मंगेश सोमण

व्यापक निर्देशांकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेअर बाजाराची तब्येत सध्या ठणठणीत आहे. पण बऱ्याच गुंतवणूकदारांना सध्या बाजार सार्वकालिक उच्चांकाच्या उंबरठय़ावर असल्याची प्रचीती येत नाहीये.

शेअर बाजाराचे प्रकृतीमान सध्या कसे आहे, या प्रश्नाचे उत्तर देणे हल्ली कठीण बनले आहे. सहसा मुंबई शेअर बाजारातल्या ३० मुख्य समभागांचा सेन्सेक्स किंवा राष्ट्रीय शेअर बाजारातल्या ५० मुख्य समभागांचा निफ्टी हे निर्देशांक बाजाराचा एकंदर कल दाखवत असतात. गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोतले चढ-उतार किंवा म्युच्युअल फंडांची कामगिरी जोखण्यासाठी या निर्देशांकांचा मापदंड म्हणून उपयोग केला जातो.

या व्यापक निर्देशांकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेअर बाजाराची तब्येत सध्या ठणठणीत आहे. फेब्रुवारी महिन्यातल्या घसरगुंडीनंतर हे निर्देशांक सध्या जवळपास दहाएक टक्क्यांनी वधारले आहेत. सेन्सेक्सने तर मागील आठवडय़ात सत्रांतर्गत पातळीवर सर्वोच्च शिखरही नोंदवले. निफ्टी निर्देशांकाचा सार्वकालिक उच्चांक जानेवारी महिन्यात नोंदवला गेला होता, त्याच्या तुलनेत पाहिले तर शुक्रवारचा निफ्टी निर्देशांक जेमतेम दीडेक टक्क्यांनीच मागे आहे.

पण तरीही, बऱ्याच गुंतवणूकदारांना सध्या बाजार सार्वकालिक उच्चांकाच्या उंबरठय़ावर असल्याची प्रचीती येत नाहीये. आणि याचे महत्त्वाचे कारण असे की बाजारातल्या बऱ्याच घटकांचे चित्र हे सध्या व्यापक निर्देशांकांमधून दिसणाऱ्या चित्राशी फटकून आहे. निफ्टीमध्ये ज्या ५० घटक कंपन्या असतात, त्यांच्या बाजारात व्यवहारांसाठी उपलब्ध असलेल्या समभागांच्या बाजार-मूल्याच्या प्रमाणात या कंपन्यांच्या समभागांच्या चढ-उताराचा परिणाम निफ्टीवर होत असतो. त्यामुळे ज्या कंपन्यांचे बाजार-मूल्य जास्त असते, त्यांच्या समभाग-मूल्यात मोठे बदल झाले, तर ते निर्देशांकावर खूप मोठा प्रभाव टाकतात. अशा मोजक्या कंपन्यांचे समभाग इतर कंपन्यांच्या समभाग-मूल्यातल्या प्रवाहापेक्षा वेगळी धार पकडून असतील, तर मग निर्देशांक फसवा बनू शकतो. सध्या काहीसा तसाच प्रकार होत आहे.

फेब्रुवारीतल्या घसरगुंडीनंतर निफ्टीने आतापर्यंत जी जवळपास दहा टक्क्यांची दौड केली आहे, त्यात साधारण दोन-तृतीयांश वाटा हा केवळ पाच कंपन्यांच्या समभागांचा आहे. निफ्टीमधल्या ५० समभागांचा एक सम-भारित (म्हणजे सगळ्या समभागांमधल्या बदलांना समान महत्त्व देणारा) निर्देशांक असतो. तो निर्देशांक जानेवारी महिन्यातल्या उच्चांकापेक्षा जवळपास सात टक्क्यांनी खाली आहे. बऱ्याचशा गुंतवणूकदारांच्या बाजारातल्या वास्तविक अनुभवाशी हा समभारित निर्देशांक जास्त मेळ खाणारा आहे.

