News Flash

‘अति’संवेदनशील खनिज तेल!

आंतरराष्ट्रीय बाजारात विविध वस्तुमालांचे (कमॉडिटीचे) बाजारभाव वरखाली होणे नवीन नाही.

|| संजीव चांदोरकर

युद्धाची नुसती चाहूल लागली तरी खनिज तेलाचे दर भडकतात, कारण या किमतींचा संबंध मागणी-पुरवठय़ापेक्षाही अधिक प्रमाणात असतो तो वायदेबाजाराशी! या बाजाराचे वित्तभांडवलीकरण हे किमतींना नाचवते..

मागणीतील वाढीमुळे, पुरवठय़ातील खंडामुळे खनिज तेलाचे भाव वाढतात हे फक्त अंशत: खरे आहे. खनिज तेल जगभरातील वायदेबाजारातील सट्टेबाजांचा सर्वात आवडता वस्तुमाल (कमॉडिटी) आहे; त्यामुळे राजकीय, लष्करी घटनांविषयी त्याची संवेदनशीलता काही पटींनी जास्त आहे.

नवीन वर्षांच्या तिसऱ्या दिवशी अमेरिकेने इराणच्या जनरल सोलेमानींना ड्रोनहल्ला करून ठार मारले. अपेक्षेप्रमाणे त्याचे राजनैतिक आणि लष्करी पडसाद उमटलेच पण आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावालादेखील ‘उचकी’ लागली. आपण त्याची चर्चा करणार नाही आहोत. त्याऐवजी यानिमित्ताने मुळात ज्वालाग्राही असणाऱ्या खनिज तेलाचे भाव, जगात ‘खुट्ट’ जरी वाजले तरी दरवेळी प्रमाणाबाहेरचा प्रतिसाद का देतात हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आंतरराष्ट्रीय बाजारात विविध वस्तुमालांचे (कमॉडिटीचे) बाजारभाव वरखाली होणे नवीन नाही. खनिज तेलाच्या बाजारभावाची खासियत ही की ते कमी वेळात वेगाने चढतात आणि उतरतातदेखील. दुसऱ्या कोणत्याच वस्तुमालाचे भाव एवढय़ा वेगाने टोकाला जात नाहीत. कोणत्याही वस्तुमालाच्या भावपातळीतील चढउतारामागे त्याच्या मागणी-पुरवठय़ातील तफावत हे महत्त्वाचे कारण नेहमीच असते, जे खनिज तेलालादेखील लागू पडते. पण कमीत कमी काळात वेगाने ‘अंतर’ कापण्याची त्याची कारणे मागणी-पुरवठय़ापुरती मर्यादित नाहीत. ती गेल्या काही दशकांत कमॉडिटी मार्केट्सवर विशेषत: खनिज तेलाच्या वायदे-बाजारावर सट्टेबाज गुंतवणूकदारांच्या असलेल्या पकडीत शोधता येतील.

कमॉडिटी मार्केट

आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तुमाल/ कमॉडिटीची खरेदी-विक्री ढोबळमानाने दोन प्रकारे होते. जेथे एका हाताने वस्तुमालाची आताची किंमत चुकती करीत, वस्तुमाल ताब्यात घेतला जातो त्याला ‘स्पॉट’ बाजार म्हणतात. पण असे अनेक ग्राहक असतात ज्यांना एखादा वस्तुमाल कालांतराने हवा असतो. कालांतराने वस्तुमाल मिळण्यात अडचण नसते. पण त्या वेळी त्याचा भाव काय असेल याबद्दल साहजिकच ते चिंतित असतात. उदा. तेलशुद्धीकरण कंपनी खनिज तेलाचे शुद्धीकरण करून पेट्रोल-डिझेल विकते. तिच्याकडे साठवणूक क्षमता अपुरी असल्यामुळे तिला तीन महिन्यांनी खनिज तेल हवे आहे पण भाव मात्र आजच बांधून हवे आहेत. खनिज तेल विकणारी कंपनी, मधल्या काळातील व्याजाचा, आपल्या नफ्यातोटय़ाचा हिशेब करून तीन महिन्यांनी विशिष्ट भावात खनिज तेलाची डिलिव्हरी करण्याचा करार करते. याला वायदा-करार (फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट) म्हणतात. जोखीम व्यवस्थापनातील ही शास्त्रशुद्ध पद्धती काही शतके जुनी आहे.

