मागील लेखामध्ये आपण उद्दिष्टानुसार गुंतवणूक समजून घेतली, आता म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील जोखीमेच्या बाजू विचारात घेऊ या.

जोखीम हा आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक यांचा मूलभूत भाग आहे आणि गुंतवणुकदाराची संपत्ती निर्माण करणे आणि ती सुरक्षित ठेवणे याचा अविभाज्य घटक आहे. अशा प्रकारे जोखीमेचे मूल्यमापन करणे आणि जोखीमेचे प्रमाण निश्चित करणे हा गुंतवणुकीच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा आहे. गुंतवणूकदाराला त्यांच्या जोखीमेच्या स्वरूपानुसार आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार निर्णय घेता येतो.

या पद्धतीचा सखोल अवलंब करण्यासाठी भांडवल बाजाराची नियंत्रक ‘सेबी’ने १ जुलै २०१५ पासून रिस्कोमीटरचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. जोखीमेचे स्वरूप महत्त्वाचे का आहे? या लेखात याचे तपशीलवार उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

रिस्कोमीटर :

या प्रणाली अंतर्गत, गुंतवणूकदाराला त्याच्या जोखमीच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्यास मदत व्हावी यासाठी १८० अंश कोनात  गोलाकार फिरणाऱ्या काटय़ाचा उपयोग करण्यात आला आहे. रिस्कोमीटरमध्ये पाच गट आहेत.

१. किमान – मुद्दलाला अत्यल्प जोखीम असते.

२. माफक प्रमाणात कमी – मुद्दलाला माफक प्रमाणात अल्पजोखीम संभवते.

३. माफक – मुद्दलाला माफक जोखीम असते

४. माफक प्रमाणात उच्च – मुद्दलाला माफक प्रमाणात उच्च जोखीम संभवते.

५. उच्च – मुद्दलाला उच्च जोखीम असते

या नव्या स्वरूपात काटा जसा कमी ते उच्च जोखमीकडे सरकतो तसे म्युच्युअल फंडाच्या योजनेचे जोखमीचे स्वरूप वाढत जाते. हे रिस्कोमीटर योजनेच्या माहिती दस्तऐवजात जो एक सामायिक अर्जाचा  नमुना असतो आणि योजनेच्या जाहिरातीत दाखविण्यात येतो.

जोखमीचे स्वरूप समजून घेणे:

गुंतवणूकदाराला विविध निकषांवर स्वत:च्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करता येते आणि त्यानुसार वेगवेगळ्या मालमत्तेच्या वर्गांमध्ये पैशाची विभागणी करता येते.

साधारणपणे, जोखमीचे स्वरूप निश्चित करण्याचे काम आर्थिक नियोजनकार औपचारिक प्रश्नावलीवर आधारित प्रक्रियेद्वारे करतात. या प्रक्रियेमध्ये गुंतवणूकदारांना काही प्रश्नांची  प्रामाणिकपणे उत्तरे द्यावी लागतात. यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या जोखीम घेण्याची क्षमता पाहिली जाते. गुंतवणूकदाराच्या जोखमीच्या स्वरूपाचा अंदाज लावण्यास मदत करणार्ऱ्या प्रमुख निकषांमध्ये गुंतवणूकदाराचे वय, आरोग्य, अवलंबित व्यक्ती, आर्थिक परिस्थिती, गुंतवणुकीचा कालावधी, लिक्विडिटीची आवश्यकता, कर्ज / देणी, मिळकतीचे स्थैर्य, कालावधी आणि गुंतवणूक व आर्थिक बाजारपेठ समजून घेण्याची क्षमता यांचा समावेश होतो.

जोखमीचे खास स्वरूप

सावध : या प्रकारामध्ये भांडवल सुरक्षित ठेवणे हे गुंतवणूकदाराचे सर्वाधिक प्राधान्य असते आणि तो कमीतकमी जोखीम स्वीकारण्यास तयार असतो. त्यामुळे त्याला त्याची मुद्दल सुरक्षित राहून जोखमीच्या स्वरूपानुसार तुलनेने कमी परतावा मिळतो.

माफक सावध : काही संभाव्य परताव्याच्या बदल्यात मध्यम ते दीर्घ कालावधीत गुंतवणूकदार थोडी अधिक जोखीम स्वीकारण्यास तयार असतो.

माफक : गुंतवणूकदार माफक प्रमाणात जोखीम सहन करू शकतो आणि त्या बदल्यात मध्यम ते दीर्घ कालावधीत संभाव्य उच्च परतावा मिळविण्यास तयार असतो.

माफक आक्रमक : मध्यम ते दीर्घ कालावधीत संभाव्य अधिक परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार उच्च जोखीम स्वीकारण्यास तयार असतो.

आक्रमक : दीर्घ कालावधीत जास्तीत जास्त परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात जोखीम स्वीकारण्यास तयार असतो आणि त्याला माहित असते की त्याच्या भांडवलाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान ही  होऊ शकते.

म्युच्युअल फंडाचे विश्व खूप मोठे आहे आणि जे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या जगात नवीन असतील त्यांच्यासाठी रिस्कोमीटर अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर, गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओचे गुणधर्म आणि कामगिरीचे निकष यासारख्या इतर निकषांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा ही विनंती.