सध्या जमाना सेल्फीचा आहे. अगदी पंतप्रधानांपासून नामांकित सेलेब्रिटींपर्यंत आणि महाविद्यालयीन मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकालाच ‘सेल्फी’चे आकर्षण आहे. त्यामुळे सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवर ‘सेल्फी’ छायाचित्रांची रांगच रांग आपल्याला पाहायला मिळते. पण सेल्फी काढणं हे थोडं कठीण काम आहे. स्मार्टफोनच्या बॅक कॅमेऱ्यातून फोटो काढताना समोरच्या वस्तूवर फोकस करून क्लिक करताच फोटो निघतो. पण सेल्फीमध्ये हव्या असलेल्या सर्व व्यक्ती किंवा पाश्र्वभूमी दिसावी म्हणून फोनला वेगवेवगळ्या कोनात फिरवावे लागते. हा खटाटोप करताना छायाचित्राच्या दर्जाकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे फोटोतील चेहरे अंधूक किंवा काळपट असे दिसतात. हे टाळायचं असेल तर ‘सेल्फी कॅमेरा’ (लव्ह सेल्फी) हे एक चांगलं अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइडवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सेल्फी काढतानाच तुम्ही फोटोतील रंगसंगती, प्रकाश आदी गोष्टी कमी-जास्त करू शकता. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी अ‍ॅपमध्ये विविध प्रकारचे ‘फिल्टर्स’ दिले आहेत. या ‘फिल्टर्स’वर क्लिक करताच ठरावीक रंगसंगतीत आकर्षक फोटो निघतात. या कॅमेऱ्यातून निघणाऱ्या छायाचित्रांचा दर्जाही चांगला आहे. विशेष म्हणजे, ‘सेल्फी स्टिक’च्या साह्य़ाने हे अ‍ॅप चालवता येते.

प्रवासखर्चाचा अचूक हिशोब
पर्यटनाला किंवा प्रवासाला निघताना बाकी सगळी तयारी करण्याआधी बजेटची तयारी केली जाते. त्या बजेटमध्ये संपूर्ण पर्यटन करायचे असे ठरवून आपण घराबाहेर पडतो. पण प्रत्यक्षात ठरवलेल्या मर्यादेपेक्षा किती तरी जास्त खर्च करून बसतो. हा जास्त खर्च नेमका का व कुठे झाला, हेदेखील आपल्या लक्षात राहात नाही. अशा प्रवृत्तीमुळे बऱ्याचदा प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो किंवा काही गोष्टींना मुरड घालावी लागते. हे सर्व नियंत्रणात आणण्यासाठी ‘ट्रिप एक्स्पेन्स मॅनेजर’ हे अ‍ॅप उत्तम पर्याय आहे. प्रवासाचा किंवा सहलीचा खर्च वेळोवेळी कागदावर नोंदवत बसणे शक्य नसते. पण या अ‍ॅपच्या माध्यमातून चुटकीसरशी तुम्ही प्रत्येक खर्चाची नोंद करू शकता. या अ‍ॅपमध्ये आपल्या पर्यटनस्थळाची नोंद करून खर्चाचा तपशील नोंदवण्यास सुरुवात करता येते. त्यात एकूण बजेट नोंदवल्यानंतर प्रत्येक खर्चाची स्वतंत्र नोंद करता येते. प्रत्येक खर्चाला विविध वर्गात विभागता येते. त्यामुळे पर्यटनादरम्यान प्रवास, जेवण, मनोरंजन, निवास या गोष्टींवर नेमका किती खर्च झाला याची माहिती घेता येते. शिवाय या अ‍ॅपमध्ये प्रवासादरम्यानच्या आठवणी व छायाचित्रे नोंदवण्याची सुविधा आहे. त्यामुळे प्रवासात निघत असाल, तर हे अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये असू द्याच.

  • असिफ बागवान
    asif.bagwan@expressindia.com