केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णयाचे गुंतवणूकदारांकडून स्वागत

‘ब्रेग्झिट’च्या धक्क्य़ातून सावरणाऱ्या भांडवली बाजाराने बुधवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णयाचे जोरदार स्वागत केले. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय तसेच संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनात वस्तू व सेवा कर विधेयक मंजूर होण्याच्या आशेने दोन्ही निर्देशांकांमध्ये एक टक्क्य़ापर्यंत वाढ नोंदली गेली.
२१५.८४ अंश वाढीसह सेन्सेक्स २६,७४०.३९ वर तर ७६.१५ अंश भर राखत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२०० च्या पल्याड, ८,२०४ पर्यंत पोहोचला. एकाच व्यवहारातील दोन्ही निर्देशांकांनी घेतलेली एक टक्क्य़ापर्यंतची वाढ ही १५ जूननंतरची पहिली ठरली.
केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना सातव्या आयोगाच्या शिफारसींनुसार २३.५ टक्के वेतनवाढ लागू होणार आहे. त्याचबरोबर वस्तू व सेवा कर विधेयक १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता आहे.
या सर्वाचा अधिक प्रमाणातील सकारात्मक परिणाम आठवडय़ाच्या तिसऱ्या दिवशी बाजारात दिसून आला. सकाळपासूनच तेजी नोंदविणाऱ्या दोन्ही निर्देशांकांनी दिवसअखेरही हे चित्र कायम ठेवले. सत्रात परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत सावरणाऱ्या रुपयाचीही बाजाराने दखल घेतली.
युरोपीय बाजाराकडून आश्वस्त झालेल्या येथील निफ्टीने बुधवारी ८,२०० चा पल्ला पार केला आहे; हा टप्पा ८,३०० ते ८,५०० पर्यंत जाण्यास हरकत नाही, असे जिओजित बीएनपी पारिबासचे उपाध्यक्ष गौरांग शाह यांनी म्हटले आहे.
सेन्सेक्समधील ३० पैकी २४ कंपन्यांचे समभाग वाढले. मुंबई निर्देशांकात ३.९५ टक्क्य़ांसह हीरो मोटोकॉर्प अव्वल ठरला. तर वाहन क्षेत्रातीलच बजाज ऑटो, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स यांचे समभाग मूल्य १.५३ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक, ३.१५ टक्क्य़ांसह वाढला. तर ऊर्जा, वाहन, माहिती तंत्रज्ञान निर्देशांकात १.६६ टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे १.३१ व ०.९८ टक्क्य़ांनी वाढले.
गेल्या सलग दोन व्यवहारातील घसरणीनंतर आशियाई तसेच युरोपीय बाजारात मंगळवारी तेजी नोंदली गेली. भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या सत्रातील व्यवहार होणार आहेत.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी केंद्राने मान्य केल्याने आता ग्राहकांच्या खरेदीला वाव मिळणार असून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचाही विश्वास पुन्हा एकदा दुणावणार आहे.
– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित बीएनपी पारिबास.

ग्राहकपयोगी वस्तू, विद्युत उपकरण समभागात उसळी
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मान्य केल्यानंतर क्रयशक्ती वाढण्याच्या आशेने ग्राहकपयोगी वस्तू, वाहने, विद्युत उपकरणे क्षेत्रातील समभाग कमालीचे उंचावले. हीरो मोटोकॉर्प (+३.९५%) सह वाहन क्षेत्रातील टाटा मोटर्स (+१.५३%), मारुती सुझुकी (+१.३६%), बजाज ऑटो (+०.७१%), महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र (+०.६२%) यांचे समभाग मूल्य वाढले. तर विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रातील ब्ल्यू स्टार (+३.५६%), व्होल्टास (+१.८७%), व्हर्लपूल (+१.३८%) यांनाही मागणी राहिली.
‘किरकोळ’ समभागांमध्ये मोठी मूल्यवाढ
दुकाने, मॉल आणि सिनेमागृह २४ तास खुले ठेवण्यास मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या बुधवारच्या निर्णयाने या क्षेत्राशी संबंधित भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग तब्बल १० टक्क्य़ांपर्यंत वाढले.
फ्युचर मार्केट नेटवर्क्‍स रु. ३१.९० +१०.००%
स्टोअर वन रिटेल इंडिया रु. १६७.६५ +९.९७%
प्रोव्होग इंडिया रु. ४.५८ +९.८३%
फ्युचर एंटरप्राईजेस रु. २४.२० +५.४५%
शॉपर्स स्टॉप रु. ३८३.५० +५.९०%
व्ही२ रिटेल रु. ५८.२० +४.९६%
ट्रेंट लिमिटेड रु. १,७९५ +१.५२%
आयनॉक्स रु. २३४.४५ +७.१५%
पीव्हीआर रु. ९७८.७० +३.०४%