08 July 2020

News Flash

फंड जिज्ञासा : घटिका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा..

वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

प्रतिनिधिक छायाचित्र

वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

*  मी ३३ वर्षांचा व्यावसायिक असून ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’चा नियमित वाचक आहे. मी मोठी रक्कम बँकांच्या मुदत ठेवींत गुंतविली आहे. या ठेवींची मुदतपूर्ती पुढील महिन्यांत होत असून ही रक्कम नेमक्या कोणत्या फंडात गुंतवावी असा मला प्रश्न पडला आहे. याबाबत मार्गदर्शन करावे.

– प्रसाद श्रृंगारपुरे  (ई-मेलद्वारे)

गुंतवणूक साधने निवडताना गुंतवणूकदाराने जीवनात ठरविलेली उद्दिष्टे, ती पूर्ण करण्यासाठी रोकडसुलभतेची गरज आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी जोखीम स्वीकारण्याची आवश्यकता यांचा मेळ घालावा लागतो. योग्य मेळ घातला गेला तर गुंतवणुकीत योग्य परतावा मिळतो आणि ठरविलेली आर्थिक स्वप्नही पूर्ण होतात. केवळ बँकेच्या मुदत ठेवी म्हणजे सुरक्षितता हा गैरसमज असून, उलट  महागाईमुळे तुमच्या बचतीची क्रयशक्ती कमी होण्याचा धोका अधिक आहे. गुंतवणुकीवर परताव्याचा दर महागाईच्या दरापेक्षा अधिक असेल तरच बचतीची क्रयशक्ती टिकवून ठेवता येईल. म्युच्युअल फंडाच्या रोखे योजना (डेट फंड) हे महागाईला मात देणाऱ्या परताव्यासह स्थिर उत्पन्नाची तुमची गरज पूर्ण करू शकतील. रोकड सुलभता आणि कर कार्यक्षमता यामुळे डेट फंड मुदत ठेवीपेक्षा उजवे ठरतात. या फंडात तीन किंवा त्याहून अधिक वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याच्या करपात्रेत येतो, ज्यावर इंडेक्सेशनचा फायदा मिळून कराचे ओझे कमीत कमी राहते.

गुंतवणूकदारांसाठी विशेषत: नव्याने गुंतवणूक सुरू करणाऱ्यांसाठी ‘इक्विटी सेव्हिंग्ज फंड’ हे अत्यंत आवश्यक असलेले गुंतवणूक साधन आहे. वार्षिक ७.०० ते ७.५० टक्के परतावा मिळण्याची शक्यता (खात्री नव्हे) असलेली ही गुंतवणूक आहे. बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा हा परतावा दर निश्चितच सरस असून, ठेवींवरील व्याजदर आणखी घसरत जाणे येत्या काळात अपरिहार्य दिसते. शिवाय समभाग गुंतवणुकीतील वृद्धीचा लाभ देऊन तुलनेने कमी धोका असणारी ही गुंतवणूक आहे.

समभागसंलग्न गुंतवणूक ६५ टक्क्यांपर्यंत आणि उर्वरित स्थिर उत्पन्न देणाऱ्या व उच्च पतधारणा असलेल्या रोख्यांमध्ये गुंतविणाऱ्या  ‘बॅलंस्ड फंडा’चा     पर्यायही आपणास आजमावता येईल. यातून नियमित उत्पन्नाबरोबर भांडवली वृद्धीचा लाभही आपणास मिळेल. बॅलन्स्ड फंडात गुंतवणुकीनंतर एका वर्षांनंतर काढलेली रक्कम करमुक्त असते.

तुमचे तरुण वय पाहता तुमच्या बचतीचा मोठा हिस्सा समभाग गुंतवणुकीत असणे गरजेचे आहे. तरुण वयात फारशा जबाबदाऱ्या नसतात. पर्यायाने काहीशी जोखीमही घेता येऊ शकेल. म्हणूनच  समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचा पर्यायही तुम्हाला उपलब्ध आहे.

तज्ज्ञ गुंतवणूक मार्गदर्शक तुमच्या गरजेनुसार तुम्हाला योग्य ते म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सुचवू शकेल. तुम्ही ३३व्या वर्षी सुरुवात करताय म्हणजे तुमच्या गुंतवणुकीला उशीरच झाला आहे. ‘घटिका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा! आयुष्याचा नाश होतो, राम कारे म्हणाना’ हे समर्थ वचन विसरू नये. लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी.

 फंड गुरू

आपलेही म्युच्युअल फंडविषयक काही प्रश्न असतील तर, आम्हाला पाठवा: arthmanas@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2017 1:01 am

Web Title: expert answers on readers mutual fund queries
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : सवलतीत उपलब्ध दीर्घकालीन शिलेदार
2 कर समाधान : गुंतवणुकीचा धारणकाळ, विक्री आणि कर
3 वाटा गुंतवणुकीच्या : कर्जमंजुरी देताना बघितला जाणारा ‘पतगुणांक’
Just Now!
X