अर्धा डझन कच्चे लिंबू! 

भाग – ११

आपल्या सर्वाना मुंगी आणि नाकतोडय़ाची गोष्ट तर माहिती असेलच. हिवाळा येणार म्हणून अन्न साठवणारी मुंगी ही खुशाल बसून मजा करणाऱ्या नाकतोडय़ापेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे आपण लहानपणी शिकलो. पण बऱ्याच वेळा असे लक्षात येते की या गोष्टीतून आपण आयुष्यभराची शिकवण घ्यायला विसरलो. आपण जरी खुशाल नाकतोडा नसलो तरी पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुंगीची दूरदृष्टी वापरायला जरा उशीरच करतो. आणि मग जसजशी निवृत्तीची वेळ जवळ येते तसतशी काळजी वाढते. आज आपली ही मैत्रीण हेच समजवायचा प्रयत्न करतेय की जोवर वेळ आणि नोकरी हातात आहे तोवर आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवून आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करून घ्या.

संयुक्ता ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली आहे. मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर गेली १५ र्वष ती मानव संसाधन क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्या या कार्यकालात तिने खूप वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून चांगला अनुभव मिळविला. आर्थिक नियोजनाची घडी बसविताना मात्र तिने थोडा उशीर केला. पण हिंदीमध्ये म्हणतात ना – देर आए दुरुस्त आए. उशिराने का होईना, पण तिने अगदी थोडय़ाच वेळात बरेच काही शिकून घेतले आणि आज तिला स्वत:च्या यशस्वी आर्थिक नियोजनाचा अभिमान आहे.

साधारणपणे वयाच्या विशीत तिने नोकरी करायला सुरुवात केली. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे थोडी बचत दरमहा ती करत होती. त्यावेळी तिने गुंतवणूक करायला सुरुवात केली ती आयुर्विमा- एंडोमेंट योजनेमध्ये. मग लग्न झाल्यानंतर घरासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी बचत केली. कर नियोजनासाठी पीपीएफचा वापर केला. असे करत करत पुढची आणखी काही र्वष गेली. तोपर्यंत कुठलंही शिस्तबद्ध आर्थिक नियोजन तिने केले नव्हते. त्यानंतर तिचा पगार वाढत गेला. आणि मग तिने युलिपमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली. त्यावेळी तिला खरंच काही समजत नसल्यामुळे ती कुणीतरी सांगितलं म्हणून पैसे गुंतवत होती.

अनेक र्वष ती हेच समजून होती की कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी फक्त पुरुषाचीच असते. आणि म्हणून तिने कधी गुंतवणुकीच्या बाबतीत लक्ष दिले नव्हते. साधारण वयाच्या पस्तिशीच्या जवळपास तिने वैवाहिक संबंधातून बाहेर पडून पुढचे आयुष्य मुलांसमवेत जगायचे ठरविले. त्यावेळी तिला तिच्या आर्थिक भवितव्याची काळजी वाटू लागली. आपण कुठे तरी आर्थिकरीत्या असक्षम आहोत या जाणिवेने ती सुरुवातीला थोडी घाबरलीच. मुलाचे शिक्षण आणि खासगी क्षेत्रात काम करत असल्यामुळे पेन्शन, या दोन्ही गोष्टींचे टेन्शन तिला होते. पण हातावर हात ठेवून गप्प राहण्याने काहीच होणार नव्हते. म्हणूनच अजून वेळ वाया न घालवता तिने भविष्याचा तरतुदीसाठी जोमाने काम करायचे ठरविले. त्यासाठी तिने आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायची ठरविली. त्यातसुद्धा दोन- तीन सल्लागारांचा अनुभव घेतला आणि मग सरतेशेवटी एकाबरोबर काम करायचे नक्की केले.

तिच्या सल्लागाराला तिने स्वत:च्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण माहिती दिली. त्याने मग तिच्यासाठी खालीलप्रमाणे आराखडा तयार केला:

आर्थिक उद्दिष्टांची यादी – तिची तीन मुख्य ध्येयं आहेत – तिच्या मुलाचं शिक्षण, तिचं घर आणि निवृत्तीनंतरची आर्थिक सोय. याशिवाय तिला फिरायची खूप आवड असल्यामुळे त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूकसुद्धा तिला करायची आहे.

ध्येयाबरोबर साजेशी गुंतवणूक – सल्लागाराच्या सांगण्याप्रमाणे तिने तिच्या प्रत्येक ध्येयासाठी वेगळी गुंतवणूक करायची ठरविली. मुलाच्या शिक्षणासाठी आणि स्वत:चा रिटायरमेंट फंड तयार करण्यासाठी तिने म्युच्युअल फंडात एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरूकेली. मुलाला कोणत्या वर्षी अंदाजे किती खर्च येईल आणि त्याप्रमाणे किती गुंतवणूक असायला हवी हे तिने सल्लागाराकडून व्यवस्थितरीत्या समजून घेतले. घर घेताना जे स्वत:चे योगदान लागते ते तिने शेअर्समध्ये गुंतवणूक करून उभे करायचे ठरविले आहे. प्रत्येक महिन्यात थोडे थोडे पण खूप चांगले शेअर्स तिने जमवायला सुरुवात केली आहे.