हा झाला खरेदीदार-विक्रेत्याच्या विशिष्ट जोडीमधील व्यवहार. ज्या वेळी हा वायदे-करार स्टॉक मार्केटवर एक प्रमाणित (स्टॅण्डर्डाइझ्ड) वित्तीय प्रपत्र (फायनान्शियल इन्स्ट्रमेंट) म्हणून सूचिबद्ध होतो तेव्हा त्याला ‘फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट’ म्हणतात. वित्त क्षेत्रातील या एका कल्पक ‘शोधा’मुळे खेळाचे सारे नियमच बदलले. ज्याला खनिज तेल कधीच विकत घ्यायचे नाहीये आणि ज्याच्याकडे विकण्यास एक गॅलन खनिज तेलदेखील नाहीये असे खरेदीदार-विक्रेते नव्हे तर सट्टेबाज गुंतवणूकदार उदयाला आले. त्यांना फक्त खनिज तेलाच्या बाजारभावातील चढउतारांचा फायदा घेत नफा खिशात घालायचा असतो. अर्थात इतर सट्टय़ाप्रमाणे त्यात तोटादेखील येऊ शकतो.

‘सट्टेबाज गुंतवणूकदार भावपातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात’ असे सांगितले जाते. त्यात तथ्य आहे; पण केव्हा? ज्या वेळी १०० पैकी ९० वायदे-करार खऱ्याखुऱ्या खरेदी-विक्रीदारांमध्ये होतात तेव्हा. पण समजा हे प्रमाण बरोबर उलटे असेल तर? हेच गेल्या काही दशकांत घडले आहे. शिकागो र्मकटाइल एक्स्चेंज (सीएमई) या जगातील सर्वात मोठय़ा फ्यूचर्स मार्केटमध्ये (वायदे-बाजारात) ९८ टक्के वायदे-करार सट्टेबाज गुंतवणूकदारांमध्ये होतात. लक्षात घ्यायचा भाग हा की, फ्यूचर्स मार्केटमधील भाव ‘स्पॉट मार्केट’वरील (प्रत्यक्ष बाजारातील) भावांवर निर्णायक प्रभाव टाकतात.

खनिज तेलाची खासियत

जगात जवळपास प्रत्येक प्रगत देशात एकापेक्षा जास्त फ्यूचर्स मार्केट आहेत. यावर तीन प्रकारच्या वस्तुमालाचे वायदे-करार केले जातात : शेतीमाल (सोयाबीन, गहू, तांदूळ, साखर इत्यादी), धातू (पोलाद, तांबे, अ‍ॅल्युमिनियम इत्यादी) आणि ऊर्जास्रोत (खनिज तेल, गॅस इत्यादी). या तीन गटांपैकी सर्वात जास्त करार खनिज तेलाचे असतात. उदा. २०१८ सालात ‘सीएमई’वर दररोज सरासरी २३ लाख वायदे खनिज तेलाचे तर शेतीमालाचे १० लाख आणि धातूंचे फक्त चार लाख वायदे केले गेले.

वस्तुमालाच्या भावातील चढउतार जेवढे वादळी त्या प्रमाणात सट्टेबाज गुंतवणूकदारांना नफा कमावण्याच्या संधी उपलब्ध होतात. दुसऱ्या शब्दांत, एखाद्या वस्तुमालाचे बाजारभाव (समजा) अनेक महिने स्थिरच राहिले तर सट्टेबाज गुंतवणूकदार त्याचे वायदे-करार करणारच नाहीत. इथे खनिज तेल इतर वस्तुमालापेक्षा वेगळे ठरते. युद्धाचे ढग, राजनैतिक अस्थिरता, लष्करी कारवाई, ताणतणाव, वित्तीय क्षेत्रातील अरिष्टे, आर्थिक तेजी-मंदीची चाहूल सर्वच कमॉडिटींच्या भावपातळीवर कमी-जास्त परिणाम करतच असतात. पण टोकाच्या प्रतिक्रिया मात्र खनिज तेलच देते.