व्यापक निर्देशांक हा काही मूठभर समभागांनी वर खेचला आहे, याचे आणखी एक प्रमाण आपल्याला समभागनिष्ठ म्युच्युअल फंडांच्या अलीकडच्या काळातल्या कामगिरीवरूनही मिळते. सगळ्यात मोठय़ा अशा पंधरा म्युच्युअल फंड संस्थांच्या आणि ‘व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन’ या संशोधन संस्थेचे पंचतारांकित मानांकन असलेल्या अशा ३० समभागनिष्ठ योजना आहेत. (विशिष्ट क्षेत्रांमध्येच गुंतवणूक करणाऱ्या योजना या विश्लेषणातून वगळण्यात आल्या आहेत.) त्यांची अलीकडची कामगिरी तपासली तर असे आढळून येते की त्यांचा सध्याचा बाजारभाव (नक्त मालमत्ता मूल्य किंवा एनएव्ही) हा त्यांच्या गेल्या वर्षभरातल्या सर्वोच्च पातळीपेक्षा सरासरी १० टक्क्यांनी खाली आहे. काही योजनांमध्ये तर ही तफावत २० टक्क्यांएवढी मोठी आहे! याचाच सोप्या भाषेतला अर्थ असा की, पंचतारांकित मानांकन असलेल्या म्युच्युअल फंड योजनांची अलीकडली कामगिरी ही सध्या व्यापक बाजार निर्देशांकाच्या मापदंडाच्या तुलनेत चांगलीच सुमार आहे.

मध्यम आकाराच्या आणि छोटय़ा आकाराच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची परिस्थिती तर याच्याहूनही वाईट आहे. राष्ट्रीय शेअर बाजारावरील मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठीचा निर्देशांक त्याच्या वर्षभरातील उच्चांकापेक्षा सध्या १७ टक्क्यांनी खाली आहे, तर छोटय़ा आकाराच्या कंपन्यांसाठीच्या निर्देशांकाच्या बाबतीत ही घट तब्बल २७ टक्क्यांची आहे! म्हणजे, शेअर बाजाराच्या या घटकांकडे पाहिले तर चक्क बाजार-मंदीचे चित्र समोर उभे ठाकते. अर्थात, या आकडेवारीची एक दुसरी बाजू ही आहे की, गेल्या वर्षी छोटय़ा आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे समभाग व्यापक निर्देशांकाच्या तुलनेत किती तरी जास्त फुगले होते; ती सूज गेल्या काही महिन्यांमध्ये झपाटय़ाने आक्रसली आहे.

एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, व्यापक निर्देशांकाने इतर बाजार घटकांच्या तुलनेत अवाजवी मुसंडी मारण्याचा हा प्रकार भारतापुरता मर्यादित नाही. काही जागतिक बाजारांमध्येही हा कल आहे. ‘सीएनबीसी’च्या विश्लेषकांनी गेल्या आठवडय़ात अमेरिकी शेअर बाजारातली आकडेवारी खोलात जाऊन तपासली. तेव्हा त्यांना असे दिसून आले की, अमेरिकेतल्या ‘एस अ‍ॅण्ड पी ५००’ या निर्देशांकात चालू कॅलेंडर वर्षांत जी काही भर पडली आहे, त्यातला सुमारे ७० टक्के वाटा हा फक्त तीन कंपन्यांच्या समभागांच्या किमतींमधल्या भरारीचा आहे. त्या तीन कंपन्या आहेत – अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि मायक्रोसॉफ्ट.

हे सगळे विश्लेषण आपल्याला सांगते की, सध्याचा शेअर बाजारातला टप्पा हा केवळ निर्देशांकाच्या वरलिया रंगाला भुलण्याचा नाही. अमेरिका आणि चीन/ युरोप यांच्यातले व्यापार-युद्ध, ब्रिटनने मार्च २०१९ मध्ये युरोपीय समुदायाशी काडीमोड घेण्यासंबंधातल्या तपशिलांवरून सुरू असलेले वादविवाद, इराणवरील आर्थिक प्रतिबंध असे जागतिक घटक, तसेच वित्तीय तूट आणि सार्वजनिक बँकांच्या खालावत्या परिस्थितीशी निगडित देशांतर्गत घटक – अशा सगळ्या जोखमीने भरलेल्या पाश्र्वभूमीवर केवळ काही समभागांच्या इंधनावर दौडणारी तेजी वरकरणी आकर्षक आणि आश्वासक वाटली, तरी ती फसवी ठरू शकते.

मंगेश सोमण mangesh_soman@yahoo.com

(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून कार्यरत)