जोखीम व्यवस्थापन – संयुक्ताला हे पूर्णपणे पटले होते की दीर्घकालीन गुंतवणुकीला सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्या जोखमींचा योग्य आढावा घेऊन विम्याचे कवच घेणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच तिने आरोग्य विमा आणि जीवन विमा घेतला. आरोग्य विमा घेताना तिने भविष्यात वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा जमेल तितका अंदाज घेतला. तिच्या आरोग्य विम्यामध्ये तिने गंभीर आजारासाठीसुद्धा तरतूद केली आहे. जीवन विमा घेताना तिने टर्म प्लान घेतला आणि तोसुद्धा तिच्यावर असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा संपूर्ण आढावा घेऊन. ज्या विमा पॉलिसीमध्ये तिला फायदा नव्हता होणार त्या तिने सल्ला घेऊन बंद केल्या. आणि त्यातून मिळालेली रक्कमसुद्धा दीर्घकाळासाठी गुंतविली.

बचतीचा दर वाढवणे – एकेकाळी संयुक्ता पगारातील फक्त १० टक्के गुंतवणुकीसाठी वापरत होती, परंतु आर्थिक नियोजनाचे गांभीर्य लक्षात आल्यापासून तिने बचतीचा दर वाढवायला सुरुवात केली. आजच्या घडीला ती तिच्या मासिक पगारातून ५० टक्क्यांपर्यंत बचत करते. याशिवाय जो काही बोनस आणि वाढीव पगार मिळतो तोसुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने सल्लागाराला विचारून गुंतवणूक करते.

इमर्जन्सी फंड – अडीनडीच्या वेळेला उपयोगी येईल असा हा फंड तयार करण्यासाठी तिने लिक्विड फंडाची निवड केली. सोबतीला बँकेतील ठेवी आणि बचत खाते आहेतच.

वरील आराखडय़ानुसार काम करण्यासाठी तिला तिच्या सवयी बदलाव्या लागल्या. आर्थिक नियोजन हे शिस्तीचे आणि चिकाटीचे काम असल्यामुळे तिने स्वत:ला खालील सवयी लावून घेतल्या:

गुंतवणूक पहिली, खर्च नंतर – या बोधवाक्यावर विश्वास ठेवून तिने सर्वात पहिली सवय लावली ती अशी – ज्या दिवशी पगार खात्यात जमा होतो, त्या दिवशी त्यातून ठरल्याप्रमाणे गुंतवणुकीचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये जमा करणे. अशा पद्धतीने ती आवश्यक तेवढाच पैसा हाताशी बाळगते आणि अनाठायी खर्च टाळते.

कौटुंबिक खर्च – आपल्या प्रत्येकाला एका विशिष्ट राहणीमानाची सवय झालेली असते. आणि फार क्वचित आपण आपले राहणीमानाच्या खर्चाचे विश्लेषण करतो. पण संयुक्ताने हेसुद्धा अतिशय शिताफीने केले. आपल्याला प्रत्येक महिन्याला जे खर्च आहेत ते कशासाठी, किती आणि कुठे करावे लागतात हे तिने पारखले. गरजेचे खर्च तर फारसे कमी होत नाहीत, पण असे खर्च कुठे केल्यावर किमतीत फरक पडतोय, कधी डिस्काउंट मिळतेय, याचा तिने अभ्यास केला. हे केल्यावर तिच्या लक्षात आले की सुपर मार्केट/ मॉलमधील खरेदी कधी कधी महाग पडते आणि बऱ्याचदा गरज नसतानासुद्धा आपण वस्तू घेतो. म्हणून यादी बनवून केलेली खरेदी ही अनाठायी खर्च वाचवते. आर्थिक नियोजन करताना राहणीमानात काटकसर करण्यापेक्षा हुशारीने खर्चाचे नियोजन करून आपले राहणीमान सांभाळता येते हे तिच्या या नियोजनातून स्पष्ट होते.

क्रेडिट कार्ड – हे म्हणजे दुधारी तलवार! व्यवस्थित वापरले तर ठीक, नाही तर आपलाच खिसा आपल्या डोळ्यादेखत कधी कापेल हे कळणार नाही. क्रेडिट कार्डची खरेदी करतानासुद्धा ताळतंत्र बाळगले तर गरजेव्यतिरिक्त खरेदी टाळून मिळालेल्या मुदतीचा आणि ऑफर्सचा फायदा करता येतो. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरल्याने आपला ‘सिबिल स्कोअर’ चांगला राहतो आणि त्याच्या अवाच्या सव्वा व्याजापासून आपण स्वत:ला वाचवू शकतो.

