News Flash

बाजार-साप्ताहिकी : अर्थसाहाय्याच्या प्रतीक्षेत

जिओमधील नवीन गुंतवणूकदारांनी रिलायन्सचा बाजारातील दबदबा कायम राखला.

संग्रहित छायाचित्र

* सुधीर जोशी

मागील सप्ताहाच्या शेवटी ‘शॉर्ट कव्हरिंग’मुळे आलेल्या तेजीचा फुगा या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी फुटला व निर्देशांक सहा टक्क्यांनी खाली आले. बाकीच्या चार दिवसांत स्थिर पट्टय़ात वाटचाल करत मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्स) २,०७५ अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) ६०८ अंकांची साप्ताहिक घसरण झाली. या घसरणीत बँकिंग क्षेत्राचा मोठा वाटा होता. अमेरिका-चीनमधील वाक्युद्धाचाही हा परिणाम होता. जिओमधील नवीन गुंतवणूकदारांनी रिलायन्सचा बाजारातील दबदबा कायम राखला.

आयसीआयसीआय लोम्बार्ड या सर्वसाधारण विमा व्यवसायात असलेल्या कंपनीच्या जानेवारी-मार्च २०२० तिमाहीच्या विमा हप्ता संकलनात घट झाली असली तरी वार्षिक नफ्यात मात्र वाढ झाली आहे. कंपनीने स्वत:ला पीक विमा व्यवसायापासून दूर ठेवल्यामुळे तसेच आगीपासून संरक्षणाच्या विम्याचे दर वाढविल्यामुळे विमा दाव्यांमुळे होणारा तोटा कमी झाला आहे. कंपनीच्या एकूण व्यवसायात आरोग्य विम्याचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे करोनाच्या उपचारांच्या दाव्यांचा नफ्यावर फारसा परिणाम होणार नाही. कंपनीला गुंतवणुकीवर तोटा झाला असला तरी अन्य विमा व्यवसाय नफ्यात आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कंपनीचा विचार करण्यास हरकत नाही.

एचसीएल टेक्नॉलॉजी या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतात तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या कंपनीने वार्षिक निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात वार्षिक ९ टक्क्यांची वाढ झाली. डिजिटल क्षेत्राचा एकूण उत्पन्नातील वाटा ३५ टक्के आहे. कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी लागणारे बदल मोठय़ा प्रमाणावर व फार तत्परतेने केले. शेवटच्या तिमाहीत १४ नवीन करार मिळवून ग्राहकांचा विश्वास सिद्ध केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी कमी धोक्याच्या वाटतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी या कंपनीकडे लक्ष असायला हवे.

सरकारने टाळेबंदी उठविण्याची सुरुवात ‘किक स्टार्ट’ने केली व सोमवारी दारूची दुकाने उघडल्यावर खरेदीसाठी झालेली तुंबळ गर्दी अनेकांनी पाहिली. अशीच गर्दी टाळेबंदी संपूर्णपणे उठवल्यावर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी होईल का हा कळीचा मुद्दा आहे. अर्थचक्र पूर्ववत होण्यासाठी लोकांनी खरेदी करणे आवश्यक असेल तरच उद्योग सावरतील. चीनच्या अनुभवावरून वस्तू खरेदी सुरू होईल; पण सेवा देणारे उद्योग वर येण्यास सर्वात अधिक काळ लागेल. भारतातील सेवा क्षेत्रातील रोजगार ३२ टक्के आहे. या क्षेत्रातील उद्योग जसे वाहतूक, हॉटेल, पर्यटन, लग्न समारंभ, बांधकाम, माथाडी, ब्युटी पार्लर्स, उन्हाळी घरगुती व्यवसाय असे अनेक उद्योग गेले दोन महिन्यांत ठप्प झाले आहेत. खासगी सेवा क्षेत्राचा निर्देशांक प्रथमच किमान स्तरावर आला आहे. गेल्या महिन्यात अनेकांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. या क्षेत्रांवर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत मागणीचा अभाव राहील व पैसा असणारे लोकही हात आखडता घेऊ नच खरेदी करतील. त्यामुळे उद्योगांना सावरण्यासाठी सरकारकडून मोठय़ा आर्थिक सहकार्याची सर्वाना अपेक्षा आहे. पुढील आठवडय़ात आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, मारुती सुझुकी व नेस्ले इंडियासारख्या कंपन्यांच्या वार्षिक निकालांवर बाजार प्रतिक्रिया देईल.

* sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 3:07 am

Web Title: article on awaiting funding abn 97
Next Stories
1 समभाग फंड गुंतवणुकीला ओहोटी
2 स्टेट बँकेच्या कर्ज व्याजदरात कपात
3 वाढत्या करोना संकटाने भांडवली बाजारात चिंता
Just Now!
X