तीन लाखांत शहरी वाहतुकीसाठी छोटेखानी वाहन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नियामकाच्या कात्रीत अडकलेली बजाज ऑटोची ‘क्यूट’ हे छोटेखानी ‘क्वाड्रीसायकल’ वाहन अखेर महाराष्ट्रातही दाखल झाले आहे. पेट्रोलसह सीएनजीवर चालणारे व ३ लाखांपेक्षा कमी किमतीचे हे वाहन आहे,

बजाज ऑटोचे हे अनोखे वाहन गेल्या चार वर्षांपासून भारतात तयार होत आहे. मात्र नियामकाने आक्षेप घेतल्याने त्याची देशात विक्री होत नव्हती. अखेर गेल्या वर्षी त्याची भारतात विक्री सुरू झाली. पहिल्या टप्प्यात केरळ, गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये अवतरल्यानंतर ही छोटी कार आता महाराष्ट्रातही उपलब्ध झाली आहे.

प्रति तास ७० किमी अंतर कापण्याची मर्यादा असलेल्या बजाज ऑटोच्या पेट्रोलवरील क्यूटची इंधनक्षमता ३५ किमी प्रति लिटर, तर सीएनजीवरील क्यूटची इंधनक्षमता ४३ किमी प्रति किलो आहे. पेट्रोल वाहन २.४८ लाख तर सीएनजी वाहन २.७८ लाख रुपयांना राज्यात उपलब्ध असेल. २१६.६० सीसी इंजिनक्षमता, फोर स्ट्रोक, सिंगल सिलिंडर अशी तांत्रिक रचना असलेल्या क्यूटला चार दरवाजे असून तिची उंची १,६५२ मिमी उंची आहे. ४५१ किलो वजन असलेल्या क्यूटमध्ये यूएसबी चार्जिग पोर्ट, म्युझिक प्लेयर, कुलूपबंद साठवणूक कप्पे असून सहा विविध रंगांमध्ये हे वाहन उपलब्ध झाले आहे.

कंपनीच्या औरंगाबाद येथून या वाहनाची निर्मिती होत असून वर्षांला ६०,००० क्यूट उत्पादनक्षमता आहे. सध्या विविध ३० देशांमध्ये तिची निर्यात होते. महिन्याभरात आणखी २२ राज्यांमध्ये क्यूट सादर होईल.