टाइपिंग’ करण्याचीही गरज नाही. तुम्ही बोलता बोलता स्मार्टफोनवरील नोंदवहीत नोंदी करू शकता. यासाठीच ‘ListNote Speech-to-Text Notes’ (लिस्टनोट स्पीच-टू-टेक्स्ट नोट्स) हे अ‍ॅप उपयुक्त ठरते. तुमच्या बोलण्यातील शब्द ‘झेलून’ हे अ‍ॅप त्यांची लेखी नोंद करून घेते, अशा एका वाक्यात या अ‍ॅपचे वैशिष्टय़ सांगता येईल. म्हणजे, फोनवर टाइपिंग करण्याच्या भानगडीतही न पडता तुम्ही विविध नोंदी यात करू शकता. ‘स्पीच टू टेक्स्ट’ हे तंत्रज्ञान आता नवीन राहिलेले नाही. गुगलच्या सर्चमध्ये आपल्याला हा पर्याय आढळतो. या पर्यायाच्या साह्यने आपण बोलत असलेल्या शब्द लेखी स्वरूपात स्क्रीनवर झळकतो आणि गुगल पटकन त्याबाबत ‘सर्च’ही करते. हेच तंत्रज्ञान ‘लिस्टनोट’मध्ये वापरण्यात आले आहे. या अ‍ॅपवरील एका बटणावर बोट ठेवून तुम्ही बोलता बोलता कोणत्याही नोंदी करू शकता. यामध्ये भाषेची मर्यादा आहे. मात्र, इंग्रजीतील शब्द हे अ‍ॅप व्यवस्थित ओळखते. अ‍ॅपमध्ये नोंदवलेल्या नोट्स शोधण्यासाठीही तुम्ही ‘व्हॉइस कमांड’चा वापर करू शकता. या नोट्स मेसेज, ईमेल करण्यासोबतच सोशल मीडियावरही शेअर करता येतात.

विशेष म्हणजे, तुमच्या खासगी नोंदी कुणाच्याही हाती लागू नये, यासाठी तुम्ही त्यांना ‘पासवर्ड’ही तयार करू शकता. याखेरीज नोट्सची वर्गवारी, विविध विषयांच्या नोट्सचे रंगांनिशी वर्गीकरण, बॅकअप, रिस्टोअर असे अन्य ‘नोटबुक’ अ‍ॅपना असलेले पर्याय या अ‍ॅपमध्येही उपलब्ध आहेत. यातील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, तुमच्या बोलण्यातील ‘ठहराव’ ओळखून तुम्ही दोन शब्द ओळखण्यात किती सेकंदांचे अंतर असावे, हेदेखील या अ‍ॅपमध्ये आधीच नोंदवू शकता. त्यामुळे बोलताना होणाऱ्या नोंदींच्या चुका टाळता येतात. हे अ‍ॅप व्यवस्थित कार्य करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘गुगल व्हॉइस सर्च’ ही सुविधा असणे आवश्यक आहे. सध्याच्या सर्वच स्मार्टफोनमध्ये अशी सुविधा आहे. मात्र, नसल्यास तुम्ही ते स्वतंत्रपणे अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड व इन्स्टॉल करू शकता. या सुविधेखेरीज केवळ ‘टाइप’ करून नोंदी करण्यासाठीही हे अ‍ॅप वापरता येते.

असिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2016 12:53 am

Web Title: listnote speech to text notes android apps on google play
Next Stories
1 ‘ऑनलाइन’ भाजीबाजार
2 दिवाळीनंतरचा व्यायाम
3 आकर्षक केशभूषेच्या टिप्स
Just Now!
X