सोबत एक आलेख दिला आहे.  गेल्या चाळीस वर्षांत न्यूयॉर्क र्मकटाइल एक्स्चेंजवर खनिज तेलाचे भाव कसे वधारले आणि कोसळले याचे चित्र समोर येते. वर्ष आणि कंसात डॉलर्स प्रति बॅरल दिले आहेत : १९७० (२५), १९७५ (६०), १९८० (११०), १९८५ (२८), १९९० (७८), १९९५ (४२), २००० (३०), २००५ (८०), २०१० (१००), २०१५ (४०) आणि २०२० (६३). किमतीतील फार थोडे चढउतार मागणी, पुरवठा, उत्पादन खर्चातील वाढ-घट यांच्याशी संबंधित आहेत.

वित्त भांडवलाची पकड 

गेल्या काही दशकांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत तयार होणारे भांडवल उत्पादक मत्तांपेक्षा वित्तीय मत्तांमध्ये गुंतवले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शेअर्स, रोखे आणि विविध प्रकारची वायदे-करारासारखी वित्तीय प्रपत्रे स्टॉक मार्केटवर सूचिबद्ध होतात. त्यात इन्व्हेस्टमेंट बँका, म्युच्युअल, हेज, प्रायव्हेट इक्विटी फंड्स आणि अतिश्रीमंत व्यक्ती त्यांच्या ‘वेल्थ मॅनेजर्स’मार्फत गुंतवणूक वा निर्गुतवणूक करत असतात. हे चक्र अव्याहत सुरूच असते.

एखादी महत्त्वाची बातमी आली की खनिज तेलातील सट्टेबाज गुंतवणूकदारांची प्रतिक्रिया भावनिक असते. त्या घटनेमुळे खनिज तेलाचे भाव भविष्यात वाढणार असतात किंवा कमी होणार असतात. पण ‘पळा पळा कोण सर्वात आधी वेळ पकडतंय’ अशी स्पर्धा सट्टेबाजांमध्ये लागते. ‘भाव चढणार असतील तर मी सर्वाच्या आधी खरेदी करून ठेवणार आणि कोसळणार असतील तर लवकरात लवकर विकून मोकळा होणार’ अशी वर्तणूक असते. सट्टेबाज गुंतवणूकदारांच्या सहभागामुळे खनिज तेलाच्या भावात टोकाचे चढउतार होतात आणि टोकाच्या चढउतारामुळे नफा कमावण्याच्या संधी मिळतात म्हणून अधिकाधिक सट्टेबाज खनिज तेलाकडे आकृष्ट होतात असे ते दुष्टचक्र सुरू असते.

भारताच्या अर्थव्यवस्थेचे पेट्रोलियम पदार्थावरचे अवलंबित्व नजीकच्या काळात कमी होणारे नाही, ना खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारावरील वित्त भांडवलाची पकड. भाव कमी असतील त्या वेळी देशातील खनिज तेलाचे साठे वाढवणे, सार्वजनिक वाहतूक वाढवून खासगी वाहनांची संख्या कमी करणे आणि सूर्य-ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर भर देणे एवढेच सध्या तरी आपल्या हातात आहे.

लेखक ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त अध्यापन करतात.

ईमेल : chandorkar.sanjeev@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:07 am

Web Title: war mineral oil commodity commodity market akp 94
Next Stories
1 पुन्हा ‘दशदिशां’चा मागोवा..
2 ‘इशारा’ आणि ‘आवाहन’!  
3 ‘बहु’राष्ट्रीय कंपन्या : जगासाठी ‘फ्रॅन्केस्टाइन’?
Just Now!
X