सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियाने अल्पमुदतीच्या ठेवी आणि कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. युनियन बँकेने तिच्या विविध मुदतीच्या ठेवींचे व्याजदर ०.०५ ते ०.१० टक्क्यापर्यंत कमी केले आहेत. बँकेचा एक वर्ष कालावधीचा ‘एमसीएलआर’ ०.०५ टक्क्याने कमी करत तो वार्षिक ८.२० टक्के केला आहे. यापेक्षा कमी असलेल्या वार्षिक ७.७५ टक्के व्याजदरामध्ये यंदा ०.१० टक्क्यापर्यंत कपात करण्यात आली आहे. बँकेचे सुधारित दर बुधवार, ११ डिसेंबरपासून लागू होत आहे.

बँक ऑफ इंडियानेही ‘एमसीएलआर’ तब्बल ०.२० टक्क्यांपर्यंत कमी करताना तो वार्षिक ७.७५ टक्क्यांवर आणून ठेवला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बँकेने ०.१० टक्के व्याजदर कमी करत दर ८ टक्क्यांच्याही खाली (७.९०%) आणून ठेवण्याची घोषणा सोमवारीच केली. बँकेने या माध्यमातून सलग आठवी व्याज दरकपात केली होती.

स्थिर पदधोरण जाहीर करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पावलानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपाठोपाठ व्याज दरकपातीचा धडाका खासगी बँकांनीही लावला आहे. या क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने सर्व प्रकारच्या कालावधीचे कर्ज व्याजदर ०.१५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. ७ डिसेंबरपासून लागू झालेल्या बँकेचा एक वर्ष कालावधीचा ‘एमसीएलआर’ ८ टक्के आहे. बँकेचा किमान दर ८ टक्के तर कमाल दर ८.३५ टक्के आहे. खासगी बँकेने नोव्हेंबरमध्येही ०.१० टक्के दर कपात लागू केली होती.

वर्षभरात रिझव्‍‌र्ह बँकेने १.३५ टक्के रेपो दर कमी केल्यानंतर अन्य व्यापारी बँकांनी मात्र ०.७० टक्क्यांपर्यंतच्या व्याज दरकपातीचा लाभ कर्जदारांना दिला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गेल्या गुरुवारी जाहीर झालेल्या पाचव्या द्विमासिक पतधोरणात प्रमुख, रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता.