गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्याविषयक बँका अर्थात डीपीमध्ये चालणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांची तोंडओळख करून देणाऱ्या लेखमालेतील हा दुसरा भाग..
मागील शुक्रवारच्या लेखाला अनुसरून अनेक विचारणा वाचकांकडून झाल्या त्या सर्वाना विनंती अशी की, या विषयावरील सर्व लेख लिहून पूर्ण झाले की आपणास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मागील भागातील सारांश असा की, बँक ऑफ इंडिया डीपीचे मुंबईत डिमॅट कार्यालय आहे, जिथे बॅक ऑफिस सव्‍‌र्हर बसवलेला आहे ज्याला बँकेच्या देशभरातील सर्व शाखांमधील संगणक जोडलले असतात. याच कार्यालयात लाइव्ह सव्‍‌र्हर म्हणून एक संगणक बसवलेला असतो जो सीडीएसएलच्या मुख्य संगणक यंत्रणेशी जोडलेला असतो. तात्पर्य डिमॅट कार्यालयात जे जे काही काम केले जाते तो डेटा तात्काळ सीडीएसएलकडे जातो. मात्र बँकेच्या शाखांमधून जे काम केले जाते ते बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये येऊन पडते, जे तिथून डिमॅट कार्यालयातर्फे सीडीएसएलकडे पाठवले जाते ज्याला ऊं३ं ए७स्र्१३ असे म्हणतात. बँकेच्या कणकवली शाखेने डिमॅट खाते उघडण्याच्या अर्जातील तपशील आपल्या संगणकाद्वारे बॅक ऑफिसला पाठवला व तो शेवटी सीडीएसएलच्या यंत्रणेत पोचला की डिमॅट खाते क्रमांक निर्माण होतो हे आपण पाहिले. आता प्रश्न असा की, कणकवली शाखेला हा क्रमांक कसा कळावा? सोपे आहे! ज्याप्रमाणे शाखांनी नोंदवलेला डेटा डिमॅट कार्यालय बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये घेऊन सीडीएसएलला पाठवते, त्याप्रमाणे रोज सायंकाळी कार्यालय बंद होतेवेळी सीडीएसएलच्या  यंत्रणेतून डेटा घेऊन डिमॅट कार्यालय तो बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये कॉपी करते. अर्थात या वेळेला कणकवली शाखा बंद झालेली असू शकते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शाखा उघडताच तेथील कर्मचारी आपला संगणक बॅक ऑफिस सव्‍‌र्हरला प्रवेश घेऊन उपरोक्त डेटा पाहू शकतो, ज्यात सदर व्यक्तीचा डिमॅट खाते क्रमांक दिसेल तो संभाव्य खातेदाराला तोंडी सांगू शकतो. अर्थात खाते उघडताच एक स्वागतपत्र बँकेचे डिमॅट कार्यालय खातेदाराला पाठवते, ज्यासोबत एक डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन पुस्तिका पण असेल. यामुळे खातेदाराला आपले डिमॅट खाते उघडले गेले असल्याची एक अधिकृत अशी माहिती लेखी स्वरूपात मिळते.

बँकेच्या देशभरात सुमारे ४५०० शाखा आहेत, ज्या कोअर बँकिंग यंत्रणेत जोडलेल्या आहेत, त्यामुळे तत्त्वत: अशा सर्व शाखांमधून डिमॅट सेवा देता येऊ शकते. मी ‘तत्त्वत:’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे काही निवडक शाखांमधूनच डिमॅट सेवा देण्याचे बँकेने ठरविले असेल तर तो त्यांचा अंतर्गत निर्णय असतो. अधिक स्पष्ट करायचे तर उपरोक्त कणकवली शाखा यात नसेल तर कणकवलीतील व्यक्ती तेथे जाऊन डिमॅट खाते उघडू शकणार नाही. त्यासाठी जवळच्या अन्य एखाद्या शाखेत जावे लागेल. तथापि, हा सर्व सारासार विचार करूनच बँकेने अशा शाखा निर्दष्टि केलेल्या असतात, जेणेकरून डिमॅट सेवेपासून ग्राहक वंचित राहणार नाही. वाचकांच्या मनात प्रश्न आला असेल की मूळ ग्राहकाने जो खाते उघडण्याचा अर्ज आणि केवायसी दस्तऐवज कणकवली शाखेकडे दिले आहेत त्याचे काय? सर्वसाधारणपणे ती सर्व कागदपत्रे त्या शाखेकडेच राहतील व जेव्हा मुंबईस्थित डिमॅट कार्यालयात ऑडिट सुरू होईल तेव्हा त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती मागवून घेतल्या जातील. खाते तर उघडले. त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे जेव्हा केव्हा तो खातेदार आपल्या दलालामार्फत शेअर्स विकेल, तेव्हा डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन घेऊन कणकवली शाखेत येईल. तिथला कर्मचारी पूर्वीप्रमाणेच आपल्या संगणकात तो तपशील नोंदवील जो बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये येऊन पडेल आणि नंतर तो डिमॅट कार्यालय सीडीएसएल यंत्रणेत रवाना करील. तसा तो येताच सीडीएसएलमध्ये त्या खातेदाराच्या डिमॅट खात्यातून तितके शेअर्स वजा होऊन दलालाच्या डिमॅट खात्यात जमा होतील. कारण डिलिव्हरी इन्स्ट्रक्शनमध्ये खातेदाराने आपल्या दलालाचा डिमॅट खाते क्रमांक लिहिलेला असणारच. मग त्या दलालाचे डिमॅट खाते सीडीएसएलमध्ये असो की एनएसडीएलमध्ये असो! सदर डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन शाखा आपल्याकडे ठेवून घेईल व गरज पडेल तेव्हा झेरॉक्स मुंबईतील डिमॅट कार्यालयाला पाठवील. सदर ग्राहकाचे डिमॅट खात्यातून शेअर्स वजा झाले आहेत ही माहिती कणकवली शाखेला दुसऱ्या दिवशी कळेल. कारण मागे लिहिले त्यानुसार सीडीएसएलमधून डेटा घेऊन तो बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये कॉपी करेपर्यंत शाखा कार्यालयीन वेळ संपल्याने बंद झालेली असेल. आता थोडे व्यावहारिक बाजूने विचार करू. मुंबईतील बँकेचे डिमॅट कार्यालय दिवसातून कितीही वेळा सीडीएसएल यंत्रणेत डेटा एक्सपोर्ट करील किंवा तिथून डेटा घेऊन तो बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये कॉपी करील. या हिशेबाने कणकवली शाखेने एखादी डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन दुपारी दोन वाजता संगणकात नोंदवली असेल आणि डिमॅट कार्यालयाने ती अडीच वाजता एक्सपोर्ट केली असेल आणि सीडीएसएलमधून तीन वाजता डेटा घेऊन तो बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये कॉपी केला असेल तर कणकवली शाखा तीन वाजता ते पाहू शकते व खातेदाराच्या खात्यातून तितके शेअर्स वजा झाल्याचे त्याला कळवू शकते. तीच बाब नवीन खाते उघडण्याचा अर्ज तपशील नोंदवला असेल तर. तीन वाजतादेखील संभाव्य खातेदाराला त्याचा डिमॅट खाते क्रमांक शाखा कळवू शकेल. जेव्हा एखाद्या कंपनीचा आयपीओ आलेला असतो आणि अर्जदाराला त्वरेने डिमॅट खाते उघडायचे असेल तर अशा प्रकारे विविध शाखांद्वारे आलेला डेटा कितीही वेळा एक्सपोर्ट करील!