मॅक्स लाइफ इन्शुरन्समधील थेट हिस्सा खरेदीला रिझव्‍‌र्ह बँकेने आक्षेप घेतल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेने अखेर खासगी आयुर्विमा कंपनीतील समभागरूपी हिस्सा व्यवहार पार पाडला. रिझव्‍‌र्ह बँकेचा आक्षेप खासगी बँकेच्या पथ्यावर पडला असून यापूर्वीच्या १७.००२ टक्केऐवजी मॅक्स लाइफमध्ये आता १९.००२ टक्के हिस्सेदारी असेल.

मॅक्स लाइफ इन्शुरन्समध्ये १७.००२ टक्के थेट हिस्सा खरेदीसाठी अ‍ॅक्सिस बँकेने ऑगस्ट २०२० मध्ये करार केला होता. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने त्याला आक्षेप घेतला. परिणामी उभयता दरम्यान नव्याने करार करण्यात आला. यानुसार, मॅक्स लाइफमधील १९.००२ टक्के हिस्सा व तोदेखील अ‍ॅक्सिस बँकेला आता समभागाच्या रूपात खरेदी करावा लागला आहे. करारानुसार, अ‍ॅक्सिस बँक ही मॅक्स लाइफ इन्शुरन्समधील ९.००२ टक्के तर अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज व अ‍ॅक्सिस कॅपिटल या संयुक्तरीत्या ३ टक्केपर्यंत; याशिवाय अ‍ॅक्सिसच्या उपकंपन्या अतिरिक्त ७ टक्के हिश्श्यापर्यंतचे समभाग खरेदी करेल. नव्या करारामुळे यापूर्वीची व्यवहारनिश्चिती संपुष्टात आली आहे. सुरुवातीला अ‍ॅक्सिस बँकेने मॅक्स लाइफमध्ये २९ टक्के हिस्सा खरेदीची तयारी केली होती. मात्र भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने या निर्णयात बदल करण्यास सांगितले. खासगी विमा कंपनीत खासगी बँकेचा सध्या अवघा एक टक्के हिस्सा आहे.

टाटा सन्सपासून विलग होताना थेट हिस्सा खरेदीऐवजी टाटा समूहातील उपकंपन्यांचे समभाग पदरात पाडून घेण्याचा प्रस्ताव शापूरजी पालनजी समूहाने नुकताच सर्वोच्च न्यायालयात सादर केला.