उत्तर आयुष्यासाठी गुंतवणुकीकडे वाढता कल

सर्वसामान्यांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करणाऱ्या निवृत्तिवेतन योजनांमध्ये गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत आहे. विविध निवृत्तिवेतन योजनांचा लाभ घेणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या ऑगस्टअखेर २४ टक्क्यांनी वाढून ४.५३ कोटींहून अधिक झाली आहे, अशी माहिती ‘निवृत्तिवेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ अर्थात ‘पीएफआरडीए’ या नियामक संस्थेने शुक्रवारी दिली.

‘पीएफआरडीए’कडून मुख्यत: राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना या दोन निवृत्तिवेतन योजनांचे व्यवस्थापन केले जाते. राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत ग्राहकांची संख्या ऑगस्ट २०२१ अखेरीस चार कोटी ५३ लाख ४१ हजारांवर पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये तीन कोटी ६५ लाख ४७ हजार होती. त्यात वर्षभरात २४.०६ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर अटल पेन्शन योजनेच्या सदस्यांची संख्या ३३.२० टक्क्यांनी वाढून ऑगस्ट २०२१ अखेर तीन कोटी चार लाख ५१ हजारांवर पोहोचली आहे.

निवृत्तिवेतन योजनांची गंगाजळी ६,४७,६२१ कोटींवर पोहोचली आहे. त्यामध्ये वार्षिक ३२.९१ टक्क्यांनी वाढ झाली. अटल पेन्शन योजनेअंतर्गत निधी वार्षिक तुलनेत सुमारे ३३ टक्क्यांनी वाढून १८,०५९ कोटी रुपयांवर गेला आहे.

कुठलीही पेन्शन योजना नसलेल्यांसाठी सरकारने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक लाभ  देणाऱ्या या योजनेत १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात.

‘एनपीएस’ची लोकप्रियता

म्हातारपणात आधार देणाऱ्या काठी मानल्या गेलेली राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) ही एक खूप महत्त्वाची योजना आहे. ‘पीएफआरडीए’ या नियामक संस्थेकडून ही योजना राबविली जात आहे. आधी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केली गेली होती; परंतु २००९ मध्ये ही योजना सर्वासाठी खुली करण्यात आली. त्यामुळे इतरांनासुद्धा आता या योजनेंतर्गत स्वत:साठी निवृत्तिवेतनाची तरतूद करता येऊ  शकते. खासगी कंपन्यासुद्धा ‘एनपीएस’चा पर्याय कर्मचाऱ्यांना देतात.