जागतिक प्रतिकूलतेची भर पडून सेन्सेक्सची ५१६ अंशांनी आपटी

अपेक्षित व्याजदर कपात होऊनही ती हव्या त्या प्रमाणात न झाल्याची नाराजी मंगळवारी सेन्सेक्सला तब्बल ५१६ अंश खाली घेऊन गेली. एकाच व्यवहारात निर्देशांकातील मोठय़ा आपटीने सेन्सेक्सने आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रात २५ हजारांचा स्तरही सोडला. ५१६.०६ अंश घसरणीने मुंबई निर्देशांक २४,८८३.५९ वर स्थिरावला.

निर्देशांकातील एकाच व्यवहारातील आपटी ही ११ फेब्रुवारीनंतरची सर्वात मोठी ठरली.

रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होताच २५० अंशांनी आपटणाऱ्या मुंबई शेअर बाजारात व्यवहारअखेरही व्याजदराशी निगडित समभागांचे मूल्य कमालीचे घसरते राहिले. तर सोमवारच्या तुलनेत १५५.६० अंश घसरण नोंदविणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही मंगळवारी ७,६०० नजीक, ७,६०३.२०चा तळ गाठला.

पाव टक्का रेपो दर कपातीचे रिझव्‍‌र्ह बँकेचे चालू आर्थिक वर्षांतील पहिले द्विमासिक पतधोरण मंगळवारी सकाळी ११ वाजता जाहीर झाले. तत्पूर्वीच सेन्सेक्समध्ये सोमवारच्या तुलनेत १२५ अंशांची सुरुवातीची घसरण नोंदली गेली होती. मात्र पतधोरण जाहीर होताच सेन्सेक्समधील घसरण २५०, ३०० अशी विस्तारत गेली. ती दिवसअखेर ५१६ अंशांपर्यंत गेली.

रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर पाव टक्का कमी केला असला तरी तो अधिक, अध्र्या टक्क्यापर्यंत कमी होण्याची बाजाराला आशा होती. त्याचबरोबर रोख राखीव प्रमाणात काहीही बदल न झाल्यानेही गुंतवणूकदारांनी निराशा नोंदविली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून २५ हजारांच्या वरच्या टप्प्याला असलेल्या मुंबई निर्देशांकाचा लाभ उठवत अनेकांनी नफेखोरीही अवलंबिली.

पतधोरणानंतर बदलत्या व्याजदराशी संबंध येणाऱ्या बँक, वाहन, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांचे मूल्यही आपटले. किंबहुना सेन्सेक्समध्ये तर बँक क्षेत्रातील घसरलेले समभाग आघाडीवरच होते. त्याचबरोबर अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, भेल, एल अ‍ॅण्ड टी, कोल इंडिया आदी घसरले. सेन्सेक्समधील सर्व ३० समभागांचे मूल्य दिवसअखेर रोडावले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार निर्देशांकाला सर्वाधिक, ३.७१ टक्क्यांपर्यंत घसरणीचा फटका बसला. तसेच पोलाद, भांडवली वस्तू आदी निर्देशांकही घसरले. सेन्सेक्समध्ये एकाच सत्रात २ टक्क्यांहून अधिक अंश आपटी नोंदली गेली असतानाच मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक दीड टक्क्यांपर्यंत घसरले.

परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेतील रुपयाची मोठी घसरणही बाजाराच्या पडझडीला निमित्त ठरली. बाजारात व्यवहार करताना गुंतवणूकदारांची नजर आता अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या बुधवारच्या बैठक वृत्ताकडे असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर उतरत असल्याचे चिंतासावट आशियातील अन्य तसेच युरोपीय बाजारात दिसले.