२०१२ साल मावळतीला आला असताना ‘सेन्सेक्स’ने बुधवारी महिन्यातील मोठी उच्चांकी उडी नोंदविली. निर्यातदारांसाठी सरकारने उचललेल्या पावलानंतर आता रिझव्‍‌र्ह बँकेकडूनही व्याजदर कपातीची अपेक्षा दुणावल्याने ‘निफ्टी’नेही ५,९०० चा बहुप्रतिक्षीत स्तर पार केला.
भांडवली बाजारात बँक, ऊर्जा, तेल व वायू क्षेत्रातील समभागांमधील जोरदार खरेदीने १६२.३७ अंश वाढीसह मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ निर्देशांक १९,४१७.४६ वर जाऊन पोहोचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’नेही अर्धशतकी वाढीसह ५,९०० चा टप्पाही ओलांडला.
डिसेंबरमधील ‘डेरिव्हेटीव्ह’ वायद्यांच्या सौदापूर्तीचे व्यवहार उद्या होत असल्याने गुंतवणूकदारांचा खरेदीकडील कल लक्षणीय ठरला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघही बाजारात होताच.
देशातील कमी होत असलेल्या निर्यातीचे प्रमाण लक्षात घेत सरकारने आज निर्यातदारांसाठी दिलेले २ टक्के व्याजदराचे अनुदान आणखी वर्षभर, मार्च २०१४ पर्यंत विस्तारले आहे. जानेवारीअखेरच्या तिमाही पतधोरणात व्याजदर कपातीच्या शक्यतेनेही गुंतवणूकदारांनी आज समभाग खरेदीचा जोर लावला. त्याला जोड रिझव्‍‌र्ह बँक शुक्रवारी करणार असलेल्या खुल्या बाजारातील निधी उभारणीचीही मिळाली. परिणामी, ३० नोव्हेंबर रोजीच्या १६९ अंश वाढीनंतर मुंबई निर्देशांकाने आज १६२ अंशांच्या डिसेंबरमधील मोठी झेप दाखविली.
हाँगकाँगवगळता आशियातील इतर प्रमुख बाजारातील वाढीनेही स्थानिक भांडवली बाजाराला आज साथ दिली. एकाच सत्रातील जवळपास ५० अंश वाढीमुळे ‘निफ्टी’ही ५,९०० च्या पुढे गेला.
मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, जिंदाल स्टील, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स, ओएनजीसी, टाटा पॉवर, एनटीपीसी, भेल यांचे भाव चांगलेच वधारले. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी २२ समभागांचे भाव वधारले.     

डॉलरच्या तुलनेत रुपयाही उंचावला
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी ११ पैशांनी वधारला. प्रति डॉलर स्थानिक चलन यामुळे ५४.८४ पर्यंत गेले. रुपया आता सप्ताहाच्या वरच्या स्थानावर आहे. गेल्या तीनही सत्रात रुपया भाव कमावत आला आहे. तत्पूर्वी आधीच्या आठवडय़ात रुपयाने एका डॉलरमागे ५५ पर्यंत तळ गाठला होता. निर्यातीला चालना देण्याच्या सरकारच्या धोरणामुळे व्यापारी तूट कमी होण्याची शक्यता वर्तवित निर्यातदारांनी केलेल्या डॉलरच्या विक्रीमुळे रुपया भक्कम बनला आहे.