भारतात मोठय़ा संधी आहेत हे खरे असले तरी कमी वेगवान नेटवर्क व अनौपचारिक व विस्कळीत विक्री व्यवस्था यामुळे ‘अॅपल’ला पूर्ण क्षमतेने व्यवसाय करणे जमले नाही, त्यातच आता तिचा महसूल हा गेल्या तेरा वर्षांत म्हणजे २००३ नंतर प्रथमच घसरला आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या महसुलात तेरा वर्षांत प्रथमच घट झाल्यानंतर कॉन्फरन्स हॉलमधील कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की भारतात खरेतर मोठी संधी आहे, पण तेथील नेटवर्क व विक्रीची रचना यामुळे कंपनीला क्षमता असूनही काही करता आले नाही. पण चीन सात ते दहा वर्षांपूर्वी होता त्या दृष्टिकोनातून भारताकडे पाहिले तर आगामी काळात तेथे संधी वाढतील.
अॅपलचा चीनमधील खप हा अमेरिकेच्या खालोखाल आहे, पण तेथे आयफोनचा खप ११ टक्क्यांनी घसरला आहे, तर भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५६ टक्के वाढला आहे. कुक यांनी सांगितले, की अॅपलने उदयोन्मुख बाजारपेठांवर लक्ष दिले आहे, तेथे बेसुमार वाढ झाली आहे. तुम्ही भारताकडे पाहिलेत तर प्रत्येक देशाची वेगळी कथा आहे, पण त्या देशात एलटीई सुविधा आता या वर्षी सुरू झाली आहे त्यामुळे पुढील काळात काही चांगल्या इंटरनेट कंपन्या भारतात येतील अशी अपेक्षा आहे.
आयफोनसाठी वेगवान नेटवर्क लागते २.५ जी किंवा काही प्रमाणात ३ जी त्याला चालत नाही. भारतात पायाभूत सुविधांचाही प्रश्न आहे. तेथे रिटेल व्यवसाय साखळी उभारणी आवश्यक आहे तरच अॅपल कंपनी तेथे खप वाढवू शकेल. भारतातील किरकोळ विक्री दुकाने लहान आहेत. अॅपलने भारतात मोठी शक्ती गेल्या १८ महिन्यात लावली व तेथे चांगले परिणामही दिसले आहेत, अजूनही जास्त संधी भारतात आहेत. अॅपलने २६ मार्च २०१६ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले असून त्यानुसार कंपनीने तिमाहीत ५०.६ दशलक्ष डॉलर्स महसूल मिळवला तो वर्षांपूर्वी याच काळात ५८ अब्ज डॉलर्स होता. कंपनीचा निव्वळ नफा १०.५ अब्ज डॉलर्स असून तो गेल्या वर्षी याच काळात १३.६ अब्ज डॉलर्स होता. पहिल्या तिमाहीत खप ५१.१९ दशलक्ष होता तो गेल्या वर्षी ६१.१७ दशलक्ष होता. कुक यांनी सांगितले की, ही वेळही जाईल, आमची अनेक नवीन उत्पादने येत असून ती अभिनव आहेत.

मोठय़ा संधी असूनही भारतात वाढीला मर्यादा!
भारत ही स्मार्टफोनची जगातील तिसरी मोठी बाजारपेठ आहे. पण येथील बाजारात कमी किमतीचे स्मार्टफोन जास्त चालतात. शिवाय नेटवर्क मंदगतीचे असून विक्री व्यवस्थाही विस्कळीत आणि अस्ताव्यस्त आहे. त्यामुळे या बाजारपेठेत वाढीच्या मोठय़ा संधी असल्या तरी आमच्यासाठी तरी मर्यादित वाव आहे, असाच आपण अर्थ काढला आहे, असे अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी मत व्यक्त केले.