* सुधीर जोशी

प्रत्येक दिवशी मोठे हेलकावे खाणाऱ्या या सप्ताहातील बाजारावर माहिती तंत्रज्ञान कंपन्या व रिलायन्सचा पगडा राहिला. एकीकडे इन्फोसिस, विप्रो, माइंडट्री, एचसीएल टेकसारख्या कंपन्यांचे उ त्साहवर्धक तिमाही निकाल, रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा, कोविड-१९ वरील लस लवकरच प्राप्त होण्याच्या बातम्या तर दुसरीकडे अमेरिकेने चीन विरोधात उचललेली पावले, कोविडचा वाढता प्रादुर्भाव यामुळे बाजारचे निर्देशांक मोठी हालचाल नोंदवित होते. गेले पाच आठवडे सातत्याने वाढणाऱ्या सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ३७,००० व १०,९०० चा टप्पा पार केला.

कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या तिमाहीच्या निकालात फार अपेक्षा नसल्या तरी त्यामधून कंपन्यांच्या भवितव्याचा व पर्यायाने बाजाराचा अंदाज घेणे गरजेचे आहे.

माइंडट्रीचा पहिल्या तिमाहीचा महसूल थोडा कमी झाला असला तरी या आधीच्या वर्षांतील पहिल्या तिमाहीच्या ९२ कोटींच्या तुलनेत या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत २१३ कोटींचा नफा कमावला. नफ्याचे प्रमाण वाढवून नवीन ग्राहक मिळविण्यात कंपनी यशस्वी झाली आहे.

एलटीआयटीमध्ये (लार्सन टुब्रोची उपकंपनी) विलीनीकरणाकडे लक्ष ठेवून कंपनीतील गुंतवणूक चांगला नफा देऊ शकते.

विप्रोने नफ्याचे प्रमाण कायम राखून सर्वांना आशावादी ठेवले आहे. बाकी कंपन्यांच्या तुलनेत इन्फोसिसचे पहिल्या तिमाहीचे निकाल उजवे ठरले. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रीय निर्देशांकात आठ टक्क्यांच्या वाढीने बाजाराने निकालांचे स्वागत केले. याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कोविड-१९ च्या संकटाला यशस्वीपणे तोंड देऊन नवीन संधी शोधत आहेत.

रिलायन्सने आपल्या वार्षिक सभेत ५जी तंत्रज्ञानाच्या तयारीची घोषणा करून जिओ प्लॅटफॉर्म व रिटेल व्यवसायाकडील वाटचालीतून कंपनीच्या परिवर्तनाच्या दिशा स्पष्ट केल्या. रिलायन्सच्या मूल्यांकनात त्यामुळे आणखी वाढ होईल. नवीन व्यवसायांकडे लक्ष ठेवून बाजारात संधी मिळेल तेव्हा रिलायन्सच्या खरेदीचे धोरण ठेवले पाहिजे.

एव्हेन्यू सुपर मार्ट (डी-मार्ट)च्या पहिल्या तिमाहीतील विक्रीत ६० टक्क्यांहून जास्त घट  झाली. पण बहुतेक दुकाने स्वत:च्या मालकीची असल्यामुळे बंद असताना भाडेखर्च वाचला. रिलायन्सच्या जिओ मार्टची घोषणा व स्थानिक स्तरावर होणाऱ्या टाळेबंदीमुळे डी-मार्टच्या समभागांवर थोडा दबाव आला आहे. पण आणखी थोडय़ा खालच्या स्तरावर या उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या कंपनीमध्ये खरेदीची संधी घेता येईल.

चीनने पहिल्या तिमाहीत राष्ट्रीय उत्पादनात तीन टक्यांची वाढ घोषित केली आहे जी एकूण जागतिक बाजारासाठी चांगली बातमी आहे. चीनमधील मागणीचे वाढते प्रमाण सर्वच उद्योगांना (विशेषकरून पोलाद व धातू) फायद्याचे आहे. या सप्ताहात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांबरोबर ब्रिटानियासारख्या ग्राहक उपभोग्य कंपनीचे निकालही चांगले आले.

पुढील सप्ताहात मोठय़ा बँका, वित्तीय संस्था, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसीसारख्या मोठय़ा कंपन्यांचे निकाल पाहून बाजार साप्ताहिक षटकार मारेल का हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

sudhirjoshi23@gmail.com