आशियाई विकास बँकेने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज कमी केला असून ही वाढ २०१५-१६ मध्ये ७.४ टक्के असेल, असे म्हटले आहे. या आधी बँकेने विकास दर ७.८ टक्के राहणे अंदाजले होते. कमजोर मान्सून, बाहेरच्या देशातून कमी मागणी व आर्थिक सुधारणा पुढे नेण्यात सरकारचे अपयश यामुळे भारताची आर्थिक वाढ कमी राहील, असे या बँकेच्या अंदाजात म्हटले आहे. चलनवाढही ४ टक्के (०.२ टक्के कमी जास्त) राहील असे नवीन अंदाजात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती वाढणार असून त्याचा फटका देशांतर्गत किमतींना बसणार आहे. परिणामी आशियाई विकास बँकेने २०१५-१६ मध्ये आर्थिक विकास दराचा अंदाज ०.४ टक्क्य़ांनी कमी केला आहे, तर २०१६-१७ मध्ये तो ७.८ टक्के असेल असे म्हटले आहे. मार्चमध्ये बँकेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारताचा आर्थिक विकास दर २०१५-१६ मध्येच ७.८ टक्के तर २०१६-१७ मध्ये ८.२ टक्के असेल असे अंदाजले होते. कमजोर मान्सून, कमी मागणी, ठप्प संसदीय प्रक्रियेमुळे आर्थिक सुधारणांना खीळ, यामुळे आर्थिक विकास दराचा अंदाज कमी करण्यात आला आहे. चीनचा आर्थिक विकास दर २०१५ मध्ये ५.८ टक्के राहील तर २०१६ मध्ये ६ टक्के राहील असे आशियायी विकास बँकेने म्हटले आहे. या दोन्ही वर्षांत चीनचा विकास दर ६.३ टक्के राहील असा अंदाज मार्चमध्ये वर्तवण्यात आला होता.