ऑनलाइन खरेदी – आजकाल भरपूर ऑनलाइन सेल काही ना काही कारणास्तव चाललेले दिसतात. आणि त्यांच्या विळख्यात बरेच जण सापडतात. कारण नसतानासुद्धा गोष्टी घेतल्या जातात आणि अवास्तव पैसेही वाया जातात. संयुक्ता या माध्यमाचा खूपच सुंदर उपयोग करून घेते. वर्षांच्या सुरुवातीलाच ती कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत हे ठरविते, त्यांची दुकानात किंमत काढते आणि मग ऑनलाइन सेलमध्ये खरेच बचत होत असेल तर घेते. तिची बरीचशी खरेदी नियोजित असते.

हौस मौज – तिला फिरण्याची खूप आवड आहे. पण आपल्या या आवडीमुळे कुठेही आपण आपल्या आर्थिक ध्येयापासून लांब व्हायचे नाही हे तिने स्वत:ला ठाम पटवून दिले आहे. त्यामुळे आपली ही हौस पूर्ण करण्यासाठी तिने एक युक्ती आखली आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस जी काही रक्कम तिच्याकडे शिल्लक राहते, त्या रकमेची गुंतवणूक ती या आवडीसाठी करते. शिवाय जेव्हा फिरण्याची तयारी करते तेव्हासुद्धा पैसे उगीच खर्च करत नाही. चार ठिकाणी व्यवस्थित चौकशी करून मग टूर निश्चित करते.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आर्थिक नियोजनात तिच्या मुलालासुद्धा सामील करते. आपल्या मुलाचे लाड कुणाला पुरवायला आवडत नाही. पण असे करताना कुठे आपले दीर्घकालीन आर्थिक नियोजन तर मागे पडत नाही ना, ही खात्री करणे खूप महत्त्वाचे आहे. तिच्या मुलाला तिने पैशाचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे. त्याला वर्षांचे बजेट दिले आहे, ज्यातून त्याने त्याची हौस-मौज पुरवायची. बाहेरून जेवण मागवणे हे आठवडय़ातून एकदाच करायचे ठरलेले आहे. त्यामुळे जास्त बाहेरचे खाल्ले जात नाही. आईसारखं त्यालाही फिरायला आवडतं. पण आता नवीन घर घेईस्तोवर कुठलाही मोठा प्रवासखर्च करायचा नाही हे तिच्या मुलाला समजले आहे. या सर्व गोष्टींचे गांभीर्य त्याच्या लक्षात आल्यामुळे तोसुद्धा उगीच कसलाही हट्ट करत नाही. आणखी एक कमालीची गोष्ट म्हणजे तो स्वत:चा एक छोटासा व्यवसायसुद्धा चालवतो, आणि त्या बाबतीतले सर्व हिशेबही व्यवस्थितपणे ठेवतो.

गेल्या दोन-तीन वर्षांत संयुक्ताने बरेच शिकून घेतले आणि सर्वासाठी उपयुक्त ठरेल असा वस्तुपाठही घालून दिला.

संयुक्ताने गिरविलेले महत्त्वाचे धडे :

  • गुंतवणूक ही सर्वासाठी महत्त्वाची आहे. इथे स्त्री, पुरुष, अविवाहित, विवाहित, घटस्फोटित, एकेरी पालक, तरुण, मध्यमवयीन, वयस्क असा काही भेदभाव नसतो.
  • खूप वाचन करा आणि स्वत:ला आर्थिक नियोजनात हुशार करा. इंटरनेटवर खूप माहिती आहे. योग्य प्रश्न विचारला की उत्तर सापडते.
  • सल्ला घ्या, पण सर्व शंकांचे समाधान झाल्यावरच त्यावर अंमल करा. एकाचा सल्ला दुसऱ्यासाठी लागू पडेल असे नेहमीच होत नाही.
  • पैशाकडे लक्ष द्या, आपल्या मुलाकडे देता तसे. आपला पैसा ही आपली जबाबदारी आहे. त्या संदर्भात घेतलेले निर्णय हे पूर्णपणे आपले असतात, म्हणून काळजीपूर्वक व्यवहार करा.
  • वेळोवेळी आपली गुंतवणूक तपासा. त्यामुळे वेळीच नुकसान थांबवता येते.
  • आर्थिक नियोजन कुटुंबाचे आहे, एकटय़ा नवऱ्या किंवा बायकोचे नाही. तेव्हा मुलांनाही योग्य पद्धतीने त्यात सहभागी करा.

(टीप : गोपनीयता राखण्याकरता गुंतवणूकदार मैत्रिणीचे नाव बदलले आहे.)

trupti_vrane@yahoo.com