जरी रेपो दरात दोन महिन्यांत अर्धा टक्का कपात झाली असली तरी लगेचच व्याजदर कपात करता येणार नाही, रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण लक्षात घेऊनच पुढील पाऊल उचलले जाईल, असे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बुधवारी संकेत दिले. अर्थमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर अनेक बँकप्रमुखांनी असे सूचित केले आहे. रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण ७ एप्रिल रोजी आहे.
बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा व्ही. आर. अय्यर म्हणाल्या की, एप्रिलमधील रिझव्र्ह बँकेचे पतधोरण कसे असेल, हे पाहावे लागेल. त्यानंतरच व्याज दरकपात करायची अथवा नाही याबाबत विचार केला जाईल. व्याज दर कमी करायचे झाल्यासच ते ०.१० ते ०.२५ टक्क्यांनी कमी केले जातील, असेही त्या म्हणाल्या. रिझव्र्ह बँकेवरील दरकपातीचा दबाव प्रत्यक्षात आल्यानंतर अर्थ खाते स्तरावरूनही आता बँकांनी व्याज दर कमी करण्याची आवश्यकता मांडली जात आहे. खुद्द केंद्रीय अर्थमंत्री जेटली, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्यासह वित्त खात्यातील वरिष्ठ  अधिकारीही लवकरच प्रत्यक्षातील कमी कर्ज व्याज दर दिसतील, अशी आशा करत आहेत.
२०१५ मध्ये आतापर्यंत रिझव्र्ह बँकेने दोन वेळा प्रत्येकी पाव टक्क्याची दर कपात केली आहे. या कालावधीतील प्रत्यक्ष पतधोरणाव्यतिरिक्त ती करण्यात आली आहे. जानेवारीच्या मध्याला व मार्चच्या सुरुवातीला ही दरकपात झाली आहे. त्याला आतापर्यंत केवळ दोन-चार बँकांनीच प्रतिसाद दिला आहे.