नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील विस्तारा तसेच सरकारी एअर इंडिया कंपनीने व्यवसाय ठप्प पडलेल्या जेट एअरवेजमधील कर्मचारी सामावून घेण्याची तयारी दर्शविली आहे.

एअर इंडिया २५० जेट एअरवेज कर्मचाऱ्यांची भरती करणार असून पैकी २०० कर्मचारी हे विमानात असणारे प्रवासी सेवा कर्मचारी असतील, तर ५० वैमानिक असतील. एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसकरिता जेटची कर्मचारी भरती केली जाणार आहे.

देशांतर्गत हवाई क्षेत्रात नवागत असलेल्या विस्ताराने जेटच्या ५०० कर्मचाऱ्यांची भरती करून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पैकी १०० वैमानिक असतील. विस्तारा ही टाटा समूह व सिंगापूर एअरलाइन्स यांच्या भागीदारीतील नागरी हवाई वाहतूक कंपनी आहे.

जेट एअरवेजची कट्टर स्पर्धक असलेल्या स्पाइसजेटने यापूर्वीच जेटचे ४०० कर्मचारी व १०० वैमानिक आपल्या सेवेत दाखल करून घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार १,००० कर्मचारी रुजूही झाल्याचे सांगण्यात येते.

त्याचबरोबर जेट एअरवेजच्या ताब्यातील १० विमाने येत्या दोन महिन्यांत स्पाइसजेटकडे येतील, असेही सांगण्यात आले.

विविध बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या जेट एअरवेजला अतिरिक्त अर्थसाहाय्य देण्यास व्यापारी बँकांनी नकार दिल्याने १७ एप्रिलपासून कंपनीची उड्डाणे बंद करण्यात आली. परिणामी, जेट एअरवेजमधील २२,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येऊन ठेपली आहे.

श्रद्धांजली आणि मूक रोष..

जेट एअरवेज जमिनीवर आल्यानंतर आत्महत्या केलेले या विमान कंपनीचे कर्मचारी शैलेश सिंह यांना बुधवारी त्यांच्या सहकार्याच्या वतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जेट व्यवस्थापन आणि स्टेट बँकेवर याबाबत कारवाई केली जावी, अशी मागणी करत यावेळी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण निदर्शने केली.